कला तुम्ही का जगायचे हे शिकवेल, हे पु. ल. देशपांडे यांनी सांगितलेले सूत्र डोळ्यासमोर ठेवून, ज्यांनी गझल यालाच आपला ध्यास मानला, त्या युवा गझलकार जयेश पवार यांच्याविषयी...
जयेश यांचा जन्म मुंबईतला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी चेतना महविद्यालयात ‘वाणिज्य’ शाखेत प्रवेश मिळवला. शब्दांवर प्रेम असणार्यांना अनेकदा आकड्यांचे वावडे असते. जयेश यांच्या बाबतीतही तेच झाले. त्यावेळी गझलशी ओळख झाली नसली, तरी भाषेविषयी त्यांच्या मनात आस्था होती. वाणिज्य शाखेत आता आहे तशी, परीक्षेला मराठीत उत्तरे लिहिण्याची सोय त्यावेळी नव्हती. ती सोय नसल्यामुळे जयेश यांनी ‘वाणिज्य’ शाखा अर्ध्यात सोडून, ‘कला’ शाखेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घरच्यांचा मात्र या निर्णयाला विरोध होता. व्यावहारिकता सोडून आपली मुले कलेची वाट निवडतात, तेव्हा पालकांना वाटणारी स्वाभाविक भीती जयेश यांच्या आई-वडिलांनासुद्धा वाटत होती. पण, जयेश त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी त्याच महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश मिळवला.
शाखाबदल केल्यामुळे जयेश यांना प्रथम वर्षापासून पुन्हा नवी सुरुवात करावी लागली. ही सुरुवात त्यांचा यशस्वी गझलकार होण्याच्या दिशेने घेऊन जाणार आहे, याची त्यावेळी त्यांना अजिबात कल्पना नव्हती. त्यांचे घर महविद्यालयापासून दूर असल्यामुळे, घरी जाण्याऐवजी महाविद्यालयातील ग्रंथालयात वेळ घालवणे त्यांना अधिक पसंत होते. त्याच ग्रंथालयात त्यांची गझलशी ओळख झाली. त्यांना इतर काव्यप्रकार आवडतच होते, ते कवितासुद्धा लिहायचे. पण, ‘गझल’ हा प्रकार त्यांना अधिक भावला, तो त्यांच्या मनाला अधिक भिडला. सुरेश भट यांचे ‘एल्गार’,’रंग माझा वेगळा’ यांसारखे गझलसंग्रह त्यावेळी त्यांच्या हातात पडले आणि त्यातील अनेक गझल वाचून ते प्रभावित झाले. वरवर साधी आणि सोपी वाटणारी गझल, मात्रावृत्तांमध्ये बांधली गेलेली आणि चपखल शब्दांच्या व गर्भित अर्थाच्या धाग्यात ती विणली गेलेली असते, या गोष्टींचा उलगडा जयेश यांना हळूहळू गझल वाचताना, तिचा अभ्यास करताना होऊ लागला. जयेश यांना बुद्धिबळ खेळण्याची आणि सुडोकू सोडवण्याची आवड होती. सुरुवातीला गझल लिहिताना, मात्रावृत्त, शब्द आणि अर्थाचा मेळ बसवणे त्यांना बुद्धिबळ खेळण्याइतके किंवा सुडोकू सोडवण्याइतके आव्हानात्मक वाटायचे. पण, सुरुवातीला आव्हानात्मक वाटणारी गझल हळूहळू त्यांच्या हातून लीलया आकार घेत गेली आणि त्या गझलसोबत त्यांच्यातील गझलकारही.
अनेक महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये त्यांनी पारितोषिके पटकावली. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपल्या गझल सादर केल्या. सुरुवातीला त्यांच्या घरच्यांचा या सगळ्याला विरोध कायम होता. गझल किंवा कविता लिहिण्याचा लागलेला छंद म्हणजे, तरुण वयात प्रेमात पडल्यानंतर केले जाणारे व्यर्थ चाळे असा अनेकांप्रमाणे जयेश यांच्या घरच्यांचाही समज होता. त्यामुळे वेळप्रसंगी जयेश त्यांची गझलची वही घरच्यांपासून लपवून ठेवावी लागे. त्यांच्या घरच्यांचा हा विरोध फार काळ टिकला नाही. कारण, जयेश यांनी स्वत:ला सिद्ध केले. हळूहळू माध्यमांनीही त्यांची दखल घ्यायला सुरुवात केली. जयेश यांच्याविषयी पहिल्यांदा एका वर्तमानपत्रात छापून आले होते, तेव्हा त्यांच्या वडिलांनी ते कात्रण कापून सगळ्या नातेवाईकांना आणि शेजार्यांना अभिमानाने दाखवले. “हे करण्याची काही गरज नाही, आता माझ्याविषयी असे बरेच काही छापून येतच राहील,” असा विश्वास आणि आश्वासन जयेश यांनी त्याप्रसंगी त्यांच्या वडिलांना दिले होते. त्यांनी ते आश्वासन खरे करून दाखवलेसुद्धा.
अनेक माध्यमांवर जयेश यांचे कार्यक्रम सादर झाले आहेत. त्यांच्या गझलांचे महाराष्ट्रभर जवळपास ११२ प्रयोग झाले आहेत. २०२१ साली त्यांचा ‘तुझ्यानंतर’ हा पहिला गझलसंग्रह प्रकाशित झाला. त्या संग्रहाच्या तीन आवृत्त्या निघाल्या आहेत. कोरोनाकाळात सादरीकरणासाठी कोणतेही माध्यम उपलब्ध नसताना, जयेश यांनी त्यांचे स्वत:चे ‘कृष्णगझल’ हे यूट्यूब चॅनल उघडले. त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जयेश यांचा हेतू केवळ गझल लिहून ती सादर करत राहण्याचा नाही. त्यांना ‘गझल’ तरुण पिढीत रुजवायची आहे. अनेक साहित्यप्रकार जसे काळाच्या ओघात नष्ट झाले, तशी त्यांना गझल नष्ट होऊ द्यायची नाही. ती टिकवून ठेवण्यासाठी युवा पिढीपर्यंत ती पोहोचवणे गरजेचे आहे, याची जयेश यांना जाणीव आहे. त्यासाठी ते अनेक कार्यशाळा घेतात. त्यातल्या बर्याचशा कार्यशाळा या विनामूल्य असतात. युवा गझलकारांनी लिहिलेल्या अनेक गझल लोकांपर्यंत पोहोचाव्या, यासाठी त्यांनी ‘गझल एके गझल’ हा उपक्रमदेखील सुरू केलेला आहे.
कलाकाराला कलेच्या वरदानासोबतच कठोर संघर्षाचा शापसुद्धा मिळालेला असतो. जयेश यांनासुद्धा या संघर्षाला तोंड द्यावे लागले. गझलसाठी त्यांना अनेक नोकर्या सोडाव्या लागल्या, कार्यालयीन कामकाजात त्यांना स्वत:ला बांधून घेता आले नाही. पण, या सगळ्या संघर्षाचे फळ त्यांना मिळाले. आज मराठी साहित्य विश्वातील युवा गझलकारांची चर्चा करताना, त्यांचे नाव आवर्जून घेतले जाते. अशा या ‘गझल एके गझल’ या ध्येयाने झपाटून गेलेल्या युवा आणि प्रतिभावंत गझलकाराला, त्याच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे खूप खूप शुभेच्छा!