मोहल्ला वाचविण्यासाठी ठाकरे गट रस्त्यावर!

    09-Jan-2025
Total Views |
 
Thackeray
 
मुंबई : वांद्रे पूर्व मधील भारतनगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर एसआरएकडून कारवाई करण्यात येत असून याला उबाठा गटाकडून विरोध करण्यात येत आहे. इथले आमदार वरुण सरदेसाई यांनी रस्त्यावर उतरत या कारवाईला विरोध दर्शवला आहे.
 
वांद्रे पूर्व येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी जेसीबी दाखल झाली असून इथल्या अनधिकृत घरांवर हातोडा मारण्याचे काम सुरु झाले आहे. मात्र, वरुण सरदेसाई यांच्यासह उबाठा गटाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक रहिवाशी आणि उबाठा गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी या कारवाईला विरोध केल्याने परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
 
हे वाचलंत का? - दिल्लीत घडलं तसं मुंबईत पालिका निवडणूकीत होऊ शकतं!
 
याबाबत माध्यमांशी बोलताना वरुण सरदेसाई म्हणाले की, "या भागातील लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला असून त्याला मी तडा जाऊ देणार नाही. अदानी गृप हा लोकांना विकत घेऊ शकत नाही. इथला विकास करायचा असल्यास लोकांना विचारले पाहिजे. लोकांना विश्वासात घेऊन विकास करायला हवा, अशी मी सर्वांना विनंती करत आहे. आज इथल्या ज्या १८० घरांना तोडण्यात येत आहे त्यातील एकाही घरासोबत अदानी किंवा एसआरएचा करार झालेला नाही. तुम्हाला इकडे विकास करायचा आहे तर एसआरएच्या कायद्यानुसार कमीत कमी ज्यांची घरे तोडण्यात येत आहेत त्यांच्यासोबत एक करार तरी करावा. त्यांना कुठे आणि कशी घरे देणार आहात हे त्यांना सांगायला हवे. या कारवाईवर सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती आली आहे," असा दावा त्यांनी केला आहे.