सुनील तटकरेंची शरद पवारांच्या खासदारांना ऑफर! राष्ट्रवादीत पून्हा फूट पडणार?
08-Jan-2025
Total Views |
मुंबई : बाप-लेकींची साथ सोडून अजितदादांसोबत चला, अशी ऑफर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी शरद पवार गटाच्या खासदारांना दिल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा फूट पडणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात दिल्लीत संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु असताना बाप-लेकींना सोडून सर्वांनी अजित पवारांसोबत चला, असा प्रस्ताव सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या खासदारांना दिला. त्यांनी प्रत्यक्ष भेटून खासदारांना हा प्रस्ताव दिला. परंतू, शरद पवार गटाकडून हा प्रस्ताव फेटाळण्यात आलाय. शिवाय तटकरेंच्या या प्रस्तावानंतर सुप्रिया सुळे त्यांच्यावर चांगल्याच संतापल्या आणि त्यांनी लगेच प्रफुल पटेलांना फोन केला. असा विचार तुमच्या मनात येतोच कसा, असा सवाल सुळेंनी प्रफुल पटेलांना केल्याचीही माहिती पुढे आली आहे.
मात्र, सुनील तटकरे यांनी याबाबतच्या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, "माझ्या ७० वर्षांच्या आयुष्यात आणि ४० वर्षांच्या राजकीय जीवनात मी कधीही बाप-लेक असा शब्दप्रयोग केला नाही. पण काही मंडळींना असा शब्दप्रयोग करण्याची सवय पडली असते. त्यामुळे ते वारंवार त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतात. तो त्यांच्या सवयीचा आणि विकृतीचा भाग असू शकेल. विधानसभा निवडणूकीतील दारूण अपयशानंतर महाराष्ट्रातील जनतेने ज्यांना त्यांची जागा दाखवली असे लोक आपल्या पक्षाची विश्वासार्हता आणि कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेले नैराश्य सावरण्यासाठी काही आरोप करण्याचा प्रयत्न करतात. मी लोकसभा सदस्य असल्याने दिल्लीला नेहमी जात असतो. अधिवेशनात देशातील, राज्यातील लोकसभा सदस्य भेटत असतात. माझी कुणाशी इतर काहीही चर्चा झालेली नाही. मात्र, कुणी कुणाजवळ केव्हा काय चर्चा केली याबाबतची माहिती मी योग्य वेळी देईल," असे ते म्हणाले.