स्वत:सोबतच अनेकांच्या आयुष्यात आर्थिक साक्षरता आणि सक्षमता आणणार्या विक्रोळीच्या मानसी मिलिंद शिंदे यांच्या आयुष्याचा मागोवा घेणारा लेख...
विक्रोळी-मुंबईच्या मानसी शिंदे यांनी ठरवले की, दुबईला जायचे. आधीच नियोजन करून तिथे भारतीय कर्मचार्यांच्या गटाशी त्यांनी संपर्क केला. त्या गटांना भेटण्याचे निवेदन दिले. मानसी दुबईला गेल्या. कुणी म्हणेल, त्यात काय इतके मोठे? एकट्या महिला तर जगभर फिरतातच की. पण, मानसी आणि तिच्या नातेवाईकांसाठी हे एक मोठे यश होते. होय, यशच! प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमध्ये हाती घेतलेले आर्थिक साक्षरतचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी पाऊल उचलले होते. तिथल्या भारतीयांनीही आनंदाने मानसी यांचे स्वागत केले होते.
मानसी यांची मैत्रीण दुबईला वास्तव्यास आहे. तिथल्या भारतीय कर्मचार्यांमध्ये आर्थिक साक्षरतेचा जागर केला, तर त्यांच्यासोबतच भारतातील त्यांच्या कुटुंबाचेही भवितव्य उज्ज्वल होईल, असे या मैत्रिणीचे मत. त्या कर्मचार्यांना आर्थिक साक्षरतेतून विमा पॉलिसीसंदर्भात माहिती द्यावी, यासाठी मानसी यांनी दुबईला जायचे ठरवले. त्यांनी तिथल्या कुशल-अकुशल कामगारांशी संपर्क साधला. भविष्याच्या दृष्टीने आर्थिक बचत कशी आवश्यक आहे, या विषयाबद्दल भारतीय कामगार गटामध्ये जागृती केली. मानसी नोकरी करणार्या गृहिणी. अर्थार्जन वाढावे, यासाठी त्यांनी पतीच्या साथीने विमा पॉलिसी काढण्याचे काम सुरू केले होते. कामानिमित्त लोकांशी संपर्क साधताना त्यांना जाणवत होते की, प्रत्येक व्यक्तीने पैशाचे नियोजन करणे खूप गरजेचे आहे. ‘आला पैसा, उडवा पैसा’ ही वृत्ती आजही समाजात मोठ्या प्रमाणात आहे. महिला आर्थिक स्वावलंबी झाल्या. पण, आर्थिक साक्षरता फारशी झाली नाही. मानसी सेवावस्ती ते विविध कॉर्पोरेट कार्यालयातली गटांसाठी ‘आर्थिक साक्षरतेची गरज’ यावर मार्गदर्शन करू लागल्या.
मानसी म्हणजे पूर्वाश्रमीची मारीया. एक कर्मठ रुढीवादी ख्रिश्चन कुटुंबात मानसी यांचा जन्म झाला. त्या लहानपणापासूनच हुशार आणि कष्टाळू. 90 सालचे दशक असेल. मारीयाचा परिचय एका हिंदू मुलाशी मिलिंद शिंदे यांच्याशी झाला. चित्रकला, हस्तकला यात प्रवीण असलेल्या कष्टाळू मिलिंद यांच्याशी मारीयाची मैत्री जमली. पुढे या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, धर्म वेगवेेगळे म्हणून त्यांच्या प्रेमाला दोन्ही कुटुंबांकडून विरोध झाला. मात्र, या दोघांनीही एकमेकांच्या कुटुंबांमध्ये स्वत:चे स्थान मिळवले. दोन्ही कुटुंबांनी विवाहाला अखेरीस मान्यता दिली आणि मारीया उर्फ मानसी आणि मिलिंदचा विवाह झाला. मिलिंदची आर्थिक स्थिती तशी बेताचीच. मात्र, घरी धार्मिक आणि सांस्कृतिक श्रीमंती. विक्रोळीच्या एका झोपडीत त्यांचा संसार सुरू झाला. मिलिंद आणि मानसी दोघेही नोकरी करू लागले. मानसी एका खासगी कंपनीत एचआर पदावर काम करू लागल्या. याच काळात मानसी आणि मिलिंद यांनी नोकरीव्यतिरिक्त विमा पॉलिसीचे काम सुरू केले. दोघांनीही अपार कष्ट केले. त्या कष्टात सासरे मुरलीधर आणि सासू मनिषा यांनीही मोलाची भर टाकली.
असो. मानसी जन्माने ख्रिश्चन होत्या. मात्र, मिलिंदच्या घरी त्यांनी देव, धर्म आणि हिंदू कुलाचार त्यांनी समजून घेतले. एक हिंदू सून, हिंदू आई कशी असावी, याचे उत्तम उदहारण म्हणजे मानसी शिंदे, असे परिसरातील सगळेच म्हणू लागले. हळूहळू मानसीच्या आणि शिंदे कुटुंबाच्या मेहनतीला रंग आला. मुंबईसारख्या शहरात त्यांनी स्वत:ची दोन घरे घेतली. दरम्यान, मानसी मिलिंद यांना दोन अपत्य झाली. मुलगी मयुरी आणि मुलगा साई. घरात आर्थिक सुबत्ताही आली. हे सगळे शक्य झाले होते ते आर्थिक नियोजनामुळे. त्यामुळे मानसीकडे अनेक महिला सल्ला विचारायला येऊ लागल्या. कष्टकरी आयाबायांना आणि सुशिक्षित महिलांना ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ सारखेच ‘पैसे कमवा आणि पैशांचे नियोजन करा’ हे मानसी सांगू लागल्या. त्यासाठी महिलांना, गरजूंना सर्वतोपरी मार्गदर्शन आणि साहाय्य करू लागल्या.
सुखाचे दिवस सुरू झाले होते. मात्र, नियतीच्या मनात वेगळेच होते. मिलिंद यांना कर्करोगाचे निदान झाले. मानसी मिलिंदसोबत ठाम उभी राहिली. मिलिंद यांच्यावर पुढे दोन वर्षे उपचार सुरू होते. पथ्यपाणी पाळणे गरजेचे. मिलिंद यांना होणारा त्रास मानसींना पाहावत नव्हता. केवळ मिलिंद यांना दु:ख होऊ नये, म्हणून त्यांनी चेहर्यावर आणि घरात कायम हास्य आनंद राखण्याचा प्रयत्न केला. मात्र, २०२१ साली ऐन तारूण्यात मिलिंद यांचे निधन झाले. मानसीच्या दु:खाला तर पारावर राहिला नव्हता. चिऊताईने एक एक काडी जमवून घरटे बांधावे, तसे मिलिंद आणि मानसीने संसार थाटला होता. अश्रूंचा बांध थोपवत त्यांनी निर्णय घेतला रडायचे नाही, पतीने मुलांच्या उज्ज्वल भविष्याचे जे स्वप्न पाहिले. तसेच, समाजात आर्थिक साक्षरता यावी, हे जे आपण स्वप्न पाहिले, ते स्वप्न पूर्ण करायचे. तसेच मिलिंद अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते. मानसीने मुलांवरचे ते धार्मिक संस्कार कायम जपले आहेत. मानसी म्हणतात, “पैशाची किंमत अडल्यानडल्या वेळेसच कळते. पैसा परिस्थितीपेक्षा मोठा वाटू नये, म्हणून प्रत्येकाने पैशाचे नियोजन करणे गरजेचे आहे. महिलांनी नुसते आर्थिक स्वावलंबी होणे गरजेचे नाही, तर आर्थिक साक्षर होणे ही गरजचेे आहे. मी यापुढेही समाजात आर्थिक साक्षरतेचा जागर करणार आहे.” मिलिंद यांच्यासोबत सप्तपदी घेत आयुष्यभर ती वचन निभावणार्या तसेच, समाजात आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी, यासाठी काम करणार्या मानसी शिंदे यांचा समाजाला अभिमान आहे!
९५९४९६९६३८