‘एचएमपीव्ही’चा धोका लक्षणे आणि उपचार

    07-Jan-2025
Total Views |
HMPV

चीनमध्ये अज्ञात कारणांनी होणार्‍या न्यूमोनिया आणि श्वसन आजारांच्या घटनांमध्ये अलीकडे मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. तिथे ‘ह्युमन मेटापनेमो व्हायरस’ अर्थात ‘एचएमपीव्ही’, ‘मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनिया’ आणि ‘इन्फ्लूएन्झा ए’ यांसारख्या विषाणूंनी डोके वर काढले आहे. त्यामुळे श्वसन संक्रमणजन्य आजारांमध्ये वाढ दिसून येत असून, भारतातही कर्नाटकमध्ये दोन आणि गुजरातमध्ये एका रुग्णामध्ये ‘एचएमपीव्ही’ची नोंद झाली आहे. यामुळे आरोग्य क्षेत्रामध्ये सतर्कता वाढली आहे. तसेच तज्ज्ञांनी भारतामध्ये साथीचा धोका अद्याप मर्यादित असल्याचे सांगत संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. त्यानिमित्ताने ‘एचएमपीव्ही’ची लक्षणे आणि उपचार याची माहिती देणारा हा लेख...

‘एचएमपीव्ही’ म्हणजे काय?

‘ह्युमन मेटापनेमो’ व्हायरस (HMPV) हा एक विषाणूजन्य श्वसन संक्रमणजन्य आजार आहे. याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने लहान मुले, वृद्ध आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना होतो. हिवाळ्यात हा व्हायरस ‘रेस्पिरेटरी सिंक्टीशियल व्हायरस’ (RSV) सोबत दिसून येतो.

संशोधनानुसार, पाच वर्षांवरील ९० टक्के लोकांमध्ये या आजाराचे संसर्गजन्य पुरावे आधीच आढळतात. विशेषतः तीन महिन्यांखालील बाळांमध्ये आईकडून प्राप्त ‘एचएमपीव्ही’ अ‍ॅण्टीबॉडीज सापडतात. परंतु, या अ‍ॅण्टीबॉडीज कितपत रक्षण करतात, यावर तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत.

सध्याची परिस्थिती : भारतामधील प्रकरणे

कर्नाटकमध्ये दोन लहान मुलांमध्ये तर गुजरातमध्ये एका लहान मुलामध्ये ‘एचएमपीव्ही’चा संसर्ग आढळला आहे. अद्याप संसर्ग पसरल्याची मोठी नोंद नसली, तरी आरोग्य अधिकारी परिस्थितीवर बारकारईने लक्ष ठेवून आहेत. चीनमधील घटनांमध्येही ‘एचएमपीव्ही’चा समावेश असून यामुळे भारतात कोणताही उद्रेक होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक पाऊले उचलली जात आहेत.

‘एचएमपीव्ही’ची लक्षणे कोणती?

‘एचएमपीव्ही’ची सौम्य ते गंभीर लक्षणे खालीलप्रमाणे असतात :1) सामान्य लक्षणे : ताप, सर्दी, खोकला
2) गंभीर लक्षणे : श्वसनास त्रास, जलद आणि अडखळलेला श्वास, ऑक्सिजनची कमतरता (हायपॉक्सिया), दमा तीव्र होणे
संसर्ग हा श्वसन थेंबांद्वारे किंवा दुषित पृष्ठभागांच्या संपर्कामुळे पसरतो. सध्या या विषाणूवर कोणताही विशिष्ट औषधोपचार उपलब्ध नसून उपचार फक्त आधारभूत र्(Supportive) पद्धतींवर अवलंबून आहे.

प्रतिबंधासाठी सल्ला:

१. २० सेकंदांपर्यंत साबणाने हात धुवा.
२. आजारी लोकांशी संपर्क टाळा.
३. शिंकताना किंवा खोकताना तोंड-नाक झाका.
४. दुषित पृष्ठभाग, उदा. टेबल, हँडल यांची स्वच्छता ठेवा.
५. आजारी असल्यास घरीच राहा.

चीनमधील नेमकी परिस्थिती काय?

चीनमध्ये अज्ञात कारणांनी होणार्‍या न्यूमोनिया आणि अन्य श्वसन आजारांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे. अनेक प्रकरणांमध्ये ‘मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया’, ‘इन्फ्लुएन्झा ए’ आणि ‘एचएमपीव्ही’ यांसारखे घटक सापडले आहेत. या घटनांवर विचार करता, चीनमध्ये आरोग्य यंत्रणा एका पद्धतशीर निगराणी यंत्रणेच्या वापराने रुग्ण ओळखण्याचे काम करत आहे.

भारताला याचा काय धोका आहे, याविषयी बोलताना आरोग्यतज्ज्ञ म्हणतात की, ‘एचएमपीव्ही’ विशिष्ट भागांमध्ये मर्यादित राहण्याचा कल दर्शवतो. तरीही, संसर्गाचा विस्तार रोखण्यासाठी प्रारंभिक प्रतिबंधात्मक उपाय आणि जनजागृती महत्त्वाची आहे.

‘एचएमपीव्ही’ विरोधात आहारविषयक सल्ला

प्रतिबंधक उपायांमध्ये योग्य आहारदेखील तितकाच महत्त्वाचा ठरतो. आहारतज्ज्ञांच्या मते, पोषक आहारामुळे प्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे संसर्गापासून संरक्षण करता येते.
१) प्रतिबंधक पोषण : व्हिटॅमिन सी (संत्री, मोसंबी), झिंकयुक्त अन्न (शेंगदाणे, काजू) आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा (अंडी, दूध) आहारात समावेश करा.
२) पाणी पिण्याचे महत्त्व : पुरेशा प्रमाणात पाणी प्या, जे श्वसन संस्थेतील म्यूकस थराला संरक्षण देते.
३) प्रोबायोटिक्स : ताक आणि दही यांसारख्या पदार्थांमुळे आंतरिक बॅक्टेरिया संतुलित होतो.

‘एचएमपीव्ही’ हा प्रामुख्याने लहान मुलांना जास्त प्रभावित करणारा आजार आहे. भारतात त्याचे स्वरुप अद्याप गंभीर नाही. परंतु, प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे आहेत. स्वच्छता, लक्षणांची काळजी आणि जनजागृती यांवर भर दिल्यास संसर्ग टाळता येऊ शकतो.

निष्कर्ष

कर्नाटकमध्ये दोन आणि गुजरातमध्ये एका मुलाला ‘एचएमपीव्ही’ची लागण झाल्याने आरोग्य क्षेत्र सतर्क आहे. सध्या मोठ्या साथीचा धोका नाही, पण स्वच्छतेच्या नियमांचे पालन, पोषक आहार आणि सावधानता या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.‘एचएमपीव्ही’च्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकांनी सरकारी आरोग्य सूचनांचे पालन करण्यावर भर द्यायला हवा.

डॉ. जहाबिया बगवाला
(लेखिका सैफी हॉस्पिटल, मुंबई येथे बाल संसर्ग व श्वसनतज्ज्ञ आहेत.)