मनोरा, मॅजेस्टीक आमदार निवास आणि अजिंठा बंगल्याचे काम मुदतीत पूर्ण करा!

09 Jan 2025 18:42:13
 
Ram Shinde
 
मुंबई : सध्या बांधकाम सुरू असलेले मनोरा आमदार निवास, मॅजेस्टीक आमदार निवास आणि अजिंठा बंगला हे नुतनीकरणाचे प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण करा, असे निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
 
गुरुवार, ९ जानेवारी रोजी विधानमंडळ कामकाज आढावा घेण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-१ (कार्यभार) श्री. जितेंद्र भोळे, सचिव-२ (कार्यभार) डॉ. विलास आठवले आणि विधानमंडळ सचिवालयातील सर्व अधिकारी वर्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  पक्ष वगैरे न बघता दोषीवर कारवाई केली जाईल!
 
विधिमंडळ सभागृहात नव्याने कार्यान्वीत करण्यात आलेल्या संगणक कार्यप्रणालीसंदर्भात सन्माननीय सदस्यांना सुयोग्य पध्दतीने अवगत करण्यात यावे. सभागृह कामकाजातील सदस्यांचा सहभाग वाढण्याच्या दृष्टीने सर्वोतपरी मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच सन्माननीय सदस्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत तत्परतेने कार्यवाही व्हावी, असे निदेश सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.
 
यासोबतच मनोरा आमदार निवासचे बांधकाम सुरू झाले असून त्यामध्ये सभागृह, वाचनालय, अद्ययावत वाहनतळ, सुसज्ज भोजन कक्ष, सदस्य आणि सहायकांसाठीची प्रशस्त निवास व्यवस्था उपलब्ध असणार आहे. मॅजेस्टीक आमदार निवासचे देखील वारसा वास्तूवैभव कायम ठेऊन अतिशय देखणे असे नुतनीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रामुख्याने पीठासीन अधिकारी यांच्या निवासासाठी मलबार हिल येथे 'अजिंठा' इमारतीची सुसज्ज वास्तू उभारण्यात येत आहे. ही सर्व बांधकामे विहित मुदतीत पूर्ण व्हावीत आणि सन्माननीय सदस्यांना तातडीने त्याचा लाभ घेता यावा यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिल्या आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0