कुंभमेळ्यामुळे उत्तर प्रदेशात होणार २ लाख कोटी रुपयांची उलाढाल
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची माहिती
09-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : यंदाच्या कुंभमेळ्यामध्ये जवळपास ४० कोटींहून अधिक भाविक येतील. त्यामुळे उत्तर प्रदेशात २ लाख कोटी रुपयांपर्यंतची आर्थिक उलाढाल होईल, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
खासगी माध्यमसमुहाच्या 'दिव्य उत्तर प्रदेश: द मस्ट विजिट सेक्रेड जर्नी' या परिषदेत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुंभमेळ्यामुळे राज्यास होणाऱ्या आर्थिक लाभांची माहिती दिली. ते म्हणाले, २०१९ च्या कार्यक्रमाने राज्याच्या अर्थव्यवस्थेत १.२ लाख कोटी रुपयांचे योगदान दिले. यावर्षी ४० कोटी भाविकांच्या उपस्थितीमध्ये महाकुंभाद्वारे २ लाख कोटी रुपयांपर्यंत आर्थिक वाढ होण्याचा अंदाज आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या महाकुंभमेळ्यामुळे भारताच्या प्राचीन सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा जागतिक स्तरावर प्रसिद्ध होतील, असे एका प्रेस निवेदनात म्हटले आहे. महाकुंभाचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी सांगितले की हा कार्यक्रम केवळ धार्मिक मेळावा नाही तर सामाजिक आणि आध्यात्मिक एकतेचे प्रतीक आहे. त्यांनी महाकुंभाचे वर्णन जगातील सर्वात मोठे तात्पुरते शहर म्हणून केले, ज्यामध्ये कोणत्याही वेळी ५० लाख ते एक कोटी भाविक सामावून घेण्याची क्षमता असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.