राजकीय चित्रपट? नको रे बाबा! 'इमर्जन्सी'नंतर कंगना राणावतने घेतला मोठा निर्णय

    09-Jan-2025
Total Views |

kangana ranaut 
 
 
मुंबई : अभिनेत्री-दिग्दर्शिका कंगना राणावत हिचा 'इमर्जन्सी' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीवर चित्रपटाचे कथानक आधारित आहे. खरं तर या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट विविध वादांमध्ये सापडला होता. यापूर्वी बऱ्याचवेळा या चित्रपटाची नियोजित प्रदर्शनाची तारीख बदलावी लागली होती. अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर आता अखेर चित्रपट प्रदर्शित होत असताना कंगना राणावत हिने राजकीय चित्रपटांच्या बाबतीत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
 
कंगना रणावतने न्यूज १८ ला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, “ मी माझ्या आयुष्यात जे काही केले आहे, त्यातून मी नेहमीच काहीतरी धडे घेतले आहेत. पण पुन्हा कधीही राजकीय चित्रपट करणार नाही. कारण ते करणे खूप कठीण आहे. आता मला समजले आहे की बरेच लोकं असे चित्रपट का करत नाहीत, विशेषत: वास्तविक जीवनातील पात्रांबद्दल. मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत अनुपम (खेर) यांनी 'द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'मध्ये कमाल केली आहे, असे मला वाटते. ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे, पण जर तुम्ही मला विचाराल तर मी पुन्हा तसा चित्रपट बनवणार नाही”.
 
'इमर्जन्सी' चित्रपटाचे कंगनाने दिग्दर्शन केले असून यात तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या या प्रक्रियेदरम्यान तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्याबद्दल बोलताना कंगना म्हणाली की, “या सेटवर मी माझा संयम कधीच गमावला नाही. जर तुम्ही निर्माते असाल तर तुम्ही तुमचा राग कोणावर काढाल? दिग्दर्शक म्हणून तुम्ही निर्मात्याशी भांडू शकता, पण जर तुम्ही दोन्ही भूमिका करत असाल तर तुम्ही कोणाशी भांडू शकता? मला असे म्हणायचे होते की मला अधिक पैसे हवे आहेत आणि मी आनंदी नाही”.
 
कंगना पुढे म्हणाली की, 'आम्ही करोना काळात चित्रिकरण करत होतो. माझ्याकडे आंतरराष्ट्रीय क्रू होता आणि ते कडक शिस्तीचे होते. त्यांचे काही कठोर कॉन्ट्रॅक्ट होते आणि त्यांना प्रत्येक आठवड्याच्या अखेरीस त्यांचे पेमेंट देणे आवश्यक होते. ते माझ्या चित्रपटासाठी बांधील असल्याने मी जरी चित्रिकरण केले नाही, तरी त्यांना पैसे द्यावे लागत होते. त्यानंतर आसाममध्ये पूर आला. इतरही काही समस्या होत्या, ज्या मी हाताळत होते. हा चित्रपट करण्यासाठी मी धडपडत होते. मला असहाय्य वाटायचे, मला निराश वाटायचे, पण मी माजी निराशा कोणाला दाखवू? तिथे कोणीच नव्हते”. दरम्यान, ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट देशभरात १७ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.