भारतीय (हिंदु) संस्कृती व इतिहास परंपरेत कीर्तन परंपरेचे अनन्यसाधरण महत्त्व होते, आहे व राहणार आहे. या किर्तन परंपरेचे महत्व भारतीय जनमानसाच्या मुळाशी रुजलेले आहे. परंपरेनुसार कीर्तनाचे आद्य प्रवर्तक हे देवऋषी श्री नारदमहर्षि यांना मानले जाते. कीर्तनाचा उल्लेख श्रीमद्भागवतात भक्त प्रल्हादाच्या चरित्रात येतो तो ही हिरण्यकश्यपू प्रल्हादास विचारतो की, तू गुरुकडुन काय शिकलास तेंव्हा भक्त प्रल्हाद सांगतात नऊ प्रकारची भक्ती शिकली असे सांगताना भागवतातील हा श्लोक
श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् ।
अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥
समर्थ रामदास्वामीनीं दासबोधात या श्लोकाचा फार छान अनुवाद केला तो आवश्य वाचावा. नवविधा भक्तीतील ही दुसर्या प्रकारची भक्ती आहे. भगवंताच्या गुणांचे व कथेचे तसेच नामाचे संकीर्तन करणे हे मुख्य स्वरुप या कीर्तन भक्तीचे. कीर्तन या शब्दाचे चिंतन केले असता श्रीमद्भागीतेत व नारदपुरणात विशेष व्याख्या मिळेत. गीतेत सतंत कीर्तंयत्नो माम् असा संदर्भ मिळतो. यावर ज्ञानेबारायांनी केलेले कीर्तनाच्या महात्म्य*ाचे वर्णन अत्यंत मनाला भिडणारे आहे. (श्री ज्ञानेश्वरी 9 वा अध्याय ओवी 208 ते 210) तर नारदपुराणाने किर्तनाची व्याख्या “कीर्तनं मुनिभिर्प्रेक्तं हरेर्लेला प्रणायनं” अशी केली आहे.
महाराष्ट्रात श्री ज्ञानोबाराय, नामदेव महाराज, तुकाराम महाराज व समर्थ रामदास स्वामी यांनी कीर्तन भक्तीवर जोर देत ईश्वभक्तीचा प्रसार करत समाजमन अध्यात्माकडे वळवित राष्ट्रभक्तीचे बीज पेरले कारण आपण खर अध्यात्म विसरलो म्हणून आपल्यावर वा भारतवर्षावर इस्लामिक शक, हुण, डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि सर्वात भयानक इंग्रज ज्यांनी आपली देव-देश व धर्मावरची श्रद्वाच मारण्याचा प्रयत्न केला. मात्र या ही कालखंडात पुढे या कीर्तनाचे महत्व लोकमान्य टिळकांनी ओळखुन राष्ट्रीय कीर्तन पद्धती सुरु करण्याची संकल्पना तत्कालीन किर्तनकार मंडळींनसमोर पहिल्या कीर्तन संमेलनात मांडली व म्हणाले “मी जर पत्रकार झालो नसतो तर कीर्तनकार नक्कीच झालो असतो” एवढं महत्त्व या भक्ती प्रकाराला आहे. तर संत चरित्रकार ल.रा.पांगारकर म्हणतात यवनांच्या काळात झालेली धार्मिक गळचेपी ही कीर्तनकरांनी थांबली म्हणून त्यांची धर्मसेवा ही राष्ट्रनिष्ठा ठरली. स्वा.सावरकरांनी कीर्तन परंपरेबद्दल त्यांच मते मांडले आहे. सावरकर म्हणतात “कीर्तन हे सत प्रचाराचे साधन आहे.” पं.मंदन मोहन मालवीय म्हणतात -“ हिंदू जगत में कथा और किर्तन धर्म उपदेशके दोन प्रधान साधन है, इनके द्वारा ही हिंदू संस्कृतीकी रक्षा और प्रचार होगा.”
कीर्तनाचे महाराष्ट्रात प्रामुख्याने दोन प्रकार पाहिला मिळतात. पहिला नारदीय व दुसरा वारकरी तसेच इतर पाच प्रकार ही पडतात जसे की रामदासी, गाणपत्य, शाक्त, राष्ट्रीय व पथकीर्तन ही पाच प्रकार आहेत. लेख विस्ताराच्या भयावस्तव नारदीय कीर्तन पद्धतीची थोडक्यात माहिती देवुन दासगणु महाराजांच्या कीर्तन पद्धतीचे व अख्यानाचे धावते समालोचन शब्दात उतरविण्याचा श्री दासगणू महाराजांच्या जयंती निमित्त हे अक्षरधैर्य करण्याचा विनयपूर्वक प्रयत्न.
नारदीय कीर्तन पद्धत
या कीर्तनपद्धतीत पूर्वरंग व उत्तररंग असे दोन भाग असतात. पूर्वरंगात एखादा अभंग घेवुन त्यावर वेदांतपर निरुपण व त्या अभंगास अनुसरून एखादे ऐतिहासिक पौराणिक आणि संतचरित्रपर अख्यान उत्तररंगात व अख्यान परत पुर्वरंगाच्या पदास जोडुन “हेचि दान देगा देवा” या अभंगाने सांगता.
श्री दासगणु महाराजांची कीर्तन पठडी
श्री दासगणु महराजांची कीर्तन पद्धती ही नारदीयच मात्र हि पठडी म्हणजे एक अनोखा समन्वयच म्हणावा लागेल सद्गुरू साईनाथांच्या आज्ञेप्रमाणे कीर्तनाला जातांना अंगावर फक्त उपरणे गुंडाळून किर्तनास सुरुवात केली. कीर्तनाची सुरुवात ही “रामदास माय माझी पतितपावना” या नमनाच्या पदाने होत व नंतर सद्गुरू साईनाथ महाराजांना नमन करुन उत्तररंगाच्या पूर्व “रामकृष्ण हरि जय जय भावाने म्हणा” पू.स्वामीजींच्या प्रासादिक भक्तीरसपर पदाने होते स्वरचित पूर्वरंगावरील पदांवर वेदांत सर्वस्पर्शी निरुपण दंभ, अनाचारावर आघात करत वेदांत पर निरुपण व तद्नंतर स्वरचित पूर्वरंगाच्या विषयास धरुन अख्यान सांगण्याचा प्रघात दासगणु महाराजांनी रुढ केला असे अभ्यासकांचे मत आहे. श्री दासगणू महाराजांनी जवळ जवळ पन्नास पूर्वरंगाच्या पदांची रचना आणि जवळपास ऐंशी आख्याने रचलेली आहे. दासगणुंच्या किर्तन पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे काल्याचे किर्तन, नारदीय पद्धत मध्ये काल्याचे कीर्तन नाहीतच जमा असे म्हणावे लागले वारकरी पद्धतीत फक्त काल्याचा अभंग घेत हंडी फोडुन काला वाटप होतो, मात्र दासगणु स्वताः गोपालकाल्याचे अख्यान रचुन निंबराजाच्या परंपरेतील खेळ शिकुन ते किर्तनात करत असतं. काल्याचे किर्तन हा लिखाणाचा विषयच नसुन अनुभवाचा विषय आहे. प्रत्येकाने तो एकदा तरी घ्यावा कीर्तनाचा शेवट रामदास स्वामींच्या जीवनातील कथाप्रसंगाने करत. म्हणजे वारकरी ,नारदीय व रामदासी पद्धतीची हा अनोखा संगम श्री दासगणु महराजांनी केला. दासगणु महराजांच्या कीर्तनपठडीत स्त्रिया ही कीर्तन करतात मात्र स्त्रियांनी बसुनच किर्तन करावे हा संकेत आहे. अशी अनोखी समन्वयवादी कीर्तन पठडी दासगणु महाराजांनी सुरु केली. या कीर्तन पद्धतीचा विस्तार व विद्ववत्तेने भक्तीने व सर्वस्पर्शी वैभवाने प्रसार महाराजांचे शिष्य पू.अनंतमहाराज आठवले तथा स्वामी वरदानंद भारती यांनी मराठी मुलूखात केला. दासगणु महराजांनी कीर्तन पद्धतीवर छोटो स्फूट लेखनही पद्यात केले त्यात ते म्हणातात.
किर्तनाच्या धंद्यावरी । पोट आपले कधी ना भरी ।
ती विद्या ठेवणे खरी ।
सोवळीच सर्वदा ॥
आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे महाराजांनी मोठ्या दरबारातील किर्तने बिदागी न घेता केली महाराजांचे चरित्रकार प्रा.अ.दा.आठवले यांनी लिहलेल्या चरित्रात इंदौर येथील होळकर संस्थांनमध्ये झालेल्या किर्तनप्रसंगाचे फारच उदबोधनपर व वाचनीय असे वर्णन वाचण्यास मिळते. दासगणु कीर्तन पद्धतीत अवास्तव गाण कलेस महत्त्व नाही महाराजांनी स्पष्ट त्यांच्या कीर्तनपद्धती या स्फुट लेखनात लिहले आहे.
श्री दासगणु महाराजांच्या अख्यानाबद्दल धावता आढावा
दासगणु महाराजांच्या अख्यानाची विभागणी साधारणात पाच प्रकरात करता येईल. लोकोत्तर व्यक्तीमत्वे : यात आद्य शंकराचार्य, राजा भर्तृहरी, छत्रपती शिवाजी महाराज, जगन्नाथ पंडीत, तानाजी मालुसरे, अहिल्याबाई होळकर, आऊसाहेब डफळे, सरदार बापु गोखले, चिमाजी अप्पा, लो.टिळक तर संतांच्या अख्यानात ज्ञानदेव आदि संतांवर अख्याने आहेतच पण विशेषतः एकनाथ महाराज, मुकुंदराज, गोराकुंभार, सेन्हा न्हावी, लाखा कोल्हटी, नरसी मेहता, नरहरी सोनार, सुरदास, तुलसीदास, कुर्मदास, रोहिदास, कबीर, सखु संतोबा पवार बिल्वमंगल गोंदवलेकर महाराज मीरबाई.
सामाजिक ः धनेश्वर.
जन्माख्याने ः गीताजन्म, दत्तजन्म, वामन परशुराम जन्म, मल्हारी जन्म.
पौराणिक ः गरुडगर्वहरण, सुदामा, हनुमानलीला, वत्सलाहरण व गोपालकाला अशी एकुण जवळपास 80अख्याने श्री दासगणु महाराजांनी रचली व कीर्तने केली प्रत्येक अख्यानात वेगवेगळ्या व्यक्ती चित्रणे कल्पकता शब्दातुन होणारी वातावरण निर्मिती अख्यानातील समन्वयवृत्ती ऐतिहासिकता त्यातुन संतांचे संतत्व व अख्यानातील रसपोषिता व अलंकारीकता रुपके भाषा सौष्ठव आणि विशेष म्हणजे अख्यानातील पदांची वृतयोजना सारं काही अद्भूत.
दासगणु महाराजांनी प्रत्येक अख्यानात मराठीतील वृत्ताचा भरपुर उपयोग केला जी नावे सुद्धा आपणास माहीत नाही वा लेखनकर्त्यास ही माहिती नाही अशी काही नावे देवुन लेखनास विराम देतो. अक्षरगणवृत्ते, मात्रावृत्ते इ. सर्वांचा प्रसंगोचित उपयोग केला आहे. शार्दूलविक्रीडित, मंदाक्रांता, हरिणी, पृथ्वी, अश्वधाटी, रथोद्धता, वसंततिलका, स्वागता, शालिनी, मालिनी, शिखरिणी, भुजंगप्रयात - अशी बहुतेक सर्व अक्षरगणवृत्ते, चंद्रकला, आर्या, भूपति, वनहरिणी, हरिभगिनी, पादाकुलक, साकी, दिण्डी, अंजनीगीत, कामदा, कटिबंध, भवानी, मदनमंजिरी, अभंग, सवाल, छक्कड, लावणी, कटाव इ. सर्वांचा वापर केलेला आहे. प.पू.श्री दासगणु महाराज व पू.स्वामी वरदानंद भारती यांच्या चरणी साष्टांग दंडवत करुन लेखनास विराम देतो.
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
शब्दवाही योगेश नं काटे