मुंबई : खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्ह्यातील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बुधवार, ८ जानेवारी रोजी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
काँग्रेसचे नेते शरद पाटील, भास्कर पाटील जोमेगावकर, भास्कर पाटील ढगे, उद्धवराव पाटील ढेपे, नागोराव पाटील मोरे, गोविंद पाटील कपाळे, सतीश पाटील शिंदे, कमलाकर पाटील शिंदे, मधुकर डाकोरे, गजानन पाटील यांनी आपल्या अनेक समर्थकांसह मुंबई येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
हे वाचलंत का? - सुनील तटकरेंची शरद पवारांच्या खासदारांना ऑफर! राष्ट्रवादीत पून्हा फूट पडणार?
याप्रसंगी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "अशोक चव्हाण साहेबांनी जेव्हापासून भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हापासून नांदेडमधील काँग्रेसचे जवळपास ९५ टक्के नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये येऊन पक्षाला यशस्वीपणे पुढे नेत आहेत. अशोक चव्हाण साहेबांचा प्रवेश झाल्यानंतर आम्हाला मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात खूप मोठी उंची मिळाली. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना अशोक चव्हाण साहेबांना मानणारा वर्ग आणि त्यांनी केलेल्या कार्यातून तयार झालेला कार्यकर्ता वर्ग मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश करतो आहे."
"उद्याच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणूकीमध्ये या नेतृत्वाने पक्षसंघटनेला मोठा फायदा होणार आहे. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्हा आणि मराठवाड्यात पक्ष मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे. आज त्यांनी मोठे पक्षप्रवेश घडवून आणले आहेत. काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात कमजोर होत चालला आहे. काँग्रेसला नेतृत्वहीन दिशा मिळाली आहे. महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या नेतृत्वात सरकार १४ कोटी जनतेच्या विकासासाठी आणि विकसित महाराष्ट्राकरिता काम करत आहे. विकसित महाराष्ट्रासाठी देवेंद्रजींना आणि मोदीजींना साथ देण्यासाठी काँग्रेस पक्षातील लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत," असे ते म्हणाले.
पक्षसंघटना वाढवणे हे पक्षाच्या अध्यक्षांचे काम!
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या खासदारांना अजित पवारांकडे येण्यासाठी ऑफर दिल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, "सुनील तटकरे हे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे राज्याचे अध्यक्ष म्हणून आपला पक्ष वाढवणे अभिप्रेत आहे. पक्षप्रवेश करून पक्ष संघटना वाढवणे हे पक्षाच्या अध्यक्षांचे काम असते."
राज ठाकरे आणि आमच्यात वैचारिक साम्य!
"राज ठाकरेंबद्दल आम्ही आधीपासूनच मैत्रीच्या भुमिकेत आहोत. राज साहेबांनी वैचारीकदृष्ट्या कधीही भाजपच्या विचारांच्या विरुद्ध लढाई केली नाही. हिंदुत्वाचा विचार करून त्यांनी आपले काम सुरु ठेवले. भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्वाचे विचार आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे विचार घेऊन राज साहेब आपल्या पक्षाचे काम करत आहेत. आमच्यात वैचारिक साम्य आहे. त्यामुळे आम्ही कधीही राज साहेबांचा सन्मानच केला आहे. पुढच्या काळातही आम्ही त्यांचा सन्मानच करू," असेही मंत्री बावनकुळे म्हणाले.
निवडणूकीनंतर सर्वात मोठे नुकसात उद्धव ठाकरेंचे!
"हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देऊन आणि काँग्रेस आणि शरद पवार साहेबांशी जवळीक करून उद्धव ठाकरेंनी मतदारांचा अपमान केला आहे. त्यामुळे मतदारांनी त्यांना सोडून दिले. राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणूकीनंतर सर्वात मोठे नुकसात उद्धव ठाकरेंचे झाले आहे. त्यामुळे कार्यकर्ते विचलित आहेत. मुख्यमंत्रीपदाकरिता आपण महायुती तोडून वैचारिक पार्श्वभूमी नसलेल्या लोकांसोबत जाणे, ही उद्धव ठाकरेंची चूकच होती, हे कार्यकर्त्यांना कळले. आता पुन्हा ती चूक होऊ नये म्हणून एकटे लढून आपला पक्ष पुढे नेण्याची कार्यकर्त्यांची भावना चुकीची नाही. उद्धव ठाकरे साहेबांनी आता ही चूक दुरुस्त करायला हवी," असेही ते म्हणाले.