रायगडचा पक्षीमित्र

    09-Jan-2025   
Total Views |
 
vaibhav patil
 
पक्षीनिरीक्षणाचा छंद जोपासून, त्या माध्यमातून दुर्मीळ पक्ष्यांची नोंद करून रायगडच्या पक्ष्यांच्या विश्वाविषयी माहिती देणार्‍या वैभव पाटीलविषयी...
 
उरण आणि रायगडमधील पक्षीसंपदेची माहिती करून देणारा हा मुलगा. प्रसंगी वाचन आणि लिखाणाच्या माध्यमातून निर्माण झालेले त्याचे निसर्गप्रेम पुढे पक्षीनिरीक्षणाकडे वळले. पक्षीनिरीक्षणाच्या जोरावर या मुलाने महाराष्ट्र आणि रायगडमधून, काही महत्त्वाच्या पक्ष्यांच्या प्रजातींची पहिल्यांदाच नोंद केली आहे. रायगडचे पक्षीवैभव टिपणारा हा तरुण होतकरू पक्षीनिरीक्षक म्हणजे वैभव पाटील.
 
वैभवचा जन्म दि. ६ जानेवारी १९९४ रोजी उरण तालुक्यातील पागोटे या गावात झाला. घरची परिस्थिती तशी सर्वसामान्य. उरण म्हणजे पक्ष्यांचे माहेरघर. येथील पाणथळींवर येणारे कित्येक प्रजातींचे स्थलांतरित पक्षी पाहून, अनेकांची पाऊले पक्षीनिरीक्षणाकडे वळली आहेत. मग उरणकरच असणारा वैभव याला अपवाद कसा ठरेल? लहानपणी वैभवला पाळीव प्राण्यांचा लळा लागला. त्यामुळे प्राण्यांविषयी आकर्षण निर्माण झाले. वय वाढत गेल्यावर, वाचनाची गोडी निर्माण झाली. प्रदीर्घ वाचनातून निर्माण झालेले विचार, वैभवने कागदावर उतरवण्यास सुरुवात केली. लिखाणाचा व्यासंग निर्माण झाला. निसर्गकथा वाचून, मनात निसर्गाची ओढ निर्माण झाली. याला वाट मोकळी करून देण्यासाठी, कविता लेखनाची साथ मिळाली. वैभव कविता लिहू लागला. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान वैभवला निसर्गाविषयी आवड असणारे समविचारी मित्र भेटले. या मित्रांनी एकत्रित येऊन वृक्षारोपण करण्याचे ठरवले. त्यासाठी स्थानिक पर्यावरणविषयक काम करणार्‍या संस्थांची मदत घेतली. या मदतीच्या आधारे, उरणमधील पिरकोनच्या ओसाड डोंगरावर १०० झाडे लावली. झाडे बहरण्यास जशी सुरुवात झाली, तसे वैभवचे मनही निसर्गाकडे आकर्षित होऊ लागले. झाडांच्या बहराबरोबर वैभवच्या आयुष्यालादेखील निसर्गाच्या ओढीचे वळण मिळाले.
 
पिरकोनच्या डोंगरावर लावलेली १०० झाडे, ही वैभव आणि त्याच्या मित्रांनी तीन वर्षे जगवली. या झाडांच्या देखभालीसाठी एक दिवसाआड ही मंडळी, वृक्षारोपण केलेल्या ठिकाणी जात असत. झाडे मोठी होऊन बहरू लागल्यावर, त्यांच्यावर पक्ष्यांचा वावर सुरू झाला. निरनिराळ्या पक्ष्यांचा वावर पाहून, वैभव त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करू लागला. त्यासाठी पक्षी ओळखायचे कसे, याविषयी वाचन सुरू झाले. विविध माध्यमांमधून पक्ष्यांविषयी माहिती गोळा करून, त्याने पक्षीनिरीक्षणाची सुरुवात केली. उरण हा तालुका पाणथळींचा तालुका असल्याने, सुरुवात तेथूनच केली. मात्र, रायगडचे पक्षीवैभव टिपण्याकडे वैभवचा कल होता. पक्षीनिरीक्षणासाठी दुर्बीण नव्हती. त्यामुळे मित्राचा कॅमेरा घेऊन, वैभवने रायगड जिल्ह्यातील जंगले पालथी घालण्यास सुरुवात केली. कर्नाळ्याबरोबरीने इतर असंरक्षित वनांमधील पक्ष्यांच्या नोंदी घेण्यास त्याने सुरुवात केली. या नोंदी नोंदवायच्या कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यासाठी त्याला ‘ई-बर्ड’ची साथ मिळाली. पक्षीनिरीक्षण करणार्‍या पक्षीमित्रांना त्यांनी टिपलेल्या नोंदी नोंदविण्याचे हक्काचे माध्यम म्हणजे ‘ई-बर्ड.’ ‘सिटीझन सायन्स’ या संकल्पनेअंतर्गत चालणारे हे व्यासपीठ, पक्षीमित्रांना त्यांच्या नोंदी नोंदवण्याची मुभा देते. शिवाय, आपल्या आसपासच्या परिसरात असणारे पक्षी, त्यांचे ठिकाण, त्यांचा प्रवास याविषयीदेखील माहिती देते. या व्यासपीठाचा वैभवने पूर्ण उपयोग करून घेतला. ‘ई-बर्ड’मुळे त्याच्या पक्षीनिरीक्षणाच्या प्रवासाला सुलभता मिळाली. ‘ई-बर्ड’वर २०२१ साली रायगड जिल्ह्यातील पक्ष्यांच्या प्रजातींच्या सर्वाधिक नोंदी वैभवने नोंदवल्या. वर्षभरात साधारण पक्ष्याच्या ३०५ प्रजातींची नोंद त्याने केली आहे.
 
वैभवने रायगड तालुक्याव्यतिरिक्त इतरत्र प्रदेशांमध्ये भटकूनही, पक्ष्यांच्या प्रजातींच्या नोंदी केल्या आहेत. आजवर त्याने रायगडमधून पक्ष्याच्या ३६५ प्रजातींच्या नोंदी केल्या आहेत. यामधील काही नोंदी या राज्यासाठी किंवा काही जिल्ह्यांसाठी पहिल्या ठरल्या आहेत. म्हणजेच पहिल्यांदाच राज्यात किंवा काही जिल्ह्यांत दिसलेल्या पक्ष्यांच्या प्रजाती, वैभवने नोंदवल्या आहेत. सातार्‍यातील शिरवळ गावाजवळ वैभव आपल्या मित्रांसोबत पक्षीनिरीक्षणासाठी गेलेला असताना, त्यांना एका शेतामध्ये ‘पाईड व्हिटइअर’ या स्थलांतरित पक्ष्याचे दुर्मीळ दर्शन झाले. त्यांनी या पक्ष्याचे छायाचित्र टिपले आणि त्यानंतर माहिती मिळवल्यावर, हा पक्षी महाराष्ट्रात प्रथमच आढळल्याचे त्यांना समजले. वैभवने रायगड जिल्ह्यातूनदेखील अनेक पक्ष्यांच्या पहिल्यांदा नोंदी केल्या आहेत. ज्यामध्ये ‘रेड क्रेस्टेड पोचर्ड’, ‘कॉमन क्वेल’, ‘लेसर फ्रीग्रेट’ यांचा समावेश आहे. मात्र, यांमधील लक्षवेधी प्रजात ठरली ती म्हणजे ‘रेड नॉट’ म्हणजेच ‘लाल जलरंक’. सारलच्या किनार्‍यावर वैभवने टिपलेला हा पक्षी, महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच हौशी पक्षीनिरीक्षकांनी येऊन पाहिला. रायगड जिल्ह्यातील या पक्ष्याची ती पहिली, महाराष्ट्रासाठी तिसरी नोंद ठरली होती. पक्षीनिरीक्षण आणि निसर्ग संवर्धनाच्या कामाला संघटित स्वरुप आणण्यासाठी वैभवने, गेल्यावर्षी ‘बहराई फाऊंडेशन’ची स्थापना केली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून पक्षीनिरीक्षण कॅम्प, पक्षीगणना, स्वच्छता अभियान अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याचा त्याचा मानस आहे. या कामात वैभवला, त्याच्या आईचा मोलाचा पाठिंबा मिळाला आहे. शिवाय, अनेक तज्ञ पक्षीमित्रांचे मार्गदर्शनही मिळाले आहे. पक्षीनिरीक्षणाच्या या छंदात त्याला अनेक मित्रांची साथदेखील मिळत आहे. आपली ’जेएनपीटी’मधील नोकरी सांभाळून, वैभव हे काम करत आहेत. रायगडच्या पक्ष्यांचे विश्व स्वतःपर्यंत सीमित न ठेवता, जगाला त्याचे दर्शन घडविणार्‍या वैभवला पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.