मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Muhammad Yasin on Maulana Shahabuddin Razvi) प्रयागराजमधील महाकुंभ होत असलेली जागा वक्फची मालमत्ता असल्याचा दावा मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांनी केला होता. त्यांच्या दाव्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. संत-महंतांनी मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी विरोधात जोरदार टीका केली आहे. असे असताना काशी ज्ञानवापी प्रकरणातील मुस्लिम पक्ष अंजुमन अरेंजमेंट मस्जिदचे संयुक्त सचिव मोहम्मद यासीन यांनी मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवीना जोरदार चपराक लगावल्याचे पाहायला मिळते आहे. हे विधान मूर्खपणाचे असल्याचे मोहम्मद यासीन यांनी म्हटले आहे.
हे वाचलंत का? : चंद्राच्या एका चुकीमुळे महाकुंभ होतो; काय आहे नेमकं प्रकरण?
मोहम्मद यासीन यांनी यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, 'प्रयागराज महाकुंभच्या जागेला वक्फ मालमत्ता म्हणणे पूर्णपणे मूर्खपणाचे आहे. हजारो वर्षांपासून महाकुंभ होत असताना, त्याला वक्फ जमीन म्हणणे म्हणजे मूर्खपणाशिवाय काही नाही. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी विधाने केली जात आहेत, हे पूर्णतः अन्यायकारक आहे. यामागची सत्यतासुद्धा वक्प बोर्डच्या कार्यालयातून तपासली आहे.' अनावश्यक वक्तव्ये समाजासाठी अत्यंत घातक असल्याचे म्हणत अशा लोकांपासून अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन मोहम्मद यासीन यांनी अल्पसंख्याकांना केले आहे.