समाजात अगदी पूर्वापार सद्प्रवृत्ती विरुद्ध दुष्प्रवृत्तींचा संघर्ष अविरत सुरुच आहे. कालपरत्वे जरी या संघर्षाचे स्वरुप बदलले असले तरी सज्जन, दुर्जनांची विविध रुपे आजही अगदी सहज दृष्टिक्षेपास पडतात. पराकोटीची स्वकेंद्रीत वृत्ती आणि नकारात्मकतेने भारलेल्या काही व्यक्ती, आपलेच खरे करण्याच्या नादात सज्ञान व्यक्तींनाही मूर्खात काढतात. आपले अज्ञान उघडे पडू नये, म्हणून शब्दच्छल, लपवालपवीचाही ते सोयीस्कर आधार घेतात. अशा या ‘संज्ञानात्मक विसंगती’विषयी..
ल्या वर्षभरात निवडणुकांच्या काळात प्रसारमाध्यमांवर बरेच राजकीय नेते विविध विषयांवर भाष्य करीत होते. मागून त्यांचे पाठराखे किंवा चमचेही बोलत होते. आपण सगळेच हे वितंडवाद ऐकत होतो, वाचत होतो आणि पाहात होतो. ज्या पद्धतीचे संवाद, भाषा आपण ऐकली, त्याची आपल्यालाच लाज वाटावी, अशी परिस्थिती. ज्या माणसांना समाजासमोर आपली वाचाळ वचने बोलायची संधी मिळाली होती, ते बेताल, बेसुरे, बेजबाबदार वक्तव्ये करतच होते. त्यांच्या जीभा इतक्या घसरत होत्या की, सज्जनांची बोलती बंद व्हायची वेळ आली होती. आजकाल तर प्रसारमाध्यमांवर वार्ताहर सतत ‘अमूक तमूक राज्यकर्त्याची जीभ घसरली’ असे नमूद करत असतात. पण, वर्ष वर्ष संपता संपता, आपल्याला थोडे थांबून सुसंस्कारी आणि सुसंवादी अस्तित्वाची व्याख्या करणार्या गुणांवर चिंतन करावेच लागेल. यापैकी सुसंस्कृत असणे, हा केवळ समाजावर वरवरचा प्रभाव टाकणारा गुण म्हणून नव्हे, तर आपले नातेसंबंध, सामाजिक वातावरण आणि आंतरिक व्यक्तिमत्त्व आणि मुख्य म्हणजे, आपला समाज समृद्ध करणारे असण्याचा सखोल मार्ग म्हणून आपण पाहात असतो.
सुसंस्कृत असणे, हे केवळ शैक्षणिक ज्ञान व ‘स्टेटस’ असणे किंवा सुप्रसिद्ध कार्यक्रमांना हजेरी लावण्याबद्दल नाही. ते इतरांना आदर दाखवण्याबद्दल, विविध दृष्टिकोन समजून घेण्याबद्दल, कलेची आणि परंपरांची प्रशंसा करण्याबद्दल आणि विधायक संभाषणांमध्ये सहभागी होण्याबद्दल, समाजाबद्दल आदर बाळगण्याबद्दल आहे. एक सुसंस्कृत व्यक्ती कुतूहल, आदर आणि सहानुभूती दर्शवते. तसेच, माणसाचे खरे सौंदर्य दिखाव्याच्या पलीकडे जाते. ते सुंदर वर्तन, विचारशील भाषण आणि प्रतिष्ठेच्या आभामध्ये प्रतिबिंबित होते. माणुसकीचे खरे सौंदर्य म्हणजे तुमच्या उपस्थितीत इतरांना सुरक्षित, आदरणीय आणि आरामदायक वाटणे.
मानसशास्त्रानुसार, काही विशिष्ट प्रकारच्या व्यक्ती अशा असतात, ज्या तुमचा वेळ, ऊर्जा आणि आनंद वाया घालवू शकतात. हे लोक तुमच्या जीवनावर तुम्ही सावध राहिला नाहीत, तर विघातक प्रभाव टाकू शकतात. अशा विषारी लोकांचे वर्तन हानिकारक असते, ज्याचा त्यांच्या सभोवतालच्या लोकांवर कायमचा परिणाम होऊ शकतो. ते बहुतेक वेळा स्वकेंद्रित, कुटील हेतू बाळगणारे, गैरवर्तन करणारे आणि सहानुभूतीचा अभाव असलेले असतात. त्यांना ‘नार्सिसिस्टिक’ किंवा ‘स्वार्थी’ म्हणून संबोधले जाऊ शकते. ते व्यवहारी शहाणपणा दाखवत त्यांचे नकारात्मक गुण लपवू शकतात. विषारी लोक कुटुंबातील सदस्य, मित्र, सहकारी, शेजारी किंवा संघटनांचे नेतेही असू शकतात. विषारी लोकांच्या काही सामान्य वर्तनांमध्ये सतत टीका, गॅसलायटिंग, निष्क्रिय-आक्रमक वर्तन आणि शक्ती आणि नियंत्रणाची गरज यांचा समावेश आहे. जर तुम्ही हे वर्तन त्यांच्या लक्षात आणून दिले, तर ते त्यांच्या वर्तनात समस्या असल्याबद्दल तुमच्यावरच टीका करू शकतात. नंतर ते स्वतःला बळी म्हणून आणि तुम्हाला गुन्हेगार म्हणून खोटे प्रचार करून दाखवतात.
काही व्यक्तींना त्यांच्या असंस्कृत संगोपनामुळे किंवा वातावरणामुळे सुसंस्कृत वर्तन शिकण्याची किंवा निरीक्षण करण्याची संधी मिळाली नसेल. ते आज जसे विखारी असंस्कृतपणे वागतात, तशाच वातावरणात त्यांची वाढ झाली असेल. मानसिक किंवा आंतरिक विकासापेक्षा त्यांच्या केवळ भौतिक यशाला प्राधान्य देणारा समाज अनेकदा संस्कृती आणि अभिजाततेचे मूल्य कमी करतो. मीपणावर लहानपणापासून जास्त भर दिल्याने इतरांच्या भावनांकडे जबाबदारीने व परानुभूतीने पाहण्यावर त्यांचे दुर्लक्ष होऊ शकते. स्वकेंद्रित स्वार्थी वृत्तीची जोपासना त्यांच्यात अधिक झालेली दिसून येते, ज्यामुळे परिष्कृत आणि सहानुभूतीपूर्ण वर्तनाचा विकास रोखला जाऊ शकतो. आजच्या वेगवान जगात असे लोक अनेकदा स्वतःमध्ये परिवर्तन आणि चिंतन घडवून आणण्याकडे दुर्लक्ष करतात. त्याऐवजी ऐषोआरामात आणि आपला अहंकार सांभाळून जगण्यावर किंवा तत्काळ समाधानावर लक्ष केंद्रित करतात. आपण सर्वच अशा काही व्यक्तींना भेटलो आहोत, ज्यांना जगातील प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येकामध्ये दोष शोधण्याची कला अवगत आहे. त्यांच्यापासून दूर राहणे हे अत्यंत गरजेचे आहे. असे सर्वात आव्हानात्मक प्रकारचे लोक म्हणजे भावनिक हातचलाखी करणारे. त्यांच्याकडे तुमच्या प्रामाणिक भावना आणि वास्तवावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची कला असते. ते अनेकदा दुसर्यावर भावनिक नियंत्रणाचे साधन म्हणून अपराधीपणा किंवा सहानुभूतीचा वापर करतात.
मानसशास्त्रज्ञांच्या मते, सतत टीका केल्याने तुमच्या आत्मसन्मानावर आणि एकूणच कल्याणावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. हे लक्षात ठेवा, जर तुम्ही सतत नकारात्मकता आणि टीकेने वेढलेले असाल, तर ते तुमचे वास्तव बनण्याची शक्यता आहे. याचे नुकसान लक्षणीय असू शकते, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास, उत्पादकता आणि आनंद प्रभावित होऊ शकतो. असंस्कृत लोक या गोष्टीचा पुरा फायदा उठवत असतात.
या सगळ्यात विरोधाभास म्हणजे, असे लोक सुसंस्कृतीला महत्त्व देत तर नाहीत, पण ते इतरांकडून सूचविलेल्या सुधारणांना आपल्यावर होणारे व्यक्तिगत हल्ले म्हणून अर्थ लावतात. याचे कारण काय? तर या सुधारणा बरोबर आहेत, ही वस्तुस्थिती सार्वजनिकरित्या हे स्पष्ट करते की, जगात उत्तम ज्ञान देणारी माणसे प्रत्यक्षात अत्यंत मौल्यवान आहेत, ज्यांमुळे अनेक सामाजिक गोष्टींचे सखोल आकलन सर्वांना होऊ शकते आणि बर्याच प्रकरणांमध्ये आपल्याला अनेक विषयांबद्दल असे सुसंस्कृत आणि सुशिक्षित लोक आपले ज्ञान वाढवण्यास मदत करतात. अशी परिस्थितीत आपले अज्ञान नेमके पकडले जाईल, अशी भीती असंस्कृत लोकांना कायम वाटत असते. म्हणून ते सक्षम आणि यशस्वी लोकांना नामोहरम करण्याची कुठलीही संधी सोडत नाही. म्हणजेच, या प्रकरणांमध्ये जे घडते, त्याला ‘संज्ञानात्मक विसंगती’ म्हणतात. दोन सज्ञानी आणि अज्ञानी कल्पना एकमेकांशी टक्कर देतात आणि त्यांपैकी एक असंस्कृत लोकांसाठी खूप महत्त्वाची आहे. या प्रकरणात, आपले अज्ञान दुसर्याने ओळखले आहे, ही कल्पना सज्ञानी कल्पनेशी संघर्ष करते, तेव्हा ज्याबद्दल बोलले जात आहे, ते खोलवर जाणून घेण्यासारखे अर्थपूर्ण नाही, असे काहीतरी तत्वज्ञान या लोकांसाठी वस्तुस्थिती बनू शकते.
आज जरी आपण कला, अभिव्यक्तीचे मनोरंजक प्रकार आणि मौल्यवान ज्ञानाने भरलेल्या समाजात राहतो, तरी जग कसे आहे, हे जाणून घेण्यात सर्वांनाच रस नसतो. असंस्कृत लोक असे आहेत, जे साधनांच्या अभावामुळे नव्हे, तर इच्छाशक्तीच्या अभावामुळे सामाजिक आणि नैसर्गिक वास्तवाच्या जटिलतेबद्दल जाणून घेणे थांबवतात.
डॉ. शुभांगी पारकर