रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना मिळणार कॅशलेस उपचार
- केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
08-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : (Nitin Gadkari) केंद्र सरकार रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना कॅशलेस उपचार देणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी कॅशलेस उपचार योजनेची घोषणा केली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारत मंडपम येथे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिवहन मंत्र्यांची नुकतीच बैठक घेतली. यामध्ये केंद्र आणि राज्य यांच्यातील वाहतूकविषयक धोरणे आणि सहकार्य यावर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री म्हणाले की, केंद्र सरकारने कॅशलेस उपचार योजना सुरू केली आहे. या अंतर्गत अपघातानंतर 24 तासांच्या आत पोलिसांना माहिती दिल्यास दाखल झालेल्या रुग्णाच्या उपचाराचा सात दिवसांचा खर्च आणि उपचारासाठी जास्तीत जास्त दीड लाख रुपये केंद्र सरकार देणार आहे. यासोबतच हिट अँड रन प्रकरणातील मृतांना २ लाख रुपये देण्यात येणार आहेत, असेही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी म्हटले आहे.
रस्ते अपघातात जलद उपचार मिळावेत यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सहा राज्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प म्हणून कॅशलेस उपचार योजना लागू केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आसाम, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तराखंड आणि पुद्दुचेरीमध्ये पथदर्शी प्रकल्प म्हणून ही योजना यशस्वी झाली आहे. आतापर्यंत या माध्यमातून २१०० लोकांचे प्राण वाचले आहेत. आता त्याची संपूर्ण देशात अंमलबजावणी होत आहे, असेही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी नमूद केले आहे.