मुंबई,दि.८: प्रतिनिधी भूमिगत मुंबई मेट्रो ३चा बीकेसी ते कफ परेड हा दुसरा टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. बीकेसी ते कफ परेड असा २१.३५ कि.मी.च्या टप्प्याची ९२.०७ टक्के कामे पूर्ण झाली असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे. दरम्यान, मुंबई भूमिगत मेट्रो मार्गिकेचा आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा सुरु झाला आहे. तर बीकेसी ते कफ परेड असा एकूण १७ स्थानकांसह दुसरा टप्पा प्रगतीपथावर आहे. दुसरा टप्पा २१.३५ कि.मी. इतक्या अंतराचा आहे. या टप्पा सुरु झाल्यावर दोन गाड्यांमधील कालावधी ३.२ मिनिटे असेल. दुसऱ्या टप्प्यातील गाड्यांची संख्या २२ गाड्या इतकी असेल.
मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करून आधुनिक वाहतूक व्यवस्थेला पर्याय निर्माण करण्यासाठी मेट्रो प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, हे विशेष. मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किमीचे मेट्रो नेटवर्क तयार केल्यास, एमएमआरच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत काही मिनिटांत प्रवास करता येईल. कारण मेट्रो ३ मार्ग इतर अनेक मेट्रो मार्गांशी जोडला जाईल. त्यामुळे हा मार्ग लवकरात लवकर सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.
नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांनी मेट्रो प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतल्याचे आठवते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) किमान ५० किमी मेट्रो मार्ग यावर्षी सेवेत आणण्याचे निर्देश दिले होते. या ५० किमी मेट्रो नेटवर्कमध्ये २१ किमी मेट्रो 3 देखील समाविष्ट असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला वरळीतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशन दरम्यानची सेवा १०० दिवसांच्या आत सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. कारण संपूर्ण मार्गावरील (कफ परेडपर्यंत) काम जूनमध्ये पूर्ण होणार आहे. सध्या बीकेसी ते कुलाबा पर्यंतचे ९२% काम पूर्ण झाले आहे.
दुसरा टप्पा : बीकेसी ते कफ परेड
स्थानक आणि बोगदे : ९९.०१ टक्के
स्थानकांचे बांधकाम : ९७.८ टक्के
सिस्टीम वर्क : ७५.७ टक्के
मेनलाईन ट्रॅक : १०० टक्के
ओसीएस वर्क : ५७.६ टक्के