संतोष देशमुखांच्या पत्नीला शासकीय नोकरीत सामावून घेणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय
08-Jan-2025
Total Views |
मुंबई : मस्साजोग येथील सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीला शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मंगळवार, ६ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी आमदार सुरेश धस उपस्थित होते.
या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सुरेश धस म्हणाले की, "संतोष देशमुख यांच्या हत्येतील व्यक्ती कितीही मोठा असला तरी एकालाही सोडले जाणार नाही. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी ४५ मिनिटे वेळ दिला. संतोष देशमुख यांच्या पत्नीला लातूर जिल्ह्यात शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. संतोष देशमुख यांच्या मुलांचे शिक्षण सुरु आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नीला कोणत्याही विभागात नोकरी दिली तरी त्यांची पोस्टिग लातूर जिल्ह्यात करण्याचा आग्रह आम्ही धरला. मुलांचे शिक्षण थांबू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच एसआयटीमध्ये बदल करण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आदेश दिले असून पुढील दोन दिवसांत एसआयटीत बदल झालेला दिसेल," अशी माहिती त्यांनी दिली.
यासोबतच परभणीतील घटनेवेळी हृदयविकारच्या झटक्याने मृत्यूमुखी पडलेले आंबेडकरी नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांनाही मुख्यमंत्र्यांनी दिलासा दिला. याबाबत बोलताना सुरेश धस म्हणाले की, "मी पालकमंत्री असताना विजय वाकोडे हे माझे मित्र होते. परभणीतील वातावरण शांत करण्यासाठी धावपळ करताना त्यांचे दुर्दैवाने निधन झाले. त्यानंतर आता त्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या एक मुलगा शासनात घेण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच ज्या ठिकाणी विजयबाबांच्या अंत्यविधीच्या दिवशी बोर्ड लावला गेला ते ठिकाण त्यांचे स्मृतीस्थळ होईल. यासोबतच ज्या मुलांचा आंदोलनात काहीही संबंध नाही. त्यांचे नाव चार्जशीटमधून काढून टाकण्यात येईल. जे फक्त अॅक्शन मोडमध्ये होते त्यांच्यावर कारवाई होईल, असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे, असे सुरेश धस यांनी सांगितले.