मुंबई : 'होणार सुन मी या घरची' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान मालिका, चित्रपटांतून विविधांगी भूमिका साकारताना दिसली. नुकताच तिचा आणि सुबोध भावेचा हॅशटॅग तदेव लग्नम् हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याशिवाय स्टार प्रवाह वाहिनीवर तिची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका विशेष गाजत होती. मात्र, आता या मालिकेतून तेजश्रीने एक्झिट घेतल्याचे समोर आले आहे. मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असताना तेजश्रीने हा मोठा निर्णय घेतल्यामुळे तिचे चाहते अचंबित झाले आहेत.
तेजश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिले आहे की, "कधी कधी तुम्हाला बाहेर पडावं लागतं. तुमचं महत्त्व जाणून घ्या आणि तुमच्या असण्याचा आदर करा, कारण तुमच्यासाठी हे दुसरं कोणीही करणार नाही स्वत:च ओळखा”.
तेजश्रीने 'प्रेमाची गोष्ट' मालिका का सोडली याचे अद्याप ठोस कारण समोर आले नाही आहे. मात्र, लवकरच तेजश्री इतर नव्या प्रोजेक्ट्समध्ये दिसेल असे सांगण्यात येत आहे.