भारत : जगाची ‘एआय’ राजधानी

    08-Jan-2025
Total Views |
AI India

‘एआय’ क्षेत्रातील पायाभूत सुविधा तसेच, प्रशिक्षणासाठी ‘मायक्रोसॉफ्ट’ ही दिग्गज कंपनी देशात तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. तसेच २०३० सालापर्यंत एक कोटी जनतेला ‘एआय’ कौशल्यांचे प्रशिक्षण देणार आहे. यातून लाखो नवीन रोजगार निर्माण होतील, असे मानले जाते. ‘एआय’ तंत्रज्ञानात भारत जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता राखून आहे.

मायक्रोसॉफ्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी येत्या दोन वर्षांत ‘क्लाऊड’ आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता) क्षेत्रातील पायाभूत सुविधा तसेच, प्रशिक्षणासाठी तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी त्यांनी भारताची निवड केली असून, त्या अंतर्गत देशामध्ये नवीन डेटासेंटर उभारण्यात येणार आहे. ‘मायक्रोसॉफ्ट’ची आजच्या तारखेला भारतात तीन डेटासेंटर असून, चौथे २०२६ साली कार्यान्वित होणार आहे. तसेच २०३० सालापर्यंत भारतातील एक कोटी लोकांना, ‘एआय’ कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कंपनीने एका वर्षात २४ लाख जणांना ‘एआय’ कौशल्यांचे प्रशिक्षण यापूर्वीच दिले आहे. भारताला ‘एआय’ राष्ट्र बनविण्यासाठी ही योजना आखली आणल्याचे, सत्या नडेला यांनी विशेषत्वाने नमूद केले आहे. याचा थेट फायदा देशातील लाखो युवकांना होणार असून, त्यांच्यासाठी रोजगार निर्माण होणार आहेत. तसेच, संगणक क्षेत्रात जगभरातील कंपन्यांमध्ये या प्रशिक्षित युवकांना प्राधान्याने संधी मिळेल. जागतिक बाजारपेठेसाठी आवश्यक ती संसाधने पुरविण्याचे काम स्वाभाविकपणे भारत करेल. १९९० सालच्या दशकात संगणकीय क्रांतीनंतर, भारतातील संगणक अभियंतेच जगभराच्या क्रांतीचे चालक बनले होते, याचे या निमित्ताने स्मरण झाले.

मायक्रोसॉफ्टने भारतात ‘क्लाउड’ तसेच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ पायाभूत सुविधांसाठी तीन अब्ज डॉलर्स गुंतवणूक करण्याची जी घोषणा केली आहे, ती भारताच्या वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेशी असलेली सखोल संलग्नता आणि जागतिक टेक हब म्हणून भारताची असलेली क्षमता दर्शवणारी ठरली आहे. भारताच्या क्षमतांचा अद्यापही पूर्णपणे वापर केला गेलेला नाही. जगातील सर्वात मोठी लोकसंख्या, इंटरनेटचा होत असलेला वाढता वापर, तसेच ‘डिजिटल इंडिया’सारख्या डिजिटलायझेशन उपक्रमांना चालना देणारे केंद्र सरकार ‘एआय’ या नवीन तंत्रज्ञानाला म्हणूनच समर्थन देत आहे. आज हे तंत्रज्ञान बाल्यावस्थेत असून, त्याला प्रगत करण्यासाठी मानवी प्रज्ञेचीच गरज आहे. किंबहुना, मानवी प्रज्ञेनेच कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणले आहे, हे समजून घेतले पाहिजे. या तंत्रज्ञानामुळे रोजगार जातील, अशी अनाठायी भीती व्यक्त केली जात आहे. कोणतेही नवीन तंत्रज्ञान हे जुने रोजगार थांबवणारे असते, त्याचवेळी ते रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देत असते. भविष्यकाळात ‘क्लाउड सेवा’ तसेच ‘एआय’ आधारित सेवांची मागणी वाढणार आहे. अशावेळी, भारतातील युवकांना त्याचे प्रशिक्षण मिळाले, तर भारतीय युवा या सेवांची पूर्तता करण्यासाठी सुसज्ज असतील.

भारतीयांमध्ये ‘एआय’ क्षमतांची वाढ करणे, नाविन्यपूर्णतेला चालना देणे तसेच, ‘एआय’ परिसंस्थेच्या विकासात भरीव योगदान देणे, यासाठी मायक्रोसॉफ्ट सक्रियपणे प्रयत्न करत आहे. भारतीय संगणक अभियंत्यांनी यापूर्वी वेळोवेळी आपली क्षमता सिद्ध केली आहे. १९९८ सालच्या सुमारास ‘वायटूके’ समस्येने जेव्हा संपूर्ण जग चिंताग्रस्त झाले होते, तेव्हा भारतीयांनीच त्याचे निराकरण केले होते. त्यासाठीच ‘मायक्रोसॉफ्ट’ या दिग्गज कंपनीने पुन्हा एकदा संगणक तंत्रज्ञान संक्रमणातून जात असताना, पुन्हा एकदा भारतावर विश्वास ठेवला, असे निश्चितपणे म्हणता येते. त्यासाठीच डेटा सेंटर्स उभारणे, भारतीय बाजारपेठेसाठी तयार केलेली एआय-विशिष्ट साधने आणि सेवा विकसित करणे आणि स्थानिक नवोद्योग आणि संशोधन संस्थांसोबत सहकार्य करणे यांचा यात समावेश आहे. हा सक्रिय दृष्टिकोन स्पर्धात्मक ‘एआय’ परिदृश्यामध्ये मायक्रोसॉफ्टचे स्थान मजबूत करणारे ठरणार असून, भारतीयांसाठी नव्या संधी निर्माण करणारा ठरत आहे. भारताने तंत्रज्ञान क्षेत्रात सिद्ध केलेले आपले कर्तृत्व यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. म्हणूनच, दिग्गज जागतिक कंपन्या भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. ‘गुगल’ आणि ‘अ‍ॅमेझॉन’ या कट्टर प्रतिस्पर्ध्यांपेक्षा स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी मायक्रोसॉफ्टने, भारतात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असावा असे मानता येते.

भारत हा जगाची ‘एआय’ राजधानी होऊ शकतो. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रातील लाखो कुशल युवकांसह भारताकडे मोठे कार्यबल आहे. अनेक भारतीय विद्यापीठे व ‘एआय’ संस्था आणि मशीन लर्निंगचे प्रशिक्षण देत आहेत. या क्षेत्राचे सखोल ज्ञान असलेले लाखो पदवीधर देशात तयार होत आहेत. त्याचवेळी, भारतामध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात नवोद्योगांची परिसंस्था आहे. अनेक नवोद्योग आरोग्यसेवा, वित्त, कृषी आणि शिक्षण यासह विविध उद्योगांमध्ये ‘एआय’चा वापर करत आहेत. या क्षेत्रातील प्रयोग आणि नवकल्पना वाढवण्यास त्याची मदत होत आहे. म्हणूनच, दिग्गज कंपन्यांना भारत आकर्षित करत आहे. केंद्र सरकारही विकासाला चालना देण्यासाठी, ‘एआय’चे महत्त्व जाणून आहे. ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘गुगल’ आणि ‘अ‍ॅमेझॉन’सह जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे, भारत ‘एआय’मधील आंतरराष्ट्रीय सहकार्यांसाठीचा केंद्रबिंदू म्हणून उदयास येत आहे. जगातील सर्वात मोठ्या इंटरनेट वापरकर्त्यांपैकी एक म्हणून, भारताकडे प्रचंड प्रमाणात डेटा उपलब्ध आहे. हा डेटा ‘एआय’ मॉडेल्सच्या प्रशिक्षणासाठी महत्त्वाचा ठरतो आहे.

भारताने सातत्याने मजबूत आर्थिक विकास दर दर्शविला असल्याने, ती जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनली आहे. ही वाढ माहिती तंत्रज्ञान, फार्मास्युटिकल्स आणि कृषी यासह विविध क्षेत्रांद्वारे चालविली जाते. सरकार थेट विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी, सुधारणा करत असल्याने जागतिक गुंतवणूकदार भारताकडे विश्वासाने पाहत आहेत. भारतामध्ये युवा वर्गातील मोठी लोकसंख्या आहे. हा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश प्रचंड क्षमता असणारा आहे. विशेषत: तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रांमध्ये, हे कुशल मनुष्यबळ उपयोगी पडणारे ठरते. केंद्र सरकारने सुधारित पायाभूत सुविधांची गरज ओळखली असून रस्ते, रेल्वे आणि शहरी विकास यासारख्या प्रकल्पांमधील गुंतवणूक कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी तसेच व्यापार सुलभ करण्यासाठी सुरू ठेवली आहे. त्याशिवाय, इंटरनेट सेवांचा विस्तार आणि ब्रॉडबॅण्ड सुविधा वाढविण्यासह डिजिटल पायाभूत सुविधांसाठीचे उपक्रम, तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी आणि आर्थिक विकासासाठी निर्णायक ठरली आहे. भारत जागतिक पुरवठा साखळीतील एक महत्त्वाचा देश म्हणून पुढे येत आहे. त्याशिवाय, ‘जी-२०’ आणि ‘ब्रिक्स’ सारख्या मंचांमध्ये त्याचा सहभाग, आंतरराष्ट्रीय आर्थिक चर्चांमध्ये त्याचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरत आहे. ‘एआय’, फिनटेक आणि ई-कॉमर्समधील होत असलेली गुंतवणूक,अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये जगाचे नेतृत्व करण्याची देशाची क्षमता दर्शविणारी ठरत आहे. ‘मायक्रोसॉफ्ट’ने भारताची निवड का केली, याचे उत्तर यातच आहे.