मुंबई (अक्षय मांडवकर) - संकटग्रस्त म्हणून नोंद असलेला वनपिंगळा या पक्ष्याच्या अधिवासाचा विस्तार झाला आहे (endangered forest owlet). कल्याणजवळील आंबिवली जैवविविधता पार्कच्या परिसरात हा वनपिंगळा आढळला असून हा परिसर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे (endangered forest owlet). तसेच यापूर्वी केवळ तानसा अभयारण्यातील अधिवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या या पक्ष्याच्या अधिवासाचा विस्तार गेल्या काही वर्षात शहापूर, मुरबाडमधील परिसरात देखील झाल्याचे निदर्शनास आले आहे. (endangered forest owlet)
'आययूसीएन'च्या लाल यादीत वनपिंगळा या पक्ष्याची संकटग्रस्त पक्षी म्हणून नोंद करण्यात आली आहे. विदर्भाचा विचार केल्यास हा पक्षी प्रामुख्याने सातपुडा आणि मेळघाटच्या जंगलात दिसतो. पालघर जिल्ह्यातील तानसा अभयारण्यात हा पक्षी २०१४ मध्ये सर्वप्रथम दिसला. ठिपकेवाला पिंगळ्याच्या शरीररचनेसोबत हा पक्षी सार्धम्य साधत असल्याने बऱ्याचदा लोक वनपिंगळ्याला ठिपकेवाला पिंगळाच समजतात. त्यामुळे अजूनही त्याच्या बऱ्याचशा नोंदी आलेल्या नाहीत. अशातच कल्याणनजीकच्या आंबिवली येथील आंबिवली जैवविविधता पार्कमध्ये हा पक्षी २०२१ साली दिसल्याचे संशोधन वृत्त 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या (बीएनएचएस) नियतकालिकामध्ये नुकतेच प्रकाशित झाले आहे.
आंबिवली शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने ४० एकर जागेवर आंबिवली जैवविविधता पार्क तयार केले आहे. 'आयनेचरवाॅच फाऊंडेशन'मार्फत या पार्कच्या निर्मितीचे काम करतेवळी किटकशास्त्रज्ञ व्ही शुभालक्ष्मी, केतक मार्थक आणि सुहास गोसावी यांना या पक्ष्याचे दर्शन घडले. पार्कच्या निर्मितीसाठी जैवविधता सर्वेक्षण सुरू असताना हा पक्षी पार्कसाठी निश्चित केलेल्या जागेत आढळून आला. आॅक्टोबर ते डिसेंबर, २०२१ या कालावधीत तो निदर्शनास आला. अजूनही तो याठिकाणी असण्याची दाट शक्यता आहे. दरम्यानच्या काळात हा पक्षी तानसाच्या बाहेर दिसल्याच्या काही नोंदी झाल्या आहेत. पक्षीनिरीक्षक रोहिदास ढगळे यांना हा पक्षी शहापूरमध्ये, तर शाहीद शेख यांना हा पक्षी मुरबाड तालुक्यामध्ये आढळून आला आहे.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.