भारतीय संस्कृतीत लग्नाला अत्यंत पवित्र मानले जाते. हिंदू धर्मामध्ये तर विवाह पद्धतीला १६ संस्कारांपैकी एक महत्त्वपूर्ण संस्कार मानला जातो. मधल्या काळात ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’चा ट्रेण्ड आला होता. स्त्री-पुरुष लग्न न करता दोघेही ‘लिव्ह-इन’मध्ये राहत आहेत असे एखाद्यास कळले की, त्याच्या भुवया उंचावल्याच म्हणून समजा. मात्र, सध्या सिंगापूरमध्ये विवाहासंदर्भात आलेला नवा ट्रेण्ड सिंगापूरसाठी डोकेदुखी ठरला आहे. सिंगापूरमधील पुरुष आणि परदेशी महिला यांच्यात ‘खोटे लग्न’ किंवा ‘सोयीचे विवाह’ करण्याचा प्रकार वाढत आहे. हे सर्वकाही सुरू आहे, ते फक्त तेथील नागरिकत्व मिळवण्यासाठीच्या उद्देशाने आणि वैयक्तिक फायद्यासाठी!
‘इमिग्रेशन अॅण्ड चेकपॉईंट्स ऑथोरिटी’ (आयसीए) ही गृहमंत्रालयाअंतर्गत कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था आहे. ‘आयसीए’च्या आकडेवारीनुसार २०२३ साली, अशा खोट्या विवाहांची संख्या चार होती, ती २०२४ साली जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान ३२ पर्यंत वाढली. सिंगापूरमधील ‘द स्ट्रेट्स टाइम्स’ या दैनिकातील एका अहवालातून हे प्रकरण उघडकीस आले आहे. सिंगापूरमध्ये राहणार्या एका व्यक्तीने, व्हिएतनामहून आलेल्या महिलेशी लग्न केले होते. लग्नाच्या कागदपत्रांनुसार दोघांचा बर्याच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. परंतु, जेव्हा ‘आयसीए’ला संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती मिळाली, तेव्हा त्यांच्या राहत्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती.
सिंगापूरमध्ये राहण्यासाठी किंवा काम करण्यासाठी परवाना मिळवा, याकरिता परदेशी स्त्रिया ‘इमिग्रेशन’च्या कायद्यातील पळवाटा शोधतात. प्रामुख्याने परदेशी स्त्रिया रॅकेट चालवतात, ज्यात त्या ‘इमिग्रेशन’चे फायदे शोधतात असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ‘आयसीए’च्या गुप्तचर विभागाकडून ही एक सामाजिक समस्या असल्याचे म्हणत, अशा विवाहांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यामुळे सिंगापूरच्या नागरिकांकरिता विविध धोके उद्भवू शकतात, असे म्हटले जात आहे. त्यापैकी महत्त्वाचा धोका कोणता तर सिंगापूरमधील पुरुषांना, पैसे कमावण्याचा हा मार्ग सोपा वाटू शकतो. ‘आयसीए’ सध्या या ट्रेण्डचा पर्दाफाश करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारच्या विवाहात सामील असलेल्या लोकांना, दहा वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दहा हजार सिंगापूर डॉलर्सपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीमुळे, जून २०२४ साली ‘आयसीए’ने सहा व्हिएतनामी स्त्रिया आणि सात सिंगापूरच्या पुरुषांसह १३ व्यक्तींवर , अशा प्रकारच्या विवाहात कथित सहभाग असल्याचे आरोप केले आहेत.
अशा प्रकारचे विवाह हे दोन जण एकमेकांवर प्रेम करतात म्हणून नव्हे, तर यातून काही फायदा मिळावा हा त्यामागचा उद्देश असतो. बर्याचदा काही कायदेशीर, आर्थिक किंवा सामाजिक फायदे मिळविण्यासाठी ते केले जातात. वास्तविकपणे इमिग्रेशन किंवा इतर नियमांपासून बचाव करण्यासाठी केलेले असे खोटे विवाह, अनेक देशांमध्ये बेकायदेशीर मानले जातात. आपली उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संबंध ठेवले जातात आणि त्यानंतर जोडपे त्यांच्या वेगळ्या मार्गाने जातात. नागरिकत्व देण्याप्रमाणेच सामाजिक सुरक्षितता, टॅक्स बेनिफिटसारख्या गोष्टींचा लाभ घेण्यासाठी, आर्थिक लाभ किंवा व्यावसायिक हेतूंसाठी किंवा कौटुंबिक अथवा सामाजिक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अशा पद्धतीचे विवाह केले जातात. कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, नेदरलॅण्ड, फिनलंड आणि न्यूझीलंडसारखे देश जोडीदार आणि भागीदारांना त्या देशात काम करण्याची परवानगी देतात. तर हाँगकाँग आणि अमेरिकेसारखे देश फक्त विवाहित जोडीदारांनाच काम करण्याची परवानगी देतात.
धार्मिकदृष्ट्या सिंगापूरची लोकसंख्या पाहिल्यास, इस्लाम हा तिसर्या क्रमांकावर आहे. त्यातच अशा पद्धतीने एखाद्या परदेशी महिलेचा विवाह जर सिंगापूरमधील इस्लामिक कट्टरपंथी असलेल्या व्यक्तीशी झाला, तर त्या महिलेचे धर्मांतर होऊन ‘लव्ह जिहाद’ची शक्यता नाकारता येणार नाही. कारण, कमी पैशात नागरिकत्व मिळण्याचे आमिश दाखवून, अशा घटना निश्चितच घडू शकतात. इतर धोक्यांप्रमाणे हाही एक धोका लक्षात घेता, अशा पद्धतीने विवाह करणार्या महिलांना वेळीच जागरुक करणे आवश्यक आहे. तसेच, कायद्याचे उल्लंघन करून जर विवाह होत असतील, तर त्यावर कारवाई होणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.