मुंबई : (Dhananjay Munde) अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात हजर झालेले आहेत. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यांची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. अशातच मंत्रिमंडळ बैठकीआधी त्यांनी प्रसारमाध्यमांना राजीनाम्यावरून प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, "मी काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही", असे त्यांनी स्पष्ट केले.
नैतिकतेला धरुन राजीनामा दिला पाहिजे : खासदार सुप्रिया सुळे
मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "सरकारने संवेदनशीलपणे या सगळ्याचा विचार करावा. मला अजूनही तो दिवस आठवतोय, जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले, नैतिकता पाहून अशोक चव्हाणांनी तेव्हा राजीनामा दिला होता. त्यामुळे नैतिकतेला धरुन राजीनामा दिला पाहिजे."