भारताचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव जगासमोर मांडणार्या स्वामी विवेकानंद यांच्या समाधीस्थानाचे दर्शन संधी असून देखील राजकारण म्हणून स्टॅलिन यांनी चुकवले. त्यामुळे देशभरातील हिंदूंच्या श्रद्धेला ठेच पोहोचली आहे. तसेच द्रमुक नेत्यांच्या हिंदूविरोधी मानसिकतेचे दर्शनदेखील झाले आहे.
कन्याकुमारी येथील ज्या शिलेवर स्वामी विवेकानंद यांनी साधना केली, जेथे श्रीपादशिला विद्यमान आहे अशा ठिकाणी, स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्मारक दिमाखात उभे आहे. या भव्य शीला स्मारकास देशाच्या सर्व भागातील नागरिकांचा हातभार लागला. स्व. एकनाथजी रानडे यांच्या अथक परिश्रमातून साकारलेले शीला स्मारक पाहण्यासाठी, देश-विदेशातून मोठ्या संख्येने लोक येत असतात. विवेकानंद शीला स्मारकापासून जवळच असलेल्या एका खडकावर, थोर तामिळी संतकवी तिरुवल्लुवर यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. आता विवेकानंद शीला स्मारक आणि संतकवी तिरुवल्लुवर यांचा पुतळा असलेल्या खडकांना जोडणारा, एक काचेचा पूल बांधण्यात आला आहे. पर्यटकांना दोन्ही ठिकाणी सहजपणे जाता यावे या हेतूने, या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. या काचेच्या पुलाचे उद्घाटन, तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्टॅलिन यांना विवेकानंद शीला स्मारकावर जाऊन, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे दर्शन घेता आले असते. पण, द्रमुक नेते स्टॅलिन यांनी शीला स्मारकावर जाऊन विवेकानंद यांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्याचे टाळले! आतापर्यंत तत्कालीन राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी, या स्मारकास आवर्जून भेट दिली आणि स्वामी विवेकानंद यांना आदरांजलीही वाहिली. पण, स्टॅलिन यांना मात्र तसे करावेसे वाटले नाही. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या या स्मारकाचे, मुख्यमंत्री स्टॅलिन यांना वावडे असावे. स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त न करून, स्टालिन यांनी आपली कोती मनोवृत्ती दाखवून दिली. मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी शीला स्मारकास भेट देण्याचे टाळल्याबद्दल, त्यांच्यावर विविध थरांतून टीका होत आहे. हिंदू मुन्ननी या संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या या कृतीबद्दल, त्यांच्यावर तीव्र टीका केली आहे.
“मुख्यमंत्री स्टॅलिन यांची ही कृती हिंदूविरोधी असल्याचे दिसून येते,” अशी टीका ‘हिंदू मुन्ननी’चे नेते के.सी.सुब्रमणियन यांनी केली आहे. स्वामी विवेकानंद हे भारताचे प्रतीक आहेत. हिंदू धर्माची पताका त्यांनी जागतिक पातळीवर फडकवली. आपल्या विचारांनी स्वामी विवेकानंद यांनी अनेकांना प्रेरित केले. १८९२ साली कन्याकुमारीच्या शिलेवर साधना केल्यानंतर, ते अमेरिकेतील सर्व धर्म परिषदेत सहभागी होण्यास गेले होते. हा सर्व इतिहास सर्वसामान्य भारतीयास माहिती असताना, तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी जाणूनबुजून या शीला स्मारकाकडे पाठ फिरवल्याच्या घटनेमुळे कोणालाही संताप येणे स्वाभाविक आहे. द्रमुक नेत्यांच्या मनात हिंदूद्वेष किती भरला आहे, त्याची कल्पना मुख्यमंत्र्यांच्या या कृतीवरून येते. तसेच, थोर संत तिरुवल्लुवर यांचा भव्य पुतळा, आमच्यामुळेच उभा राहिल्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न द्रमुक करीत आहे. प्रत्यक्षात अण्णाद्रमुकची सत्ता असताना, तत्कालीन मुख्यमंत्री एम.जी.रामचंद्रन यांच्या हस्ते या पुतळ्यासाठी कोनशीला बसविण्यात आली होती. द्रमुक पक्ष आपले राजकीय हेतू साध्य करण्यासठी इतिहासाचे पुन्हा लेखन करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप तामिळनाडूमधील भाजप नेते एच. राजा यांनी केला आहे.
शीला स्मारक आणि संतकवी तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी जाण्यासाठी जी बोटसेवा आहे, त्या बोटींची नावे बदलण्यात आल्याबद्दल ‘हिंदू मुन्ननी’ने आक्षेप घेतला आहे. ‘कामराज’,‘नेसामणी’ अशी तामिळी नेत्यांची नावे दोन बोटींना देण्यात आली आहेत, ते ठीक आहे. पण, एका बोटीस ‘जी. यु. पोप’ असे एका ख्रिस्ती धर्मप्रसारकाचे नाव देण्यात आले आहे. ‘संगम कालखंडा’त तामिळनाडूमध्ये अनेक कवी होऊन गेले, त्यांच्यापैकी कोणाचेही नाव या बोटीला देता आले असते. पण, अल्पसंख्याक समाजाचे लांगूलचालन करण्याच्या हेतूने, सरकारने ही कृती केल्याचा आरोप ‘हिंदू मुन्ननी’ने केला आहे. त्याचप्रमाणे जो काचेचा पूल बांधण्यात आला आहे, त्याचा पर्यटकांना सशुल्क वापर करावा लागणार असल्याबद्दलही संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री स्टॅलिन हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जी कृती केली आहे, त्यामुळे तामिळी जनतेचाच नव्हे तर सर्व भारतीयांचा अवमान झाला आहे. तसेच, द्रमुक नेत्यांची मने हिंदूद्वेषाने किती भरलेली आहेत, तेही या निमित्ताने दिसून आले आहे!
‘सरकारी जोखडातून मंदिरे मुक्त करा!’
“आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे आयोजित एका भव्य धर्म संमेलनात, हिंदूंची मंदिरे सरकारी जोखडातून मुक्त करण्यात यावीत,” अशी मागणी एकमुखाने करण्यात आली. तसेच, सनातन धर्माचे रक्षण, भारतीय परंपरा आणि संस्कृती यांचे जतन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी, सिद्ध राहण्याचे आवाहन समस्त हिंदू समाजास करण्यात आले. या संमेलनाद्वारे देशातील मंदिरे सरकारी जोखडातून मुक्त करण्याच्या अभियानास प्रारंभ झाला. या संमेलनात विविध धर्माचार्य, आध्यात्मिक नेते, प्रमुख हिंदू नेते यांच्यासह सुमारे तीन लाख हिंदू उपस्थित होते. या संमेलनास श्री त्रिदंडी चिन्ना जियार स्वामी, श्री गोविंद गिरी महाराज, श्री विराजानंद स्वामी, श्री कमलानंद भारती, ‘विश्व हिंदू परिषदे’चे आंतराराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार, विहिंपचे संघटनमंत्री मिलिंद परांडे आदी नेत्यांनी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणांमध्ये सर्व वक्त्यांनी, मंदिराचे गैरव्यवस्थापन याकडे लक्ष वेधले. तसेच, माध्यमांमधून विकृतींचे जे प्रदर्शन केले जात आहे, त्याबद्दल चिंता व्यक्त केली. हे सर्व लक्षात घेऊन, हिंदू समाजाने एक होण्याची आणि आपली आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा टिकविण्यासाठी सामूहिक कृती करण्याची आवश्यकता आहे, यावर विविध वक्त्यांनी भर दिला. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी श्री गोकाराजू रंगाराजू होते. गोविंद गिरी यांनी आपल्या भाषणामध्ये, मंदिरे ही केवळ पूजा, उपासना करण्याची स्थाने नसून, तर ती आपली मूल्ये, परंपरा जपणारी केंद्रे आहेत. ही पवित्र स्थळे जपणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य असल्याचे म्हटले. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोककुमार यांनी आपल्या भाषणात, सरकारी नियंत्रणाखाली हिंदू मंदिरांचे पद्धतशीरपणे शोषण होत असल्याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. विद्यमान एन्डोमेंटस कायदे हिंदू मंदिरांची स्वायत्तता हिरावून घेणारे आणि अन्य धर्मियांच्या संस्थांना धक्का न लावणारे असल्याबद्दल , आलोककुमार यांनी टीका केली. सरकारी जोखडातून हिंदू मंदिरे मुक्त व्हावीत आणि हिंदू परंपरानुसार त्या मंदिरांचे व्यवस्थापन केले जावे, यासाठी कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात अशी मागणी हिंदू समाजाने एकमुखाने करावी, असे आवाहन आलोक कुमार यांनी उपस्थितांना केले. या संमेलनात मंदिरे शासकीय नियंत्रणातून मुक्त करण्यासंबंधात ठराव संमत करण्यात आला. चित्रपटातून हिंदू संस्कृतीचे जे विकृत चित्रण दर्शविले जात आहे, त्याबद्दल काही वक्त्यांनी चिंता व्यक्त केली. हिंदू समाजाची मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त व्हावीत, या मागणीसाठी विजयवाडा येथील संमेलनात जो शंखनाद करण्यात आला, त्यास देशाच्या सर्व भागातील हिंदू समाज पूर्ण शक्तीनिशी प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार नाही.
जगन्नाथ मंदिर परिसरात ड्रोन!
पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिर परिसरात ड्रोन उडत असल्याचे आढळून आल्याने, या मंदिराच्या सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या दि. ५ जानेवारी रोजी पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी सदर ड्रोन, मंदिर परिसरात फिरताना आढळले. या ड्रोनने मंदिर परिसरात घिरट्या घातल्या. मंदिराच्या परिसरात ड्रोनला बंदी असताना ते तेथे कसे काय आले? ड्रोन उडविणारी व्यक्ती कोण? याचा शोध पोलीस यंत्रणा घेत आहे. प्रवासी भारतीय दिनानिमित्त पुरीसह ओडिशातील विविध भागात कडक सुरक्षा असताना, ड्रोन जगन्नाथ मंदिर परिसरात कसे काय आले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भुवनेश्वर येथे दि. ८ जानेवारी ते दि. १० जानेवारी रोजी दरम्यान, प्रवासी भारतीय दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी प. बंगालमधील एका व्यक्तीने, जगन्नाथ मंदिर परिसरात ड्रोन उडविले होते. पण, नंतर त्या व्यक्तीने त्याबद्दल माफी मागितली होती. दरम्यान, मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा कायदामंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी दिला आहे. निर्बंधित क्षेत्र असताना, जगन्नाथ मंदिर परिसरात ड्रोन उडविण्याचे साहस करणार्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन होणे गरजेचे आहे.