भारतीय वैचारिकतेचा मूलाधार

    08-Jan-2025
Total Views |
 Indian Ideology

सध्या भारतीय संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृती यांच्या मिश्रणाने एका वेगळीच समस्या भारतीयांसमोर उभी राहिली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये असलेले तत्वज्ञानातून त्यांचे मानस तयार झाले आहे, तर नेमके त्याच्या विरोधी विचार असलेली संस्कृती स्वातंत्र्यानंतर समाजात दृढ होत आहे. या समस्येच्या निराकरणाच्या दृष्टीने समस्येचे केलेले चिंतन...

दरवर्षी गणेशोत्सव, दसरा-दिवाळी किंवा होळी हे सण जवळ आले की, ‘उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करा’ असे संदेश येतात. मग ‘आमच्याच सणांना हे सगळे का आठवते?’ असे प्रतिवादही येतात. सर्वसामान्य भारतीय म्हणून आपल्याला दोन्ही बाजू पटतात. मग नेमके काय करावे हे न कळल्याने, आपण गोंधळून जातो. मागच्या लेखात म्हटले तसे याचे सोपे उत्तर काढता येणार नाही. म्हणून समस्येचे योग्य आकलन महत्त्वाचे ठरते. खोलात गेल्यास आपण असे म्हणू शकू की, परस्परांशी मेळ न खाणार्‍या अशा विचारधारांच्या संघर्षातून हे प्रश्न निर्माण झाले आहेत.

आज आपण खोलात जाऊन पाहिले, तर आपल्या दैनंदिन वर्तनात आपण वेगवेगळ्या, कधीकधी परस्परविरोधी अशा तत्त्वांचे अनुसरण करत असतो. उदाहरणार्थ, आजच्या जागतिक व्यवस्थेनुसार चालणार्‍या कार्यालयांच्या अवकाशातील आपले वर्तन आणि घरी आल्यावर कौटुंबिक अवकाशातील आपले वर्तन, हे दोन्ही बरेचदा भिन्न तत्त्वांनुसार चाललेले असते. यातील अंतर्विरोध कधी आपणास जाणवतही नाही, तर कधी तो अत्यंत तीव्र अशा मानसिक विकारांचे कारण ठरतो.

स्वाभाविकपणे इथे हा प्रश्न उद्भवतो की, हे प्रश्न किंवा तसेच इतर कोणतेही बहुआयामी प्रश्न सोडवण्यासाठीची आधारभूत तत्त्वप्रणाली कोणती? अशा कोणत्याही तत्त्वप्रणालीची चर्चा करण्यापूर्वी तिच्या निर्माणास आवश्यक अशा घटकांचा विचार करायला हवा. अशा सर्व विषयातील विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, काही संदर्भबिंदू आवश्यक आहेत. असे संदर्भबिंदू आपल्या जीवन व्यवहारातील मूल्ये, आपली सांस्कृतिक व सामाजिक जडणघडण तसेच, समाजव्यवहारांवर प्रभाव टाकणारे वैचारिक प्रवाह यातून निश्चित होतात. असाच एक सहज लक्षात येणारा संदर्भबिंदू म्हणजे रामकथा. आजही आपली पुस्तके, चित्रपट, नाटके, राजकीय किंवा सामाजिक भाषणेही एखादा मुद्दा ठसवण्यासाठी, रामायणातील प्रसंगांचा आधार घेताना आपण पाहतो. रामाचे जीवन हाच आदर्शाचा मापदंड अशा प्रकारची मांडणी, सूचक अथवा उघडपणे केली जाते आणि ती स्वीकारलीही जाते. एक वर्षापूर्वीच रामजन्मभूमी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्व समाजाने मिळून, मोठ्या उत्साहाने साजरा केला. स्वाभाविकपणे भारतीय समाजासाठीच्या आधारभूत तत्त्वप्रणालीसाठी, रामकथा हा महत्त्वाचा संदर्भ बिंदू ठरतो. असे अनेक संदर्भबिंदू मिळून एक सामाईक संदर्भ चौकट निर्माण करतात.

हे सर्व पाहता जो स्वाभाविक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे, भारतासाठी योग्य संदर्भ चौकट कोणती? कोणतीही संदर्भ चौकट ही समाजाच्या आचरणातून स्वाभाविकपणे निर्माण व्हावयास हवी. तशी ती नसेल, तर समाजाचे आचरण त्या दिशेस वळवणे हे अत्यंत कष्टप्रद व कित्येकदा अमानुष कृत्यास प्रवृत्त करणारे ठरू शकते. भारतीय समाजमानस ही काही कोरी पाटी नव्हे. शतकानुशतकांचा इतिहास, या भूमीवर निवास करणार्‍या समाजाच्या एकात्मिक मानसावर खोल ठसे उमटवून गेलेला आहे. काळाच्या चाळणीतून बघताना त्यातील काही बिंदू ज्यांचे महत्त्व समाजास अधिक वाटले, ते हजारो वर्षांनंतरही टिकून राहिले आहेत. प्रचलित पाश्चात्त्य जीवनविषयक संकल्पनांशी तुलना करता, भारतीय चिंतनाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे जाणवतात.
१.व्यक्तीचे अंतिम गंतव्य: पाश्चात्य तत्त्वज्ञान हे मानवकेंद्रित असून, त्यात व्यक्तीच्या सुखाचा विचार हा सर्वोपरि मानला जातो. सुखप्राप्तीच्या विविध मार्गांच्या विचारातून त्यांच्याकडे भांडवलवाद, समाजवाद आदि प्रणाली निर्माण झाल्या. आपल्याकडे मात्र व्यक्तीस संपूर्ण सृष्टी चक्राचा एक भाग मानून, परमेश्वरप्राप्ती, मोक्ष वा निर्वाणाचे अंतिम ध्येय ठेवले आहे. त्यामुळे ऐहिक सुखोपभोगापेक्षा शाश्वत आनंद अधिक महत्त्वाचा मानला गेला आहे.

२.भौतिक व पारमार्थिक यांची सांगड: भारतीय संस्कृती केवळ पारलौकिकाचाच विचार करते, हा एक सामान्य गैरसमज आहे. वस्तुतः भारतीय साहित्यात अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, व्याकरण, वैद्यक, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र याविषयी विपुल लेखन उपलब्ध आहे. मात्र या शास्त्रशाखांकडे पाहण्याचा भारतीय दृष्टिकोन भिन्न आहे. आपण चतुष्टय पुरुषार्थ संकल्पना मांडून, त्यात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चौघांनाही स्थान दिले आहे. मात्र, धर्म आणि मोक्ष यांनी अर्थ व कामाचे नियमन करावे, असे आपली संस्कृती सांगते. त्यामुळे ऐहिक व्यवहार आणि पारलौकिक व्यवहार यात दूर अंतर राखणारी ‘सेक्युलरिझम’ सारखी संकल्पना, आपल्या चित्तप्रवृत्तीशी विसंगत ठरते.

३.चक्राकार कालसंकल्पना: ‘चार युगे’, ‘महायुग’ इत्यादी कालगणनेच्या संकल्पनांमुळे, भारतीय समाज काळाचा मोठा आवाका समजून घेतो. त्याची चक्राकार गती गृहीत धरली जाते. मानवी अस्तित्वाचे नगण्यत्व स्वाभाविकपणे स्पष्ट होऊन, समाज परिस्थितीचीसुद्धा चक्राकार गती मानली जाते. काळ हा अनादी अनंत असणे हे आपल्यासाठी स्वाभाविक आहे. मानवी जीवनही चक्राकार असून, मृत्यू ही अंतिम अवस्था न मानल्याने, सारे काही याच जन्मात प्राप्त करून घेण्याच्या शर्यतीत आपला सहभाग नसतो. पाश्चात्य संकल्पनेत मात्र विश्वाला निश्चित आरंभ असून, विश्वाचा क्रमविकास होत असतो. त्यामुळे मानवी समाजसुद्धा, सतत चढत्या श्रेणीने अधिकाधिक भौतिक सुखांकडे जाणे हे त्यांना स्वाभाविक वाटू शकते. अशा चढत्या श्रेणीतील सुखाची संकल्पना चिरस्थायी (Sustainable) असेल काय? या प्रश्नाचा विचार त्यांच्याकडे फारसा होत नाही.

४.‘वसुधैव कुटुम्बकम्’ भारतीय राष्ट्र संकल्पना ही मूलतः संकुचित प्रवृत्तीची नाही. सर्व जीवांमध्ये एकाच परब्रह्माचा वास असल्याने, सर्व दृश्यमान भिन्नता या केवळ वरवरच्या आहेत असे आपण मानतो. परमत सहिष्णुता हे त्यामुळे भारतीय संस्कृतीतील स्वाभाविक मूल्य आहे. सर्वच जण एका विशाल कुटुंबाचा भाग असल्याने, अधिकारांच्या चळवळीचे स्थान उरत नाही. धर्म हाच समाजव्यवहारातील सर्व बाबींचा मूलभूत संदर्भबिंदू बनतो.

या भारतीय चिंतनाच्या गुणात्मक भिन्नत्वाचा विचार करता, भारतीय संस्कृतीच्या संचितावर घट्टपणे उभी असलेली संदर्भ चौकट निर्माण करणे भारतीय समाजासाठी आवश्यक आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जे नेतृत्व भारतास लाभले, ते या विचाराशी अजिबातच सहमत नव्हते. विशेषतः इंग्रजी शिक्षणातून तयार झालेल्या पिढीस, भारताच्या प्राचीन इतिहासाची फारशी आस्था नव्हती. त्यामुळे भारतीय समाजास त्याच्या आवश्यकतानुसार विवक्षित संदर्भ चौकटीची आवश्यकता आहे, हे त्यांच्या ध्यानात आले नाही. या सर्व स्वातंत्र्योत्तर विचारप्रवाहांचा परिपाक म्हणून, आज आपली परिस्थिती ही दोन नावांवर पाय ठेवलेल्या प्रवाशासारखी झाली आहे. एक नाव आपणास अधिकाधिक पाश्चात्य होण्याच्या दिशेने ओढून नेते आहे, तर दुसरा पाय पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या संस्कारांशी घट्ट बांधला गेलेल्या अशा वेगळ्याच प्रवाहाच्या ओढीने चालला आहे. या परिस्थितीवर योग्य उत्तर वेळीच शोधले गेले नाही, तर कदाचित संपूर्ण समाजपुरुष दुभंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुर्दैवाने आजही भारतीय समाजाच्या नेतृत्वामध्ये या विषयात अजिबात एकसूत्रता नाही. आपल्या सनातन संस्कृतीशी जोडली गेलेली एक विचारसरणी आणि पाश्चात्य समाजाच्या भौतिक प्रगतीमुळे भारावून गेल्याने, त्यांच्या वैचारिक पृष्ठभूमीला श्रेष्ठ समजणारी आणि त्यावर हुकूम आपली समाजरचना बदलू इच्छिणारी दुसरी विचारसरणी, या दोन्ही भारताची संदर्भ चौकट आपल्या दिशेला वळवण्याचा सतत प्रयत्न करत असतात. भारतीय समाजात उद्भवणारे वैचारिक कलह हे बहुतांश वेळा, या भिन्न विचारधारांचे संघर्ष आणि भारतीय जनमानसावर संपूर्ण आधिपत्य स्थापण्याचा त्यांचा प्रयत्न यातून घडतात असे आपणास दिसून येते.

नवीन संदर्भ चौकटीची आवश्यकता जरी लक्षात आली, तरी दीडशे वर्षांची गुलामी आणि स्वातंत्र्यानंतर चालू ठेवलेल्या बौद्धिक पारतंत्र्याच्या वसाहतवादी कारभारामुळे त्या प्रयत्नांची सुरुवात कोठून करायची, हा मोठा प्रश्न उभा राहतो. म्हणून संदर्भ चौकटीच्या निर्माणाचा मार्ग शोधण्यापूर्वी, अशा चौकटीत कोणते गुणधर्म हवे आहेत त्याचा विचार आवश्यक ठरतो.प्रचलित पाश्चात्य संदर्भ चौकटीचा इहवादी दृष्टिकोन सोडून देऊन, भारताच्या आध्यात्मिक प्रवृत्तीशी साधर्म्य सांगणारी, आमच्या सांस्कृतिक संचिताचा मूलाधार असलेली संदर्भ चौकटच इथल्या समाजासाठी योग्य ठरेल. मात्र, सर्वच उत्तरे इतिहासातून मिळतील असा भाबडा समज पण करून चालणार नाही. योग्य वाटणारा प्रत्येक संदर्भबिंदू सर्व अंगांनी चर्चा घडवून तावून सुलाखून घेतला पाहिजे. पूर्ण सुसज्ज चौकट उभारण्यापेक्षा, प्राथमिक लक्ष्य एक ढोबळ ढाचा उभा करण्याचे असायला हवे. असा ढाचा उभारणे ही या भगीरथ प्रयत्नातील पहिली पायरी आहे. असा ढोबळ ढाचा सर्वमान्य असेल असेही नाही. मात्र, त्यावर साधकबाधक चर्चा घडवून, त्यात हळूहळू सुधारणा करता येतील. या संदर्भ चौकटीला नेमका आकार येत जाईल. यातूनच आपल्या आचार विचारांमधील दुभंग दूर होऊन एक समाज म्हणून पुढे वाटचालीचा पुढचा मार्ग आपणास सापडू शकेल.

डॉ. हर्षल भडकमकर
(लेखकाने मुंबईतील टी.आय.एफ.आर. येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’पर्यंत शिक्षण घेतले आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत आहेत. ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य अशी जबाबदारी आहे.)
९७६९९२३९७३