मुंबईतील कष्टकरी माणसाला आधार देऊया

भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे प्रतिपादन

    09-Jan-2025
Total Views |

Pravin Darekar
 
मुंबई : सहकारात प्रचंड ताकद आहे. मुंबईतील मराठी माणूस ताकदवान झाला पाहिजे. मुंबईतील कष्टकरी माणसाला आधार देऊया. ज्या ठेवी ठेवीदारांनी आपल्या पतसंस्थेत ठेवल्या आहेत त्यांच्या विश्वासाला पात्र ठरुया. कारण सहकारातील महत्वाचा दागिना विश्वास आहे, असे प्रतिपादन भाजपा गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी केले आहे. घाटकोपर पूर्व येथे मध्य कोकण क्षत्रिय मराठी को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या नवीन शाखेचा उदघाटन सोहळा आज भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते.
 
या सोहळ्याला भाजपाचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर, भाजपा आमदार व मुंबई बँकेचे संचालक प्रसाद लाड, घाटकोपर विधानसभा क्षेत्राचे आमदार पराग शहा, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, शरद पवार गटाच्या राखी जाधव, मुंबई बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, मुंबई हौसिंग फेडरेशनचे संचालक अजय बागल, सातारा बँकेचे अध्यक्ष भाई वांगडे, मुंबई बँकेचे संचालक अनिल गजरे, नितीन बनकर, रितू तावडे, कविता देशमुख, मराठा समाजाचे युवा नेतृत्व योगेश केदार, मध्य कोकण क्षत्रिय मराठा को-ऑप क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष राजेश येरुणकर, जय मल्हार क्रांती संघटनेचे नाना शितोळे, माजी अध्यक्ष सदानंद घोसाळकर, भाई सावंत, रामचंद्र महाराज शिंगडे यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना आ. दरेकर म्हणाले की, स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे १९३६ साली या पतसंस्थेची स्थापना झाली. कोकणातील लोकांनी उभी केलेली ही संस्था आहे. तिला गती दिली पाहिजे या भूमिकेतून मी लक्ष घातले. पुढील आठवड्यात पोलादपूर येथील शाखेचे उदघाटन आपण करणार आहोत. उद्देश चांगला असेल तर आपल्याला कसलीच अडचण येत नसल्याचे दरेकर म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, मुंबई जिल्हा बँकेचे मी नेतृत्व करतोय. अनेक योजना आणल्या. सरकारी योजनांना पैसे दिले. लाडक्या बहिणींची एकही रुपया नघेता ६० हजार खाती उघडली. राज्याच्या विकासासाठी जिल्हा बँकेने हातभार लावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात आमच्या डोक्यावर होता म्हणून आम्ही वेगाने प्रगती करू शकलो. सहकारात प्रचंड ताकद आहे. मुंबईतील मराठी माणूस ताकदवान झाला पाहिजे. समाजासाठी लढाई लढण्याची रचनात्मक लढाई तरुणांनी लढली पाहिजे, मी तुमच्या पाठीशी असल्याचे दरेकर यांनी म्हटले.
 
सहकार चळवळ बिकट अवस्थेत आहे. सुदैवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. ते राज्यातील सहकार चळवळ डुबू देणार नाहीत, असा शब्दही दरेकरांनी दिला. जिल्हा बँक ही तुमची बँक आहे. सहकारतील पैसा सहकारातच आला पाहिजे. आपण हे अभियान राबविले तर मुंबईच्या आर्थिक राजधानीवर सहकाराचे वर्चस्व येईल. मुंबईत आम्ही गृहनिर्माण संस्थांसाठी स्वयं पुनर्विकास धोरण आणले. अनेक इमारती स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून उभ्या राहिल्यात. १६०० प्रस्ताव आमच्याकडे आलेत. येणाऱ्या काळात व्हिजन घेऊन काम करावे लागणार आहे.
 
तसेच रायगड बँक सुस्थितीत आणली. क्षत्रिय मराठा बँक सुस्थितीत आणतोय. सहकाराच्या गावातील कार्यकर्त्यांनी, गिरणी कामगारांनी ही मुंबई उभी केलीय. प्रकाश दरेकर यांच्या नेतृत्वाखाली हौसिंग फेडरेशन जिंकले. विक्रोळी येथे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री यांच्या हस्ते हौसिंगचे मोठे सेक्टर उभे करतोय. प्रतीक्षा नगर येथे आपण सहकार भवन उभारणार आहोत. सहकार मजबूत करूया. मुंबईतील कष्टकरी माणसाला आधार देऊया, असे आवाहनही दरेकर यांनी केले.
 
यावेळी आ. कालिदास कोळंबकर, आ. प्रसाद लाड, शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे, राजेश येरुणकर, नाना शितोळे, प्रकाश दरेकर यांसह आदींची भाषणे झाली. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष पवार यांनी व सूत्रसंचालन नितीन बनकर यांनी केले.
 
उदघाटनाच्या दिवशीच एक कोटीच्या ठेवी
 
क्षत्रिय मराठा को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या आज उदघाटन सोहळ्याच्या दिवशीच एक कोटीच्या ठेवी ठेवीदारांकडून जमा झाल्याचे आमदार दरेकर यांनी सांगितले.