मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याबाबतचा शासन आदेश जारी! मंत्री उदय सामंत यांची माहिती

    08-Jan-2025
Total Views |
 
Uday Samant
 
नवी दिल्ली : मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी बुधवार, ८ जानेवारी रोजी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेतली. त्यानंतर हा आदेश जारी करण्यात आला.
 
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. मात्र, त्याची अद्याप अधिसूचना निघालेली नाही. त्यामुळे मंत्री उदय सामंत यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेतली. या बैठकीला साहित्य संस्कृती मंडळ अध्यक्ष सदानंद मोरे, अभिजात भाषा पाठपुरावा समिती अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवळ उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  संतोष देशमुखांच्या पत्नीला शासकीय नोकरीत सामावून घेणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय
 
माध्यमांशी संवाद साधताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, "केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याबाबतची अधिसुचना आमच्याकडे सोपवली आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. महाराष्ट्राच्या जनतेचे आणि मराठी भाषिकांचे स्वप्न अधिकृतरित्या परिपूर्ण होत आहे."
 
"येत्या ८ ते १५ दिवसांत आम्ही अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे लाभ मिळतात त्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करणार आहोत. महाराष्ट्रात प्राकृत भाषेवरही मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. या भाषेचा अभ्यासक्रमात उपयोग करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आम्ही गजेंद्र शेखावत यांच्याकडे केली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत पुण्यात होणाऱ्या मराठी विश्व संमेलनाच्या उद्धाटनाला येण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे," अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.