‘हा पदार्थ तर मला अजिबात पचतच नाही’, ‘अमूक एक पदार्थ मी खातच नाही. मला लगेच रिअॅक्शन होते,’ यांसारखी विधाने नातेवाईक, मित्रपरिवार, कार्यालयात वरेचवर कानी पडतात. हल्ली तर अगदी लहान वयातच अशा अन्नपदार्थांच्या एलर्जींचे प्रमाण वाढलेले दिसते. त्यानिमित्ताने आहारीय संकल्पनेच्या आजच्या भागात फूड एलर्जी, त्याचे परिणाम आणि त्यावरील आयुर्वेदातील पथ्यपाणी याची माहिती जाणून घेऊया.
आयुर्वेदात ‘विरुद्ध आहार’ ही संकल्पना खूप विस्तृतपणे मांडली आहे. बरेचदा विशिष्ट आहार किंवा आहार संयोग (Combination) खाल्ल्यावर अनेकांच्या अंगावर पित्त उठते. अशा व्यक्तींचे चेहरा, ओठ, घसा किंवा अन्य अवयव सुजू लागतात. चेहरा लाल होतो. चेहर्यावर खाज येते. जीभदेखील जड होते. क्वचितप्रसंगी पोटात दुखते. मळमळणे, अंगावर गांधी येऊन त्यावर तीव्र स्वरुपाची खाज येणे व आग होणे ही लक्षणे दिसतात. अन्नग्रहण करतेवेळी ओठ, दात, जीभ, घसा हे प्रथम संपर्कात येतात. त्यामुळे बरेचदा याच ठिकाणी लक्षणे आधी उपन्न होतात व नंतर सर्वांगावर चट्टे र्(urticaria) खाज, आग, सूज इ. लक्षणे उत्पन्न होतात. अति प्रमाण एलर्जिक रिअॅक्शन असली, तर नाक बंद होणे, श्वसनास त्रास होणे, घखा खवखवणे इ. लक्षणेही उत्पन्न होतात. त्याचबरोबर थोड्या वेळाने उलटी, जुलाबही सुरू होऊ शकतात. एलर्जिक रिअॅक्शन नेमकी कुठल्या अन्नपदार्थामुळे उत्पन्न झाली आहे, हे पहिल्याच वेळेस कळत नाही. पण, काही विशिष्ट आहार संयोग हे यामागचे कारण म्हणता येईल.
उदा. (herpes) नागीण होऊन गेल्यानंतर (खूप वर्षांपूर्वी झाली होती, अशी तक्रार घेऊन एक रुग्ण आली होती) पण उन्हाळ्याच्या काळात काजू खाल्ल्यास किंवा शेंगदाण्यांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास, त्याच जागी कंड व लालिमा येते. म्हणजेच काय, तर शरीराने काजू व शेंगदाणे हे त्या व्यक्तीसाठी विरुद्धान्न आहे, अशी रिअॅक्शन दिली.
अजून एक उदाहरण बघूया. एक दहा वर्षांची मुलगी दवाखान्यात आली होती. ओठ जाम्बुवंतासारखे सुजले होते. ही लॉकडाऊन संपतानाची गोष्ट आहे. तिची आई तिला दवाखान्यात घेऊन आली. प्रोबायोटिक म्हणून दही आणि काही फळे रोज खाण्यास ही माऊली त्या बाळाला किमान दोन ते तीन महिने देत होती. फळे पौष्टिक आहेतच. पण, फळे आणि दही हा संयोग हा विरुद्धान्न झाले. त्यात सातत्याने त्याचा मारा केला गेला. पण, चिकित्सेनंतर तिला आराम पडला.
काही विरुद्धान्न हे व्यक्तिसापेक्ष असू शकतात. उदा. काही व्यक्तींना दुग्ध किंवा दुग्धजन्य पदार्थ रोज सेवन केल्याने जुलाब होतात. पण, हे ठराविक व्यक्तींनाच होते. काही वेळेस लहान वयापासूनच ते पचत नाही. अशा वेळेस त्याला ’Lactose Intolerance’ आहे, असे म्हटले जाते व दुग्ध व त्यापासून बनविलेल्या पदार्थांचे सेवन बंद केले जाते. आयुर्वेदाच्या चिकित्सेने शरीराची दूध व दुधापासून बनविलेल्या पदार्थांना पचविण्याची क्षमता निर्माण केली जाते किंवा बिघडली असेल, तर ती दुरुस्त केली जाते. म्हणजे आयुर्वेदीय चिकित्सा ही शरीराची क्षमता वाढविण्याचे कार्य करते. केवळ लक्षणांपासून उपशय-आराम हा त्या चिकित्सेचा हेतू-ध्येय नाही.
सध्या काही आहाराच्या विशेष संयोगाने एलर्जिक रिअॅक्शन्स चटकन उत्पन्न होतात. त्याबद्दल थोडे जाणून घेऊया. लहान मुलांना बहुदा गोड आवडते. शाळेच्या डब्यातून असे काही दिले जाते, जे मूल खाईल. क्वचित प्रसंगी ते शरीराच्या ताकदीसाठी व वृद्धीसाठी पूरकही नसते. यातील एक पदार्थ म्हणजे पिनट बटर. शेंगदाणे ज्या प्रमाणात पिनट बटर सँडविचमधून खाल्ले जातात, ते आरोग्यासाठी बरेचदा बाधाकर ठरते. मग ओठ-चेहरा सुजणे, अंगावर खाज येणे, जीभ जड होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, मळमळ-उलटी-जुलाब किंवा गरगरणे इ. लक्षणे कमी-फार तीव्रतेने उत्पन्न होऊ शकतात.
अजून एक फूड एलर्जी जी खूप सामान्यपणे दिसून येते, ती म्हणजे अंड्यांची. अंड खाल्ल्यानेही याच पद्धतीने फूड एलर्जी त्वचेवर व आभ्यंतर शरीरामध्ये होते.
बरेचदा ‘रेड्डी टू इट पॅकेट्स’च्या कव्हर वर लिहिलेले असते किंवा जिथे नट्स व शेंगदाणे इ.चे पॅकिंग केले जाते, त्याच मशीनवर इतर उत्पादनांचेही पॅकिंग केले जाते. याचा अर्थ असा की, ज्यांना नट्स (सगळ्या प्रकारचे किंवा विशिष्ट प्रकारचे)ची एलर्जी आहे, त्यांनी असे अन्नपदार्थ स्वतःच्या जबाबदारीवरच खावेत. या पॅक केलेल्या अन्नपदार्थात जरी नट्स इ. एलर्जी उत्पन्न करणारे घटक (म्हणजेच एलर्जन्स) नसतील, तरीदेखील एलर्जिक रिअॅक्शन उद्भवू शकते व त्यासाठी ते उत्पादन करणार्या कंपनीला जबाबदार धरता येत नाही.
जसे दूध, अंडी इ. रोजच्या आहारातील गोष्टींची फूड एलर्जी असू शकते, तसाच एक पदार्थ म्हणजे तीळ. (पांढरे तीळ किंवा काळे तीळ) काहींना तिळगूळ खाल्ल्याने घसा आतून सोलवटल्यासारखा होतो व त्यांचा आवाजही बसतो. पुढे सर्दी-पडसे-ताप इ. लक्षणे उत्पन्न होतात. काहींना गुळाची पोळी, तिळाची पोळी, तिळाची वडी इ. खाल्ल्यानंतर जुलाब सुरू होतात. याचाच अर्थ शरीर तीळ हा पदार्थ पचवू शकत नाही. काही वेळेस लहान मुलांमध्ये विशेषतः तिळाचे तेल लावल्याने अंगावर रॅशेस उठतात. (मोहरीच्या तेलानेही रॅशेस येते.) असे असल्यास औषधांनी सिद्ध केलेले तेल किंवा खोबरेल तेल वापरून बघावे.
काही वेळेस फूड एलर्जी ही मासे व शेल्फीश यांचीही असते. काही वेळेस लहान मुलांमध्ये फूड एलर्जी असते व मुले जसजशी मोठी होतात, तसतसे त्या एलर्जीची तीव्रता कमी होऊ लागते व बहुतांशी वेळेस त्याचे प्रमाणही कमी होते. पण, काही वेळेस लहानपणापासून खात आलेल्या पदार्थांचा अतिरेक केल्याने मोठेपणीसुद्धा फूड एलर्जी उत्पन्न होऊ शकते. काही वेळेस विशिष्ट ऋतुंमध्ये विशिष्ट अन्नपदार्थ खाऊन चालत नाहीत. ते बाधतात. पण, तेच पदार्थ अन्य प्रदेशांत किंवा ऋतूंत खाल्ल्यास ते बाधत नाहीत. असे असल्यास मात्र त्याला फूड एलर्जी म्हणता येत नाही.
तसेच काही विशिष्ट भाज्या, जसे सुरण, अळूची पाने इ. या भाज्या कधीकधी खाजर्या निघतात. म्हणजेच काय, तर अशा भाज्या चिरताना, धुताना इ. हातांशी, बोटांशी संपर्क आल्यास तिथे तीव्र स्वरुपाची खाज निर्माण होते. तसेच, अशी खाजरी भाजी शिजवून खाल्ल्यास तोंडात, घशात इ. ठिकाणी ही खाज येऊ लागते. पण, याने एलर्जिक रिअक्शन अन्य लक्षणे काही उत्पन्न होत नाहीत. म्हणून यांचीही गणना फूड एलर्जीमध्ये केली जात नाही.
बरेचदा फूड एलर्जी ज्या असतात, त्यांना केवळ औषधोपचाराने आराम पडत नाही. शरीराची पंचकर्माने शुद्ध करावी लागते. शरीरातील अतिरिक्त वाढलेल्या त्रिदोषांचा अभ्यास करून कुठल्या दोषाची (वात-पित्त-कफ) स्थिती काय आहे व त्यातील कुठले पंचकर्म उपयुक्त ठरेल, हे तपासले जाते. याचबरोबर एलर्जिक ट्रिगरपासूनसुद्धा थोडे दूर राहणे इष्ट. यासाठी पथ्यपालन आवश्यक ठरते. पथ्यपालन, शरीरशोधन व आयुर्वेदीय चिकित्सेने फूड एलर्जीस उत्तमरित्या बर्या करता येऊ शकतात किंवा नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. ‘अति सर्वत्र वर्जयेत्’हे सूत्र मात्र कायम लक्षात ठेवावे व पाळावे. आपली प्रकृति आणि आवड यांत सांगड घालणे म्हणूनच अत्यंत महत्त्वाचे आहे. (क्रमश:)
वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
९८२०२८६४२९