दिव्यांगांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ‘अतुल्य इनक्लुसिव्ह सेल’ हा समूह विशेषतः दृष्टिहीन मुलांसाठी अनेक विध उपक्रम राबवित आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांची शिक्षणाप्रतिची निष्ठा, चिकाटी आणि अडचणींवर मात करण्याची जिद्द लक्षात घेता, या उपक्रमात सहभागी असलेल्या समूहाला ‘अतुल्य’ असे नाव देण्यात आले. दि. २७ सप्टेंबर २०२२ रोजी प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक, प्राध्यापक स्वप्नील मयेकर आणि प्राध्यापिका डॉ. शेफाली कोंडेवार यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कल्याणकारी उपक्रमात, महाविद्यालयातील अनेक तरुण-तरुणी समूहाशी जोडले गेले आहेत. नुकत्याच संपन्न झालेल्या ‘जागतिक ब्रेल लिपी दिना’निमित्त या समूहाच्या कार्यशैलीचा परिचय करुन देणारा हा लेख...
ठाणे येथील ‘विद्या प्रसारक मंडळा’च्या जोशी-बेडेकर स्वायत्त महाविद्यालयातील ‘अतुल्य इनक्लुसिव्ह सेल’ हा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित असलेला एक प्रेरणादायी उपक्रम आहे. २०२२ मध्ये प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्या दूरदृष्टीतून प्रा. स्वप्नील मयेकर आणि प्रा. डॉ. शेफाली कोंडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा समूह विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात समान संधी उपलब्ध करून देतो. ‘सर्वसमावेशकता’ या तत्त्वावर आधारित हा समूह विविध कार्यशाळा, उपक्रम आणि व्याख्याने आयोजित करून दिव्यांग विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, ज्ञान आणि प्रेरणा प्रदान करतो. हा केवळ एक उपक्रम नसून, अनेक विद्यार्थ्यांसाठी नवीन आशा आणि स्वतःला घडवण्याची संधी देणारा प्रयत्नशील मंच म्हणावा लागेल.
सर्वसमावेशकता, मानसिक स्वास्थ्य, करिअर आणि कौशल्य या महत्त्वाच्या पैलूंवर ‘अतुल्य सेल’तर्फे वैचारिक मंथन करून विविध उपक्रम राबविले जातात. प्रत्येक कार्यशाळेत आणि कार्यक्रमात त्यांना केवळ मार्गदर्शनच नव्हे, तर त्यांच्या स्वप्नांना पाठिंब्याची, मायेची फुंकर घालून त्यांचा आत्मविश्वास वाढवला जातो. दिव्यांग विद्यार्थ्यांचे चेहरे त्यांच्या कठीण प्रवासाचा अनुभव आणि त्यांच्या सामर्थ्याच्या शोधाची धडपड सांगून जातात. हीच धडपड प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक आणि शिक्षक प्रतिनिधींनी ओळखून त्यांना हे शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. जीवनातील अडचणींवर मात करून विजय प्राप्त करण्याची प्रेरणा या समूहाशी संबंधित प्रत्येक ‘अतुल्य’ विद्यार्थ्याकडून मिळते.
सुरुवातीला बोटावर मोजण्याइतके विद्यार्थी असलेल्या या समूहाची ख्याती अन्य दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये पसरली. बघता बघता समूहामधील विद्यार्थ्यांची संख्या वाढत जाऊन आजघडीला पदवी आणि कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण ७५ विद्यार्थी या समूहाचा भाग आहेत. या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी अनेक विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून या समूहाला जोडले गेले आहेत. ‘अतुल्य इनक्लुसिव्ह सेल’द्वारे दृष्टिहीन विद्यार्थ्यांना लेखनिक, वर्गमित्र, ऑडिओ रेकॉर्डर, वाचक आणि त्यांच्या गरजेनुसार आवश्यक ती मदत पुरवली जाते. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘सेतू’ नावाचा विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करता येईल. ‘अतुल्य सेल’ची खास कार्यशाळा ‘स्वमुद्रा’ ही विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरली आहे, ज्यात विशेष टूलच्या मदतीने हे विद्यार्थी आपले हस्ताक्षर करायला शिकले. याशिवाय, स्वयंपाक कौशल्ये, जीवनावश्यक कौशल्ये यांवर आधारित कार्यशाळा, व्याख्याने आणि शैक्षणिक भेटींचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वावलंबनाची प्रेरणा निर्माण केली जात आहे.
या सर्व शैक्षणिक बाबींसह ‘अतुल्य इनक्लुसिव्ह सेल’ने दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट प्रशिक्षण सत्राची देखील सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांमधील सर्वसमावेशकता वाढवणे, आत्मविश्वास वाढवणे आणि संघभावनेला चालना देणे, हा या क्रीडा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रा. डॉ. सुचित्रा नाईक यांच्या मोलाच्या प्रयत्नांनी हा विधायक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या सत्रात २० पेक्षा अधिक दृष्टिहीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना क्रिकेट प्रशिक्षण दिले जाते. ‘क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाईंड, महाराष्ट्र’चे विद्यमान प्रशिक्षक अजय मुनी हे स्वतः विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यास निश्चितच फायदेशीर ठरत आहे.
‘अतुल्य इनक्लुसिव्ह सेल’मुळे अतुल्य विद्यार्थी, स्वयंसेवक आणि प्राध्यापक मिळून ‘अतुल्य सेल’ हा जणू एक कुटुंबासमान भासतो, ज्यात सगळेच एकमेकांना समजून घेत असून साहाय्य करीत प्रगतीच्या शिखराकडे एक एक पायरी पुढे जात आहेत. ‘अतुल्य इनक्लुसिव्ह सेल’ची राष्ट्रीय पातळीवरसुद्धा दखल घेण्यात आली आहे. साहाय्यक प्राध्यापक स्वप्नील मयेकर, डॉ. शेफाली कोंडेवार या ‘अतुल्य इनक्लुसिव्ह सेल’च्या शिक्षक प्रमुखांनी समूहाच्या उपक्रमांचे, कार्यप्रणालीचे आणि भविष्यातील योजनांचे प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणाने परीक्षक व ‘आरबीएनक्यूए ट्रस्ट’च्या मार्गदर्शकांना प्रभावित केले आणि शिक्षण क्षेत्रासाठी दिला जाणारा ‘आयएमसी रामचंद्र बजाज नॅशनल क्वालिटी’ हा पुरस्कार ‘विद्या प्रसारक मंडळा’च्या जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या सर्वसमावेशक शिक्षणाच्या उल्लेखनीय उपक्रमांसाठी विशेषतः ‘अतुल्य इनक्लुसिव्ह सेल’मार्फत केल्या जाणार्या कार्यासाठी दिला गेला. ‘अतुल्य सेल’सोबत जोडले गेलेले विद्यार्थी, स्वयंसेवक आणि प्राध्यापक यांच्यात हे कार्य करताना कृतज्ञपूर्ण भावनेतून जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत. हे कार्य करताना सर्वांना आपले जीवन हे अर्थपूर्ण वाटते आणि दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रेरणा घेऊन आयुष्यात येणार्या सगळ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बळ मिळत आहे, हेच ‘अतुल्य सेल’ कुटुंबातील सदस्यांचे सर्वात मोठे यश आणि प्राचार्या, शिक्षकवर्ग, पालक यांच्या आशीर्वादाची भेट आहे, असे म्हणावे लागेल.‘अतुल्य सेल’ या कुटुंबाच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी घटकांचा व त्यामागील उद्दिष्टांचा उत्साह हा अतुल्य विद्यार्थी, प्राचार्य समितीतील शिक्षकगण, ‘अतुल्य सेल’सोबत जोडलेल्या अनेक मान्यवर संस्था, सल्लागार व मार्गदर्शकांशिवाय यशस्वी होणे शक्य नाही. आजवर हे कार्य करण्यासाठी असलेली इच्छाशक्ती ही सर्वांच्या मनातून निर्माण झालेली एक विशेष ऊर्जा आहे, ज्यात हे विशेष आव्हानात्मक काम करण्याचे सातत्य टिकून आहे.
सागर देवरे
९९६७०२०३६४