अशोकराव व अलकाताई वर्णेकर हे दाम्पत्य गेली २८ वर्षे आसाममधील चहाच्या मळ्यातील अतिमागास जनजातीच्या मजुरांच्या शैक्षणिक सेवाकार्यामध्ये रममाण झाले आहे. त्यांच्या निरलस कामाची दखल घेत पुण्यातील ‘नातू फाऊंडेशन’तर्फे त्यांना एक लक्ष रुपयांचा ‘सेवागौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. मानचिन्ह व रु. एक लक्ष असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराचे वितरण उद्या, गुरुवार , दि. ९ जानेवारी रोजी महादेव बळवंत तथा भाऊसाहेब नातू यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने विवेकानंद केंद्राचे पश्चिम बंगालमधील ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वासजी लापालकर यांच्या हस्ते होणार आहे. पुरस्कार प्रदान सोहळा पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील भारतीय विद्या भवनमधील नातू सभागृह येथे सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे. यानिमित्ताने वर्णेकर दाम्पत्याच्या सेवाकार्याचा सविस्तर परिचय करून देणारा हा लेख...
ईशान्य भारतामध्ये अथवा पूर्वांचलमध्ये काम करणार्या मराठी कार्यकर्त्यांची मांदियाळी मोठी आहे. त्यापैकी सलग तीन तप तेथे राहून काम करण्याची प्रदीर्घ तपश्चर्या करणार्या मोजक्या मंडळींपैकी अशोकराव व अलकाताई वर्णेकर हे एक आगळेवेगळे दाम्पत्य. आसाममधील चायबागान आदिवासी जनजातीच्या प्रश्नांकडे समाजाचे व शासनाचे लक्ष वेधण्याचे मोठे कार्य त्यांच्या या समाजातील २८ वर्षांच्या चिवट व मूलभूत कामामुळे घडून येत आहे. आत्मवंचनेच्या गर्तेत सापडलेल्या या समाजासाठी या स्वरुपाचे काम हे एका दीपस्तंभासारखे आहे. समस्त मराठी जनांसाठी भूषणावह असलेले, परंतु एका मर्यादित वर्तुळात परिचित असणारे हे सेवाकार्य व्यापक समाजापुढे आणण्याचे काम या ‘नातू फाऊंडेशन’ पुरस्कारामुळे घडून येते आहे.
अनुकूल कौटुंबिक पार्श्वभूमी
अशोक वर्णेकर हे मूळचे नागपूरचे. त्यांचा जन्म दि. २० सप्टेंबर १९५० रोजीचा असून, त्यांचे शिक्षण ‘एमएस्सी’ (संख्याशास्त्र) व ‘एमएस्सी’ (अर्थशास्त्र) असे झालेले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुरुवातीला नागपूरमधील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दीड वर्षे त्यांनी नोकरी केली व नंतर दोन वर्षे त्यांनी नागपूर विद्यापीठात पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकविले. मे १९७७ मध्ये लग्न झाल्यावर ते लगेचच पुढल्या वर्षी मुंबईत दाखल झाले. मुंबईच्या दोन वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी वेगळी वाट चोखाळावी म्हणून ‘इकोनॉमिक टाईम्स’च्या ‘रिसर्च ब्युरो’मध्ये पत्रकार म्हणून काम केले. यादरम्यान ते संघाशी घनिष्ठपणे संबंधित होते. त्यांच्याकडे संघाच्या चेंबूर विभागाची शारीरिक शिक्षणप्रमुख म्हणूनही जबाबदारी होती.
अशोकराव वर्णेकर यांचे वडील श्रीधर भास्कर वर्णेकर हे मोठे संस्कृत पंडित होते. संघाची विश्वप्रार्थना व एकात्मता मंत्र ‘यं वैदिका’ याचे लेखन त्यांनी केले आहे. त्यांना ‘प्रज्ञा भारती’ ही पदवी कांची कामकोटी शंकराचार्य यांनी दिली होती. नागपूर विद्यापीठाची पहिली ‘डी.लिट’ही त्यांना मिळालेली होती. डॉ. हेडगेवार यांच्या परवानगीने झालेले संघाचे पहिलेवहिले शिशु स्वयंसेवक होते. वर्णेकर यांच्या घरी अनेकदा विवेकानंद केंद्राचे एकनाथ रानडे नागपुरात आले की उतरत असत. अरुणाचल प्रदेशमध्ये कामाची सुरुवात करत असताना पासीघाट येथे श्रीधर वर्णेकर हे एकनाथ यांच्यासोबत एक महिना राहिले होते.
अलकाताई यांचा जन्म १९५६ सालचा. त्यांचे माहेर हे अमरावतीच्या परांजपे यांच्याकडील आहे. त्यांचे आई-वडील हे दोघेही शिक्षक होते व सामाजिक कार्यातही सक्रिय होते. त्यामुळेच एकदा कॉ. श्रीपाद अमृत डांगे हे वर्धा-अमरावती परिसरात प्रवासात असताना परांजपे यांच्याकडे आवर्जून उतरले होते. अमरावतीचे खासदार कॉ. सुदाम देशमुख हे तर अनेकदा त्यांच्याकडे घरी सहजी येत असत. अलकाताई यांनी अमरावतीमध्ये ‘बी. एस्सी’ (संख्याशास्त्र) केले व नागपूरला ‘एम. एस्सी’ (संख्याशास्त्र)केले. १९७६ सालच्या आंध्र वादळाच्या मदतकार्यात अलकाताई यांचा सक्रिय सहभाग होता. नागपुरातून तांदूळ, कपडे ट्रकने पाठवण्याच्या कार्यात त्यांनी त्यावेळी मदत केली होती.
अरुणाचल प्रदेशमधील कामास सुरुवात
अनेक वर्षे मनात सामाजिक काम करण्याची रेंगाळणारी इच्छा पूर्ण करण्यासाठी अशोकराव वर्णेकर यांनी १९८० मध्ये मुलगा अवघा दीड वर्षांचा असताना, मुंबई सोडून अरुणाचलमध्ये पत्नीसह जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. खरे तर त्यावेळेस ते मुंबईत अगदी स्थिरस्थावर होण्याच्या मार्गावर होते. अलकाताई रुईया महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या आणि अशोकराव हे ’इकोनॉमिक टाईम्स’चे पत्रकार म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांना पत्रकार कोट्यातून अंधेरीजवळ एक तीन खोल्यांची सदनिकाही मिळाली होती. अशा सर्वस्वी अनुकूल परिस्थितीत किमान दोन वर्षे तरी सामाजिक कार्य करावे, यासाठी त्यांनी मुंबई सोडली.
सुरुवातीला अरुणाचल प्रदेशातील सेजोसा येथील विवेकानंद केंद्र विद्यालयात (तघत) दोघांनी दोन वर्षे अध्यापक म्हणून ठरवून काम केले. अलकाताई इथल्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. कारण, आतापर्यंत येणारे सर्व शिक्षक म्हणजे नोकरीच्या शोधात आलेली तरुण अविवाहित पुरुष मंडळी होती.स्थानिक समाजात अधिकाधिक मिसळण्याची संधी मिळावी, म्हणून पुढील दोन वर्षे वर्णेकर यांनी दोन्यी पोलो विद्याभवनमध्ये प्राचार्य म्हणून काम केले. या शाळेची इंग्रजी प्रार्थनाही त्यांनी लिहिली. ही शाळा अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री गेगांग अपांग यांनी स्वतः पुढाकार घेऊन काढलेली होती. १९८४ मध्ये वर्णेकर यांनी दोन्यी पोलो मिशन स्कूलमधील नोकरी थांबवून नहारलगून येथे विद्यार्थी प्राविण्य वर्ग ‘अरुणाचल युथ सेंटर’ या नावाने चालू केला. यात प्रामुख्याने गणित व भौतिकशास्त्राचे अभ्यासवर्ग होत असत. यासाठी ठराविक शुल्क नव्हते, तर विद्यार्थ्यांना जेवढे देणे शक्य असेल, तेवढे असे ऐच्छिक होते. तेथे चांगले ग्रंथालय त्यांनी तयार केले होते. अभ्यासिका होती. तेथे पुढील शिक्षणासाठी करिअर मार्गदर्शन केंद्रही चालविण्यात येत होते. साडेचार वर्षांमध्ये या कामाचेही चांगले बस्तान बसले होते.
यादरम्यान अलकाताईंनी आसाममधील लखीमपूर येथे दिब्रुगढ विद्यापीठाअंतर्गत शासकीय अध्यापक महाविद्यालयातून ‘बी.एड.’ पूर्ण केले. पाठोपाठ त्यांनी वर्षभर मिसामारीला केंद्रीय विद्यालयात शिकविले. त्यांना आसामी भाषा ही नुसती वाचता-बोलता येत नाही, तर लिहिताही चांगल्या प्रकारे येते. याच दरम्यान त्यांचा मोठा मुलगा हर्षद नहारलगून येथील केंद्रीय विद्यालयात शिकू लागला होता. पाठोपाठ धाकट्या मधुरालाही तेथे प्रवेश मिळाला. त्यावेळी गैर आदिवासी मुलांना केंद्रीय विद्यालयात सहजासहजी प्रवेश मिळत नसे. अलकाताई केंद्रीय विद्यालयात शिक्षिका असल्याने तो मिळू शकला. एव्हाना फक्त दोन वर्षांसाठी सामाजिक कामाचा अनुभव घेण्यासाठी आलेल्या या दोघांना आता अरुणाचल प्रदेशमध्ये चक्क आठ वर्षे पूर्ण झाली होती. १९७४ ते १९८४ या औपचारिक नोकरी करण्यालाही यादरम्यान कायमस्वरुपी विराम मिळाला.
नहारलगूनच्या त्यांच्या घरात पुढे संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी झालेले पू. रज्जूभैया व पू. सुदर्शनजी हे त्यांच्या उमेदीच्या कार्यकाळात घरी येऊन राहून गेलेले होते. त्यांचे घर हे अरुणाचलमधील सुरुवातीच्या काळातील संघाच्या मोजक्या घरांपैकी एक होते. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे हेही ‘भारत जोडो यात्रे’च्या निमित्ताने अरुणाचलमध्ये आले असता आमटे यांचे कुटुंबीय त्यांच्याकडे राहून गेले होते.
आसाममधील कामास सुरुवात
नहारलगून येथील युथ सेंटरची त्यांची जागा ही भाड्याची जागा होती. कारण, सरकारी नियमानुसार राज्याबाहेरील व्यक्तीला अरुणाचलमध्ये जागा विकत घेता येत नाही. नहारलगूनमधील भाड्याची जागा अचानक सोडण्यासारखी परिस्थिती तेथील घरमालकाने निर्माण केल्यावर वर्णेकर यांना नवीन जागेची शोधाशोध चालू करणे भाग पडले. आता परत भाड्याची जागा न घेता विकतच घ्यावी, असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. म्हणून अरुणाचलच्या सीमेबाहेर दोन किमी अंतरावरील पार्वतीपूर (हारमती) येथील जागा त्यांनी पसंत केली. तेथे आल्यावर त्यांनी मुंबईची सदनिका विकून टाकली व साधारण एकरभर जागा नोव्हेंबर १९८८ मध्ये विकत घेतली. आसामच्या लखीमपूर जिल्ह्यात येणारे पार्वतीपूर गाव हे तसे अनेकांना अपरिचित असले, तरी येथील दोन किमीवर असणारे हारमती हे छोटेखानी रेल्वे जंक्शन स्थानक अनेकांना माहीत असते. या जंक्शनमधून एक मार्ग नहारलगूनकडे जातो, तर दुसरा मार्ग दिब्रुगडकडे जातो. नहारलगून म्हणजे जुने इटानगर शहर. पार्वतीपूर येथून अवघ्या दीड-दोन किमी अंतरावर बंदरदेवा हे अरुणाचल प्रदेशात प्रवेशासाठीचे चेक पोस्ट आहे. अर्थात, तेथे जाण्यासाठी इनरलाईन परवाना काढावा लागतो. तेथील चेक पोस्टवर याची कसून तपासणी होत असते.
अरुणाचल प्रदेशमध्ये काम करता यावे, म्हणून खरे तर त्यांनी पार्वतीपूरसारख्या सीमारेषेवरील गावात जमीन खरेदी केली होती. परंतु, तेथील चाय इस्टेटमधील चहाच्या मळ्यात काम करणार्या कामगारांची हलाखीची परिस्थिती, त्यांचे पराकोटीचे अज्ञान व शिक्षणाची दयनीय अवस्था पाहून त्यांचे मन हेलावले व त्यांनी या समाजासाठीच यापुढे काम करण्याचे ठरविले. दोघांच्याही सामाजिक आयुष्यातील हा एक मोठा टर्निंग पॉईंट होता! नोव्हेंबर १९८८ ते एप्रिल २००० पर्यंतचा १२ वर्षांचा पार्वतीपूर येथील कामाचा त्यांचा पहिला टप्पा होता. पुढे २००८ पर्यंत त्यांना आईवडिलांच्या आजारपणामुळे महाराष्ट्रात घरी थांबावे लागले होते. याचदरम्यान मोठ्या मुलाचे लग्नही झाले. धाकट्या मुलीचे शिक्षण पूर्ण झाले. या सर्व कौटुंबिक जबाबदारीतून मुक्त होताच, पुन्हा दोघे पार्वतीपूरला परतले व विसावले ते आजपर्यंत...
चायबागान आदिवासी जनजाती समाजाची दयनीय स्थिती
आसाम राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या २० टक्के हा चायबागान आदिवासी जनजाती समाज आहे. एकूण पूर्वांचलातील या समाजाची अंदाजे लोकसंख्या एक कोटींच्या आसपास असावी, असे म्हणतात. या समाजाला असे विशिष्ट नावच नाही. खरे तर या समाजाला ओळखच नाही! जवळपास २०० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी विविध राज्यांतून फसवून, पळवून चहाच्या मळ्यात आणलेले मजूर-गुलाम लोक हीच यांची खरी ओळख आहे. त्याकाळी तेलंगण, विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, ओडिशा, बिहार व बंगाल या राज्यांमधून गरीब लोकांना फसवून, धाकदपटशा दाखवून अथवा प्रलोभने देऊन मोठ्या संख्येत आणला गेलेला हा मागास जातीतील मजूरवर्ग आहे. झारखंड, ओडिशा, छत्तीसगढ येथील आदिवासी समाज यात तुलनेने मोठ्या संख्येने आहे. यांना ‘कुली बंगाली’, ‘सादरी’, ‘संथाल’, ‘आदिवासी’ या नावांनी ओळखतात. हा आसाममधील दुसर्या क्रमांकाचा प्रमुख समाज आहे.
करमपूजा-बिहु-होळी-दिवाळी-कालीपूजा-शिवरात्री-रामनवमी-राखीबंधन वगैरे सण साजरे करत आलेली भारतीय संस्कृती हीच या समाजाची स्वाभाविक संस्कृती आहे. २०० वर्षांत अनेक पिढ्या येथे आसाममध्ये गेल्याने आता अन्य प्रांतांतील मूळ स्थानांपासून हा समाज पूर्णपणे तुटला आहे. आपसात न मिसळल्याने आता मूळ भाषाही विसरला आहे. ‘सदानी’ हीच या समाजाची आता भाषा आहे. त्यावरून या समाजाला ‘सदानी’ म्हणता येऊ शकते. यातील ८० टक्के लोकांना हिंदी समजते, ही जमेची बाजू आहे. आता आसाम हेच या समाजाचे कायमचे स्थान आहे. या समाजाला येथील स्थानिक आसामी लोक ‘बहिरागत’ म्हणतात. याचा अर्थ आसाम बाहेरून आलेले लोक. त्यामुळे या समाजाला सदैव तुच्छतापूर्ण वागणूक मिळाली. लगतच्या लोकांनी यांना स्वस्त मजूर म्हणून वापरले. त्यातील काही धनदांडग्यांनी वेळप्रसंगी त्यांच्यावर अत्याचारही केले. मजुरीच्या कामासाठी पुरुषांना व घरकामासाठी मुलींना नेल्याने पूर्वांचलातील अन्य राज्यांत हा समाज आता पसरला आहे.
या समाजातील घरातील वातावरण हे शैक्षणिक कामासाठी खूप प्रतिकूल आहे. या समाजात साक्षरतेचे प्रमाण तुलनेने खूप कमी आहे. या समाजातील काहींना शिक्षणाच्या संधी आता अलीकडे मिळाल्या असल्या, तरी प्रगतीची गती कमालीची संथ आहे. कारण, पिढ्यान्पिढ्या चालत आलेली गुलामी, आर्थिक तफावत, रंगरुप, शरीरयष्टी, घरची परिस्थिती या गोष्टींमुळे त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊन अनेकजण शिक्षण अर्धवट सोडतात. दबलेला, पिचलेला व मनाने खचलेला समाज आपला आत्मविश्वास, आपली विचारशक्ती गमावून बसतो! दिब्रूगड व तिनसुखिया परिसरात हा समाज काहीसा पुढारलेला आहे, ही काहीशी जमेची बाजू आहे. पण, सिल्चर परिसरात अजून मागासच आहे.
‘भास्कर संस्कार केंद्रा’ची सुरुवात
१९८८ सालच्या वसंत पंचमीला रितसर सरस्वतीपूजन करून ‘भास्कर संस्कार केंद्रा’ची सुरुवात झाली. तेव्हा वीज नसल्याने वर्णेकर पतीपत्नी आपल्या मुलांसह कंदील लावून सायंकाळी ‘शुभं करोति’, सायंप्रार्थना म्हणायला बसत असत. त्याकडेही या सदानी समाजातील छोटी मुले उत्सुकतेने व कुतूहलाने बघत असत. सुरुवातीला घाबरून पळून जाणारी ही मुले आठवडाभरात जवळ यायला लागली. संध्याकाळी आरतीला बसायला लागली. आईवडील मात्र अजिबात बोलत नसत. कितीही बोलायचा प्रयत्न केला, तरी चकार शब्द काढत नसत. त्यांच्या चेहर्यावरील सुरकुतीही हलत नसे. मुलांचे पालक एकतर अरुणाचलमध्ये कामाला जात असत, अथवा स्थानिक वाळू मजुरीने काढायच्या कामाला जात असत. मुले त्यांना विचारलेल्या सर्व प्रश्नांना फक्त हसायची, बोलायची नाहीत. मग जोडीला खेलकुद चालू झाले. त्यातून अधिक जवळीक वाढली. अन्य आसामी मुले गावातील शाळेत जात असली, तरी ही सदानी मुले मात्र अजिबात जात नव्हती. कारण, ही मुले व त्यांचे शिक्षक या दोघांनाही त्यात रस नव्हता. काही शिक्षक तर चक्क दारू प्यायला जात असत. त्यामुळे या समाजातील मुलांना शाळेची गोडी लावणे गरजेचे असले, तरी जिकिरीचे होते. त्यासाठी स्वतंत्रपणे खटपट करावी लागणार होती. इथे २००८ मध्ये गावात म्हणायला वीज आली, परंतु घरोघरी पोहोचायला मात्र २०१५-१६ साल उजाडले. आधी कंदील व नंतर मेट्रोमॅक्स अशी २० वर्षे काढावी लागली.
आता सध्या ७० मुले संस्कार केंद्रात निवासी असतात. ३५ मुले व ३५ मुली. चौथी ते महाविद्यालयीन शिक्षण घेणारी अशी ही मुले आहेत. यांच्या शाळा वेगवेगळ्या असतात. मुले रात्रीच्या जेवणाचे डबे घरून आणतात. झोपायला केंद्रात असतात. शरीर, मन व बुद्धी सतेज बनविण्यावर संस्कार केंद्रात भर असतो. यादृष्टीने मुलामुलींचे मैदानी खेळ, आरती व पद्यगायन, बौद्धिके अथवा वैचारिके नियमितपणे घेतली जातात. पहाटे लवकर उठून मुले शारीरिक कवायत करतात; मग काही वेळ अभ्यास करतात. त्यानंतर घरी जाऊन आपापल्या शाळेत जातात. घरी अजिबातच शैक्षणिक वातावरण नसल्याने इथे राहणे, हे फार आवश्यक होते.
प्राथमिक शाळेची सुरुवात
१९९१ मध्ये लहान मुलांची शाळा चालू झाली. सुरुवातीला शाळेच्या चार झोपड्या बनल्या. संस्कार केंद्रात येणार्या मुलांना त्यांच्या लहान भाऊ-बहिणींना पाठवा, असे सांगितल्यावर लहान मुलांचे येणे सुरू झाले. तिसरी व चौथीला वर्णेकर पतीपत्नी शिकवायचे. दोन मोठी मुले व दोन मोठ्या मुली यांना आग्रहपूर्वक काहीशा जबरदस्तीने शिक्षक बनविले व त्यांना पहिली व दुसरीला शिकवायला लावले. सकाळी ६.३० ते ९.३० अशी शाळेची वेळ असे. त्यानंतर ९.३० ते १०.३० असा अंंघोळीचा तास असे. दर शनिवारी नखे कापणे, कपड्यांचा गुंड्या लावणे असा कार्यक्रम असे. दरवर्षी तीन ते चार मोठ्या मुलामुलींना अथवा शिक्षकांना सुटीत वर्णेकर नागपूरला घेऊन जात असे. त्यांना मोत्याचे दागिने बनविणे, स्क्रीन प्रिंटिंग, इमारतीच्या विटा बनविणे, बुक बाईंडिंग यांचे प्रशिक्षण देत असे. शिक्षक दररोज ११ ते ४ वाजेपर्यंत काम करायचे व त्यातून येणारे उत्पन्न हाच जणू काही त्यांचा पगार असे. विक्रीपैकी पाच टक्के रक्कम संस्थेला देत असे.
१९९९च्या सुमारास ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या सहकार्याने अनौपचारिक पद्धतीने चालणारी शाळा औपचारिक पद्धतीने नियमित भरायला लागली. आता सध्या तेथे बालगट ते पाचवीपर्यंत आसामी भाषेतील ‘विद्याभारती’च्या अभ्यासक्रमावर आधारित प्राथमिक शाळा नित्यनेमाने भरत असते. यात १८० अनिवासी विद्यार्थी येतात. पुण्यातील उत्साही युवक सुश्रुत करवंदे हा येथे गेली पाच वर्षे राहून शाळेच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतो आहे. त्याने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून ‘बी.ए’ (संस्कृत) पूर्ण केले असून सध्या तो रामटेक येथून ‘एम.ए’ (संस्कृत) करत आहे. त्याने येथे शाळेत काम करता करता ‘बी. एड’ही जवळच्या अध्यापक महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. या समाजाची सदानी भाषाही त्याने चटकन आत्मसात केली आहे. आता तो अलकाताईंच्या मार्गदर्शनाखाली शिकविणार्या सातजणांच्या चमूचे मुख्याध्यापक म्हणून नेतृत्व करीत आहे.
२०१० पर्यंत इथे बांबूच्या इमारती होत्या. त्यानंतर टप्प्याटप्याने सिमेंटच्या पक्क्या इमारती बांधणे सुरू आहे. या इमारतींसाठी देणग्या उभारण्यात व शाळा चालविण्यात नागपूरच्या ‘उत्थान न्यासा’चे मोठे योगदान आहे. नागपुरातील बजाजनगर प्रभात संघ शाखेचीही मोलाची साथ आहे. लवकरच स्थानिक न्यासाची निर्मिती करून त्याकडे शाळा व्यवस्थापन व जागा हस्तांतरणासाठी पाठपुरावा चालू आहे.
अन्य शैक्षणिक उपक्रम व उपलब्धी
दरवर्षी दि. १ एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष चालू होत असते. जुलैमध्ये महिनाभर उन्हाळ्याची मुलांना सुटी असते. जुलैमध्ये विशेष शिबिरांचे मुलांसाठी आवर्जून आयोजन केले जात असते. सध्या आठजण संगणक प्रोग्रामिंग भाषा शिकत आहेत. पुण्यातून हर्षद वर्णेकर त्यांना ऑनलाईन शिकवत असतात. बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून अन्यत्र शिकणार्या पाचजणांना दरमहा दोन हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. याचा खूप उपयोग जाणवतो. १९८४ मध्ये खास पूर्वांचलातील राज्यांसाठी म्हणून निरजुली येथे स्थापन झालेल्या प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयात (छएठखडढ) या समाजाचा पहिला विद्यार्थी ‘भास्कर संस्कार केंद्रा’च्या माध्यमातून पाच वर्षांपूर्वी गेला. पाठोपाठ अजून एक गेला. अन्य ठिकाणाहून आणखी तीनजण गेली. आतापर्यंत एकूण पाचजणांनी तेथे प्रवेश घेतला आहे, ही खूप मोठी उपलब्धी आहे! दोन मुले शिवसागर येथे ‘बी. एस्सी’ करत आहेत. एका मुलीने नागपूर येथील ‘देवी अहिल्या मंदिर’ येथे वास्तव्याला राहून वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. एकीने रुद्रपूर येथील ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या छात्रावासात राहून ‘एम. कॉम’ पूर्ण केले. दहा निवडक मुले पार्वतीपूरमधील सांदिपनी विद्यालयात ‘सीबीएससी’चे शिक्षण घेत आहेत.
आव्हानात्मक परिस्थितीतील मुलांची शिक्षणे
या दाम्पत्याचा मुलगा हर्षद याचे पाचवी ते दहावीपर्यंतचे व मुलगी मधुरा हिचे पाचवीपर्यंतचे शिक्षण पार्वतीपूरला राहून पण नहारलगूनच्या ‘सीबीएससी’ केंद्रीय विद्यालयाच्या शाळेत झाले. पार्वतीपूरपासून नहारलगून हे १९ किमी आहे. १९९६ मध्ये मुलगा पुढील शिक्षणासाठी नागपूरला गेला. त्याने संगणक विषयात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले व आता तो संगणक अभियंता म्हणून पुण्यात कार्यरत आहे. मधुराचे सहावीपासूनचे पुढील शिक्षण नागपूरला ‘बीएस्सी’पर्यंत झाले.त्यानंतर तिची ‘एसएसबी’ या स्पर्धा परीक्षेतून निवड होऊन ती हवाई दलात २००४ मध्ये वैमानिक झाली. पुढे १५ वर्षे हवाई दलामध्ये वैमानिक म्हणून काम केल्यानंतर, अधिकृत कमिशन संपल्यावर निवृत्त होऊन ती आता एका खासगी एअर लाईन्समध्ये कार्यरत आहे. यात विशेष नमूद करण्यासारखे म्हणजे, हर्षद व मधुरा यांचे नागपुरातील शिक्षण हे वर्णेकर यांचे ज्येष्ठ बंधू डॉ. चंद्रगुप्त व कनिष्ठ बंधू श्रीनिवास यांच्या घरी राहून पूर्ण झाले. एकत्रित वर्णेकर कुटुंबाचे पाठबळ या एकूण सामाजिक कार्यामागे कसे आहे, हे यातून ध्यानात घेण्यासारखे आहे विशेष वाहतुकीच्या सुविधा नसताना हर्षद व मधुरा यांनी १९ किमी अंतरावर शाळेत जाऊन सर्व अडचणींवर मात करत पूर्ण केलेले शिक्षण हाही एक कौतुकाचा विषय आहे. सामाजिक कार्यकर्त्याच्या वाट्याला त्यांच्या स्वतःच्या मुलांच्या भवितव्याविषयीची चिंता वाट्याला न येणे, हीपण एक समाधानाची व स्वस्थतेची बाब असते.
सेवाकार्याची दाखल घेत प्राप्त झालेले विविध पुरस्कार
गोविंदगिरिजी महाराज यांच्या अमृतोत्सवानिमित्त फेब्रुवारी २०२४ मध्ये आळंदी येथे झालेल्या कार्यक्रमात निवडक व्यक्तींना विशेष पुरस्कार, तर जून २०२४ मध्ये मुंबईला ‘महाराष्ट्राचा सन्मान’ हा पुरस्कार देण्यात आला. त्यात वर्णेकर दाम्पत्याचा समावेश होता. यापूर्वी त्यांना वर्ष २०२३ मध्ये कृष्णकांत गांधी यांच्या नावाने ‘जनजाती पुरस्कार’ व ‘लायन्स क्लब’तर्फे ‘कर्मयोगी पुरस्कार’ प्राप्त झाले. वर्ष २००० मध्ये ‘लोककल्याण समिती’तर्फे ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्राप्त झाला. याशिवाय, कोलकाता येथील ‘कुमारसभा पुस्तकालय’तर्फे ‘विवेकानंद पुरस्कार’ही मिळालेला आहे. विलेपार्ले येथील ‘टिळक स्मारक समिती’ यांच्यातर्फे ‘आगरकर पुरस्कार’ हा श्रीराम लागू यांच्याहस्ते मिळालेला आहे.
सदनी समाजाच्या अस्तित्वाचा व अस्मितेचा लढा
ख्रिश्चन धर्मांतराचा मोठा धोका या सदानी समाजाला आहे. आत्ताच हा समाज १५ ते २० टक्क्यांच्या आसपास ख्रिश्चन झाला आहे, असे मानले जाते. धर्मांतरित झालेला दलित अथवा आदिवासी समाज हा जसा पुढे हिंदूविरोधी होण्याचा धोका असतो, तो इथेही आहेच. इथे तर हा प्रदेश भारतापासून तोडण्याचाही धोका आहे. त्यासाठी वेळप्रसंगी बांगलादेशी लोकांशी हातमिळवणी करण्याची कुबुद्धी कोणत्या हितसंबंधांतून या समाजाला झाली तर? याची कल्पना न केलेलीच बरी! पूर्वांचलात वेळोवेळी भारतविरोधी चळवळी जोरकसपणे उभ्या राहिल्या. प्रसंगी येथील सर्वसामान्य लोकांनीही त्यांचे समर्थन केले होते. परंतु, हा सदानी समाज मात्र सदैव भारताशी एकनिष्ठच राहिला, ही केवढी भाग्याची गोष्ट आहे! ही आशा टिकून राहण्यासाठी या समाजात जोरकसपणे काम होण्याची नितांत आवश्यकता आहे. या समाजाच्या वाट्याला इतरांची आपुलकी व प्रेम वाट्याला येण्याची गरज आहे. आसाममधील शिल्लक आहेत, ते हिंदू वाचविले पाहिजेत. संकुचिततेकडे झुकणारी आसामी प्रादेशिक अस्मिता आता व्यापक करून त्यात वर्षानुवर्षे व अनेक पिढ्या राहणारे, बिहू नृत्य करणारे बिहारी, बंगाली व मारवाडी यांना सामावून घेत त्यांना आता ते आसामीच आहेत, असे मानावे लागेल.
आता सध्या शासनाने पुढाकार घेऊन सदानी लोकांसाठी गेल्या दोन वर्षांमध्ये दोन टप्प्यांत १८० शाळा उघडल्या आहेत.सध्या त्या आठवीपर्यंत असून लवकरच दहावीपर्यंत होतील, अशी अपेक्षा आहे. ही मोठी आशादायक घडामोड असली तरी शैक्षणिक गुणवत्ता हे यापुढील मोठे आव्हान आहे. असे झाले तर ही शिकलेली पहिल्या पिढीतील मंडळी इतरांच्या स्पर्धेत टिकू शकतील. ख्रिश्चन मिशन शाळांच्या मुकाबला करू शकतील, या तोडीच्या ‘सीबीएससी’ शाळा राष्ट्रवादी विचारधारेशी जवळीक सांगणार्या संस्थांनी या समाजासाठी चालू करणे गरजेचे आहे. त्यातून सदानी समाजातील नव्या पिढीमध्ये आत्मसन्मान जागविण्याचे काम करता येईल.
संघानेही आता अलीकडे ‘चहा जनगोष्टी शिक्षा संस्कृती न्यास’ या नावाने २०२२ मध्ये सदानी समाजासाठी काम करण्यासाठी स्वतंत्र संस्था नोंदणी करून कामकाजास सुरुवात केली आहे. ‘विवेकानंद केंद्रा’च्या माध्यमातून या समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी ‘आनंदालय’ उपक्रम चालविला जात आहे. यामागे आता अपेक्षित मनुष्यबळ व अर्थबळ जोडण्याची जबाबदारी आता एकूणच सर्व समाजाची आहे. या समाजाची ओळख निर्माण करण्याचे आव्हान आता सामूहिकरित्या पेलावे लागेल. नव्हे, ती आपली जबाबदारीच आहे!
विवेक गिरिधारी
९४२२२३१९६७
(अधिक माहितीसाठी संपर्क- अशोक वर्णेकर - ९८३४३१०१३३, अलकाताई वर्णेकर - ९९५४३२७४५७)