मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सागरी सीमा मंच, कोकण प्रांतच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा 'सागरी परिक्रमा' (Sagari Parikrama) आयोजित करण्यात आली आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्ताने १० जानेवारी ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत मुंबईतील वेसावे (वर्सोवा) ते डहाणू अशी परिक्रमा आयोजित केली आहे. सागर परिक्रमेचा उद्घाटन सोहळा गुरुवार, दि. ९ जानेवारी रोजी संध्याकाळी ६.३० वाजता वर्सोवा सहकारी सर्वोदय सोसायटी लि. मैदान वर्सोवा बस स्टॉप समोर, मासळी मार्केट मागे, आईस फॅक्टरीजवळ, वर्सोवा येथे होत आहे.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून शिवशंभु विचार मंच महाराष्ट्रचे संयोजक आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळचे कार्यवाह सुधीर थोरात उपस्थित असतील. तर विशेष अतिथी म्हणून बिपीन कुमार आणि प्रमुख पाहुणे म्हणून वर्सोवा कोळीवाडा इतिहासचे लेखक भगवान भानजी उपस्थित असतील. या परिक्रमेमध्ये आरमारनिर्मिती मागील छत्रपती शिवरायांची भूमिका व आजची स्थिती जनतेसमोर मांडण्यात येणार आहे. असे सीमा जागरण मंचचे प्रांत संयोजक केतन अंभिरे यांनी सांगितले.
सागरी सीमा मंच हे संघटन कोकण किनारपट्टीवर सागरी सुरक्षेचा विचार रुजविण्यासाठी गेली पाच वर्ष कार्यरत आहे. 'सुरक्षित किनारपट्टी... समर्थ भारत' या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी सुरक्षा, पर्यावरण, स्वच्छता, आरोग्य, संघटन, आर्थिक सबलीकरण या बिंदूवर आधारीत विविध उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन सागरी सीमा मंच द्वारे केले जाते. संघटन, सुरक्षेची जाणीव, इतिहासाचा अभ्यास, समाजाचे प्रबोधन ही सागर परिक्रमेची प्रमुख उद्दीष्ट आहेत.
याच कार्याचा भाग म्हणून सागरी किनाऱ्यांची सद्यस्थितीचा अभ्यास व्हावा, छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आरमाराचे स्मरण रहावे, किनारपट्टीवरील गावांमध्ये सुरक्षेविषयी जागृती व्हावी हा उद्देश निश्चित करुन सागरी सीमा मंचने सागर परिक्रमा हा उपक्रम हाती घेतला आहे. ३५० वे शिवराज्यभिषेक वर्ष निमित्ताने गेल्यावर्षी कुलाबा ते विजयदूर्ग अशी पहील्या टप्प्यातील परिक्रमा यशस्वीरित्या पार पडली. परिक्रमेच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबईतील वेसावे (वर्सोवा) ते डहाणु अशी परिक्रमा सागरी सीमा मंचने आयोजित केली आहे.