मुंबई : 'अॅनिमल' चित्रपटात मिळालेल्या घवघवीत यशानंतर अभिनेत्री तृप्ती डिमरी विशेष चर्चेत आहे. बुलबुल चित्रपटातील तृप्ती 'अॅनिमल' आणि 'भूल भूलैय्या ३' मध्ये वेगळ्याच अंदाजात दिसली. एका चित्रपटामुळे एका पाठोपाठ एक मोठे चित्रपट तिने पटकावले. लवकरच ती 'धडक २' मध्ये झळकणार असून अनुराग बासू दिग्दर्शित 'आशिकी ३' मध्येही तिची वर्णी लागली होती. मात्र, आता 'आशिकी ३' मधून तिचा पत्ता कट झाल्याची माहिती मिळत आहे.
पीपींगमूनने दिलेल्या माहितीनुसार, 'आशिकी ३' चित्रपटात कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी ही जोडी पुन्हा एकदा झळकणार होती. मात्र, चित्रपटाच्या मेकर्सनी तृप्तीची 'अॅनिमल' आणि 'भूल भूलैय्या ३' मधील ग्रे शेडची भूमिका पाहता तिला आशिकी ३ मध्ये स्थान दिले नसल्याचे सांगितले जात आहे.
तसेच, 'अॅनिमल' नंतर तृप्ती झळकलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाई करत नसल्याचे देखील दिसले. त्यामुळे 'आशिकी ३' मध्ये तृप्ती शिवाय नवा चेहरा शोधण्याच्या तयारीत मेकर्स आहेत अशी माहिती मिळत आहे. अद्याप यावर अधिकृत माहिती किंवा प्रतिक्रिया कुणीही दिली नाही आहे. तृप्ती डिमरी हिने यापुर्वी 'बुलबुल', 'कला', 'लैला मजनू' या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारली होती.