कोल्हापूर : “अलमट्टी धरणाच्या ( Almatti Dam ) पूररेषेबाबत सरकार लक्ष ठेवून आहे. त्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आला आहे. शासनाचा प्रयत्न पूरस्थिती नियंत्रणात आणण्याचा आहे. त्यासाठी आवश्यकता पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊ,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. ६ जानेवारी रोजी दिली. ते नांदणी मठातील पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सव सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी नांदणी येथील ‘स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान’ मठाला लवकरच तीर्थक्षेत्र ‘अ’ दर्जा देऊन मठासाठी आवश्यक सोयीसुविधा देणार असल्याची घोषणा केली. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सर्वश्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, राहुल आवाडे, अमल महाडिक, अशोक माने, शिवाजी पाटील, माजी मंत्री सुरेश खाडे, माजी खा. निवेदिता माने, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आ. प्रकाश आवाडे, जैन समाजातील आचार्य विशुद्ध सागर महाराज, मठाधिपती, दहा आचार्य महाराज, सात मुनी महाराज आदी या सोहळ्याला उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘वस्तुत्व’ महाकाव्य ग्रंथाच्या प्रतिकृतीचे प्रकाशन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘सकल जैन समाज’ आणि ‘स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान’ मठाच्यावतीने ‘प्रजागर्क’ पदवी देण्यात आली. “नांदणी मठात एक वेगळे जीन शासन पाहायला मिळत आहे,” असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “आचार्यांचे आशीर्वाद आणि सर्व भाविकांच्या दर्शनाचा लाभ यासाठी कार्यक्रमाला येण्याचे ठरवले. जैन तत्त्व ‘जगा आणि जगू द्या’ अशी आहेत. जगामध्ये बरेच विचार आले आणि नष्ट झाले. परंतु, जैन विचार अजूनही शाश्वत आहेत. ‘जन्माला आलाय तो जगेल आणि समाज त्याला जगवेल’ असा विचार जैन समाजाचा आहे. सर्वाधिक समाजसेवा करणारा जैन समाज असून समाजाने सर्व क्षेत्रांत प्रगती केली आहे. संपूर्ण जीवसृष्टी वाचविण्याचे विचार जैन विचारात आढळून येतात. समाजाला सशक्त आणि सन्मार्गावर ठेवणे हे मोठे काम आचार्य करतात. जैन समाजातील आचार्य, तीर्थंकार यांनी परंपरा आणि विचार आजही जीवित ठेवले आहेत. हेच संस्कार काल आणि स्थान यांचा विचार करीत नव्या स्वरुपात नव्या रुपाने समाजापर्यंत पोहोचवले जाता असे ते म्हणाले.
धर्मशास्त्र राजशक्तीवर अवलंबून नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “धर्मशास्त्र कधीच राजशक्तीवर अवलंबून राहिले नाही. परंतु, धर्मसत्तेच्या विकासाच्या यात्रेमध्ये राजसत्ता निश्चितच प्रयत्न करेल. देशातील पहिले जैन महामंडळ राज्यात स्थापन केले आहे. महामंडळाच्या सुधारणांबाबत आलेल्या सूचनांचा विचार करून युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी महामंडळ अधिक बळकट करू. नांदणी मठात मिळालेल्या मानपत्राला पात्र होण्याचा प्रयत्न करू,” असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.