रुग्णकेंद्रित व्यवस्था निर्माण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
09-Jan-2025
Total Views |
मुंबई : (CM Devendra Fadnavis) “राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून रुग्णसेवा देत असते. आरोग्य विभागाच्या विविध योजनांमधून आणि पुढील आराखड्यामध्ये रुग्णकेंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात यावा,” असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. ८ जानेवारी रोजी दिले. आरोग्य विभागाच्या सर्व आरोग्य यंत्रणेतील घटकांचे पुढील दिवसांत मूल्यमापन चांगल्या संस्थांकडून करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
‘सह्याद्री’ अतिथीगृहावर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या १०० दिवस आराखडा बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. बैठकीस सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “क्षयरोगमुक्त भारत अभियाना’मध्ये महाराष्ट्राने नेतृत्व करावे. या अभियानात क्षयरुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करण्यात यावे. स्तन व गर्भाशय कर्करोग निदान करण्यासाठी मोहीम राबविण्यात यावी. रुग्णवाहिका व्यवस्थेमध्ये १०८ रुग्णवाहिका महत्त्वाची आहे. रुग्णवाहिका खरेदीच्या न्यायालयीन प्रकरणी महाधिवक्ता यांचा सल्ला घेऊन प्रकरण तातडीने निकाली काढावे,” अशी सूचना त्यांनी केली.
उपचारांचे दर निश्चित करणार - आरोग्यमंत्री
सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “बॉम्बे नर्सिंग कायद्यात सुधारणा करून उपचारांचे दर निश्चित करण्याचा मानस आहे. राज्यातील खासगी प्रयोगशाळा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी कायदा करून विभागाचा आकृतिबंध निश्चित करण्याचे नियोजन आहे. आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात करण्यात येणार्या चाचण्यांचे अहवाल वेळेत उपलब्ध होत नसल्याबाबत चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.