मुंबई, दि.८ : विशेष प्रतिनिधी वाकोला नाल्यावर मेट्रो लाइन-२बी व्हायाडक्टच्या ‘शून्य आयकॉनिक ब्रिज’ या केबल-स्टेड ब्रिजचे बांधकाम सुरु आहे. या पुलाचे काम प्रगतीपथावर असून डिसेंबर २०२५ अखेरीपर्यंत या प्रकल्पाचे ५० टक्के स्थापत्यकामे पूर्ण झाले असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे.
मुंबईच्या सौंदर्यात भर घालणारा वांद्रे-कुर्ला संकुल येथे (वाकोला नाला) ‘शून्य’ या संकल्पनेचे महत्व अधोरेखित करणारा व स्थापत्य कामांतील वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना ठरेल असा आयकॉनिक केबल स्टेड पूल उभारणे प्रस्तावित आहे. मेट्रो मार्ग 2B प्रकल्पांतर्गत मेट्रो मार्गिका वांद्रे-कुर्ला संकुलातील वाकोला नाला ओलांडते त्या ठिकाणी मेट्रो व्हायाडक्टसाठी सदर ‘शून्य आयकॉनिक ब्रिज’ या केबल-स्टेड पुलाचे बांधकाम सूरू आहे. या आयकॉनिक पुलाची एकूण लांबी १३० मीटर आहे. त्यातील ८० मीटर लांबीचा मुख्य स्पॅन वाकोला नाल्यावर आहे. तसेच सदर पाईल कॅपमध्ये १९७ मेट्रिक टन लोखंडी सळ्यांचा वापर करण्यात आला आहे. पुलातील ८० मीटर लांबीचा मुख्य स्पॅन व ५० मीटर लांबीचा बॅक स्पॅन प्रस्तावित आहे.
उपरोक्त दोन्ही स्पॅन शून्य आकाराच्या पायलॉनवर आधारलेले आहेत. सदर शून्य पायलॉनची उंची ३९.४६ मीटर व यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्ट्रक्चरल स्टीलचे वजन सुमारे ७०० टन आहे. एचडीपीई कोटेड स्टील स्पायरल स्ट्रँड केबल्स (स्टे केबल्स) पुलास आधार देण्याचे काम करतील. सद्यस्थितीस सदर पुलाच्या पिअर क्र. ४७८च्या पायाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. दि. ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी पायलॉनच्या २ सेगमेंट उभारणीचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पाचे ५०% स्थापत्य काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती एमएमआरडीएने दिली आहे.