मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Floating House Mahakumbh) उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे दि. १३ जानेवारीपासून महाकुंभाला सुरुवात होत आहे. महाकुंभासाठी देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना विशेष अनुभव देण्यासाठी गंगा-यमुनेच्या तिरावर पहिल्यांदाच फ्लोटिंग हाऊस बांधले जात आहेत. त्यामुळे यंदाचा महाकुंभ केवळ श्रद्धेचा संगम नसून तंत्रज्ञान आणि आधुनिकतेचा अप्रतिम संगम असणार आहे. येणाऱ्या पाहुण्यांसाठी हा अनुभव संस्मरणीय ठरणार आहे.
फ्लोटिंग हाऊस सर्व सुविधांनी सुसज्ज असून कपडे बदलण्यासाठी तसेच आंघोळीसाठी ती पर्यटकांकरीता एक उत्तम जागा ठरेल. फ्लोटिंग जेटीच्या सहाय्याने हे फ्लोटिंग हाऊस तयार केले जात आहेत. त्याव्यतिरिक्त कुंभ काळात स्पीड बोट आणि आधुनिक मोटर बोटींची विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे. प्रत्येक बोटीत सहा जण प्रवास करू शकतात. संगम आणि कुंभच्या सुरक्षेसाठी सुमारे दोन डझन बोटी तैनात करण्यात येणार आहेत. या बोटी सुरक्षितता प्रदान करतील आणि पर्यटकांना संगमच्या सौंदर्याचा आणि सायबेरियन पक्ष्यांमधील रोमांचक प्रवासाचा अनुभव देखील देतील.