इंडी आघाडीमध्ये फूट सुरूच, सपा आणि तृणमूलचा आपला पाठिंबा

    08-Jan-2025
Total Views |

Indi alliance
 
नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून राजधानीत दररोज राजकीय नाट्य घडत आहे. निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने आम आदमी पक्षाला (आप) पाठिंबा जाहीर केला आहे.
काँग्रेसप्रणित इंडी आघाडीमध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आणखी एक फूट पडली आहे. यापूर्वी काँग्रेस आणि सत्ताधारी आपने स्वतंत्र निवडणूक लढविण्याची घोषणा केला होती. त्यानंतर काँग्रेस आणि आपमध्ये दररोज राजकीय आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. त्यानंतर आता इंडी आघाडीतील आणखी दोन घटकपक्षांनीही दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसऐवजी आपला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.
सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, जो पक्ष भाजपचा पराभव करेल; त्याला सपा पाठिंबा देईल. काँग्रेसकडे दिल्लीत मजबूत संघटन नाही, अशा परिस्थितीत आमचा पक्ष आपला पाठिंबा देईल. आपण स्वत: आपचा प्रचार करणार आहोत. दिल्लीत भाजपचा पराभव फक्त आप करू शकत असल्याने आपला पक्ष आपसोबत असल्याचे यादव यांनी म्हटले आहे. आपचे संयोजक आम अरविंद केजरीवाल यांनीही अखिलेश यादव यांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
तृणमूल काँग्रेसनेही दिल्लीमध्ये आपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तृणमूल नेते कुणाल घोष म्हणाले की, आम्हाला आशा आहे की दिल्लीत पुन्हा आपचे सरकार येईल. दिल्लीत भाजपचा पूर्ण सफाया करण्याची क्षमता केवळ आपमध्येच असल्याचेही घोष यांनी म्हटले आहे.