संपूर्ण महाराष्ट्रात ड्रग्जविरुद्ध मोठी लढाई लढणार!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : "नशामुक्त नवी मुंबई" अभियानास सुरुवात
08-Jan-2025
Total Views |
नवी मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही ड्रग्जविरुद्ध मोठी लढाई लढणार असून नवी मुंबईपासून सुरु झालेली ही मोहिम इतरही ठिकाणी चालणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
बुधवार, ८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई पोलिसांच्या 'नशामुक्त नवी मुंबई' अभियानाचा शुभारंभ झाला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "नशामुक्त नवी मुंबई ही मोहीम आजपासून सुरु झाली आहे. वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करणे, टोल फ्री लाईनच्या माध्यमातून या संदर्भातील माहिती प्राप्त करून त्यावर कारवाई करणे, संदिग्ध असणाऱ्यांवर कारवाई करणे आणि नव्या पीढीला ड्रग्सपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न या मोहिमेद्वारे करण्यात येणार आहे. नवी मुंबईपासून ही मोहीम सुरु झाली असून पुढे इतरही ठिकाणी चालणार आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात ड्रग्जच्या विरुद्ध एक मोठी लढाई सुरु झाली असून महाराष्ट्रातसुद्धा आपण ती लढाई लढत आहोत."
"आपण मोठ्या प्रमाणात तस्करांवर कारवाई केल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्जचे अड्डे तयार करणे सुरु असल्याचे लक्षात आले आहे. सोशल मीडियावर ऑर्डर देऊ कुरियरच्या माध्यमातून ते पोहोचवले जातात. त्यामुळे याविरोधातही आपण मोहीम सुरु केली आहे," असे त्यांनी सांगितले.
मुंबई आणि नवी मुंबई आयुक्तालयांची ड्रग्ज विरुद्ध विक्रमी कामगिरी!
ते पुढे म्हणाले की, "वेगवेगळ्या पद्धतीने अपराधी ड्रग्ज आणण्याचा प्रयत्न करतात. पण पोलिस त्यांच्या सगळ्या नवीन पद्धती शोधून त्यांच्यावर कारवाई करत आहेत. मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही आयुक्तालयांनी गेल्या वर्षभरात ड्रग्जच्या विरुद्ध विक्रमी कामगिरी केली. पंजाबसारखाच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ड्रग्जचा प्रादुर्भाव वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. याविरोधात आज आपण प्रभावीपणे कारवाई केल्यास हे थांबवू शकतो. ही कारवाई आता सुरु केली आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.