प्रयागराजमध्ये भरणारा कुंभमेळा उधळून लावण्याचे विधान खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंत पन्नू याने केले आहे. कुंभमेळा हा हिंदू धर्मातील सर्व पंथ, संप्रदाय आणि साधूंना एकत्र आणणारा जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव. प्रयागराजमधील कुंभमेळ्याला हजारो वर्षांची परंपरा असून, हा उत्सव केवळ धार्मिक श्रद्धेचा नव्हे, तर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकतेचा महान प्रतीक आहे. सनातन हिंदू धर्मातील विविध परंपरांमध्ये विविधता असूनही, कुंभमेळा सर्व पंथांना एका सूत्रात बांधतो. मात्र, गुरुपतवंत पन्नूचे विधान म्हणजे त्याच्या दहशतवादी अजेंड्याचा एक भाग आहे. पन्नूला ना शीख संप्रदायाबद्दल काही ज्ञान आहे, ना या संप्रदायांच्या परंपरांचा सन्मान. त्याला फक्त हिंदू धर्मातील संप्रदायांमध्ये तेढ निर्माण करून स्वतःच्या मालकांची मर्जी राखण्यातच रस आहे. आजवर त्याने खलिस्तानची खोटी स्वप्ने दाखवून पंजाबमधील शीख बांधवांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्याला यश आले नाही. कारण, पन्नू समजतो तसा भारत देश हा काही अनेक राज्ये एकत्र येऊन निर्माण झालेला भूप्रदेश नाही. तर, भारतातील प्रत्येक भाग हा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक एकतेने एकमेकांशी जोडला गेला आहे.
शीख संप्रदायाचेही हिंदू धर्माशी असलेले नाते असेच अतूट आहे. शीख संप्रदायातील अनेक गुरूंनी कुंभस्नानाचे महत्त्व ओळखून, त्याचा लाभ घेतल्याचा इतिहास आहे. गुरू नानकदेवजी, गुरू अमरदासजी आणि गुरू हरकिशनदासजी या शीख संप्रदायातील गुरूंनी, कुंभमेळ्यात स्नान केले होते. आजही गुरू नानकदेवजी यांच्या शिकवणीचे तंतोतंत पालन करणारे उदासी पंथातील साधू, या उत्सवाचा महत्त्वाचा भाग आहेत. शीख संप्रदायाचे कुंभस्नानाशी असलेले हे सुंदर नाते, पन्नूला कसे ठाऊक असेल? त्याचे उभे जीवन वाया गेले ते निव्वळ हिंदू धर्मामध्ये फूट पाडण्याचा निष्फळ प्रयत्न करण्यात. त्यामुळे त्याने कितीही विखार ओकण्याचा प्रयत्न केला, तरी या सनातन हिंदू परंपरेतील विविध संप्रदायांमध्ये असलेला बंधुभाव, स्नेह आणि आदरभाव हाच पन्नूच्या विकृत अजेंड्यासाठी पुरेसा आहे. कुंभमेळा हा केवळ हिंदू धर्मालाच नव्हे, तर भारताच्या सांस्कृतिक वारशालाही नवीन ऊर्जा देणारा उत्सव आहे. पन्नूच्या स्वार्थी आणि कपटीबाज बुद्धीला आजवर सनातन हिंदू परंपरेतील वरवरचे सांप्रदायिक वैविध्यच दिसले. मात्र, या सर्व संप्रदायांच्या अंतरंगात असणारा बंधुभावाचा जिव्हाळा या कुंभमेळ्यातील सांप्रदायिक एकीतून दिसेल, हे नक्की.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी “केंद्र सरकार कुंभमेळ्याएवढा खर्च गंगासागर यात्रेवर करत नाही,” असा आरोप करत, गंगासागर यात्रेला राष्ट्रीय दर्जा देण्याची मागणी केली आहे. मागणी जरी चांगली असली, तरी पश्चिम बंगालमधील हिंदूंच्या हिताचे काय? या प्रश्नाचे उत्तर ममता बॅनर्जी कधी देणार याची वाट अखिल हिंदू बघतो आहे. मात्र, त्याची नशिबी वाट बघण्याशिवाय आजवर तरी काहीही आलेले नाही. ममता बॅनर्जी या नेहमीच मुस्लीम समाजाच्या हितासाठी कार्य करत असल्याचे दिसून आले आहे. राजकरणाच्या या तुष्टीकरणाच्या माध्यामातूनच त्यांनी, पश्चिम बंगालमध्ये मुस्लीम मतदारांची एकगठ्ठा मतपेटी तयार केली आहे. या मतदारांना खुश करण्यासाठी ममता बॅनर्जी यांचे सरकार विविध उपाययोजना करत असते. एवढी संवेदनशीलता हिंदूंसाठी त्यांनी कधीच दाखवलेली नाही. उलटपक्षी विशेषतः २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत, फक्त जय श्रीराम अशा घोषणा दिल्यामुळे जनतेला गाडीतून उतरून झापताना देशाने पाहिले आहे. आज मात्र, अचानक ममता बॅनर्जी यांना गंगासागर यात्रेचे स्मरण होत आहे, हे विशेष म्हणावे लागेल.
पण, हे विशेष घडले ते बांगलादेशातील सत्तांतरामुळे. बांगलादेशात युनूस सरकारने सत्ता हाती घेतल्यापासून तेथील हिंदूंवर अत्याचार वाढतच आहेत. यामुळे पश्चिम बंगालमधील हिंदूंच्या भावनादेखील दुखावल्या गेल्या आहेत. परिणामी, याविरोधात मोर्चे आणि निषेधाच्या माध्यमातून पश्चिम बंगालमधील हिंदू जनमत संघटित होत आहे. मुस्लीम तुष्टीकरणाच्या धोरणामुळे हा संघटित हिंदू काहीही केल्या ममता यांना मतदान करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आमचे सरकार हिंदू हिताचादेखील विचार करते, हे भासवण्यासाठी ममता बॅनर्जी बांगलादेशातील हिंदूंचा प्रश्न असो वा आताचा गंगासागर यात्रा असो, अशा विषयांवर बोलून हिंदू मतपेटीमध्ये विभाजन करु पाहत आहे. यासाठी, त्यांनी प्रयागराजमधील कुंभमेळा विरुद्ध पश्चिम बंगालमधील गंगासागर यात्रा असे चित्र उभे केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बंगाली अस्मिता चाळवण्यासाठी हा विषय मोठा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे नाटक उत्तम वाटावे यासाठीच, ममता बॅनर्जी आजकाल हिंदू हिताचा कैवार आल्यासारख्या विधाने करत आहेत. मात्र, त्यांचे हे वागणे म्हणजे, ‘सो चुहे खाकर बिल्ली चली हज को’ या म्हणीला अनुसरूनच म्हणावे लागेल.