शीशमहालावर ‘कॅग’ची टीका

    07-Jan-2025
Total Views |
Arvind Kejriwal

सामान्य जनतेच्या आणि शोषितांच्या सेवेसाठी सत्ता राबविणारे नेते जनतेच्या पैशाची लूट करीत स्वत: किती विलासी जीवन जगतात, याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. पण, लोकशाहीत अशी लूट होऊ शकत नाही, हा गैरसमजही केजरीवाल यांनी दूर केला. ‘कॅग’च्या ताज्या अहवालात त्यांच्या शीशमहालावर ३३ कोटी रुपयांची उधळण केल्याचे सिद्ध झाले आहे.

आम आदमी पक्षा’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या आलिशान शीशमहालावर महाअभिलेखापालांच्या अहवालात सणकून टीका करण्यात आल्याने स्वत:ला आणि आपल्या पक्षाला ‘कट्टर इमानदार’ म्हणविणार्‍या केजरीवाल यांचे पितळ उघडे पडले आहे. केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणावर तब्बल ३३ कोटी रुपये खर्च केल्याचे ‘कॅग’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यातील खर्चाचा तपशील पाहता, ही जनतेच्या पैशांची निव्वळ लूट असल्याचे कोणाच्याही लक्षात येईल. ‘आम’ लोकांचा पक्ष म्हणविणार्‍या या पक्षाच्या नेत्यांचे जीवन मात्र ‘आम’ नसून विलासी आहे, हेच यातून दिसून येते.
‘कॅग’च्या अहवालामुळे केजरीवाल यांच्या शीशमहालावर भाजप आणि अन्य पक्षांनी केलेली टीका खरीच होती, हेही दिसून आले. मुळात केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण केलेलेच नाही. कारण, मूळ निवासस्थान (बंगला) पूर्णपणे पाडून टाकण्यात आले असून, लगतचा भूखंड बेधडक जोडून घेऊन नव्या जागी पूर्णपणे नवा बंगला उभारण्यात आला आहे. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारची परवानगी घेतलेली नाही. तसेच, या बंगल्याच्या नूतनीकरणाचा मूळ प्रस्ताव आठ कोटी रुपयांचा होता, तो नंतर चारवेळा नियमबाह्य पद्धतीने बदलण्यात आला. त्यामुळे हे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान नाही. त्यातून त्यांनी बंगल्यातील सोयी-सुविधांसाठी केलेला खर्च पाहिल्यावर हे आम आदमीचे घर आहे की, राजाचा राजवाडा, असाच प्रश्न कोणालाही पडेल.

या कथित सरकारी निवासस्थानाला विरोधी नेते शीशमहाल (राजवाडा) का म्हणतात, ते त्यातील सुविधांवर जो खर्च केला आहे, त्यावरून दिसून येईल. त्यात ८८ इंचांचा एलजी कंपनीचा ‘८के ओएलईडी’ टीव्ही बसविण्यात आला आहे. त्याची किंमत २८ लाख, ९० हजार रुपये आहे. त्याशिवाय याचप्रकारचे ‘सोनी’ कंपनीचे आणखी चार टीव्ही या बंगल्यात असून, त्यांच्यासाठी ४३ लाख, ९० हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्याशिवाय ‘सॅमसंग’ कंपनीचा ‘फ्लेक्स फॅमिली हब फ्रेंच मल्टी-डोअर रेफ्रिजरेटर’ असून, त्याची किंमत ३ लाख, २० हजार रुपये आहे. १.८ लाख रुपयांचा एक मायक्रोवेव्ह ओव्हन आणि साडेसहा लाखांचे दोन स्टीम ओव्हनही बसविण्यात आले आहेत. १.९ लाख रुपयांचे एक वॉशिंग मशीन असून, १३ लाख रुपये खर्च करून दहा पलंग व सोफे ठेवण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम कात्याने १९ लाख, ५० हजार रुपये खर्च करून या बंगल्यात एक जाकुझ्झी, एक सौना आणि एक स्पा अशा आंघोळींची सोय केली आहे. नोकरांच्या निवासासाठी बांधलेल्या खोल्यांवर आणखी १९ लाख, ८० हजार रुपये खर्च केले आहेत, असे ‘कॅग’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

इतके सारे महागडे सामान आणि आलिशान बंगला केजरीवाल यांनी स्वत:च्या खिशातून खर्च करून नक्कीच बांधलेला नाही. या बंगल्याचे बांधकाम केंद्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. म्हणजेच हा एक सरकारी बंगला आहे. केजरीवाल यांना स्वत:साठी बंगला बांधायचा असता, तर त्यांनी इतके कोट्यवधी रुपये खर्च केले असते का, हा प्रश्न विचारणे आवश्यक आहे. सरकारी बंगला इतक्या आलिशान पद्धतीने बांधण्यात आणि सजविण्यात येत असताना, त्यावर कोणीच कसा आक्षेप घेतला नाही?

या बंगल्याची उभारणी २०२० सालापासून सुरू होती आणि ‘कॅग’च्या अहवालात मार्च २०२२ सालापर्यंतचाच तपशील आहे. पण, या शीशमहालाची सजावट २०२३ सालच्या मध्यापर्यंत सुरू होती. यावरून आणखी काही कोटी रुपयांचा चुराडा झाला असेल, हे उघड आहे. या सर्व काळात देशात ‘कोविड’ची साथ होती आणि तेव्हा कसेही करून त्यातून जीव वाचविण्यासाठी आम आदमीचा संघर्ष सुरू होता. पण, आम आदमीच्या नावाने राजकारण करणारे केजरीवाल तेव्हा स्वत:साठी आलिशान महाल उभारीत होते. त्यामुळे केजरीवाल यांचा ‘आप’ हा पक्ष ही दिल्लीकरांवर आलेली ‘आप’दा (संकट) आहे, ही पंतप्रधान मोदी यांची टीका यथार्थ आहे. गतवर्षी वृत्तवाहिन्यांनी त्यातील लक्षावधी रुपये किमतीचे पडदे, जमिनीसाठी बसविलेले परदेशी महागडे संगमरवर, टॉयलेट उपकरणे, स्वयंपाकघरातील विविध सोयी-सुविधा, अन्य फर्निचर वगैरे गोष्टींचे चित्रीकरण जनतेला दाखविले होते. एरवी असलेल्या-नसलेल्या मुद्द्यांवर दररोज पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर टीका करणार्‍या केजरीवाल यांनी आजपर्यंत शीशमहालाबाबत आपले मत व्यक्त केलेले नाही किंवा त्यावरील टीकेला एका ओळीचेही उत्तर दिलेले नाही. त्यांचे हे मौनच बोलके आहे. अशा या आलिशान महालात अगदी साध्या आणि कट्टर इमानदार केजरीवाल यांना बिचार्‍यांना गतवर्षीच्या सप्टेंबरपर्यंत दिवस कंठावे लागले. नंतर त्यांच्यावरील खटल्यांमुळे त्यांना अटक झाली आणि तुरुंगाची कोठडी मिळाली. (तेव्हाही त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नव्हता!)

प्रसिद्ध कादंबरीकार जॉर्ज ऑर्वेल यांनी १९२० सालच्या दशकात रशियात आलेल्या कम्युनिस्ट राजवटीचे वर्णन करताना लोकांच्या नावावर या पक्षाचे पुढारी आणि सत्ताधारी कसे आलिशान जीवन जगत होते, त्याचा टोकदार उपहास आपल्या ‘१९८४’ या कादंबरीत केला आहे. महात्मा गांधी यांच्या साध्या राहणीचे आपल्याकडे कौतुक केले जाते. पण, “गांधी यांना गरीब ठेवण्यासाठी सरकारला फार खर्च येतो,” असे मत सरोजिनी नायडू यांनीही व्यक्त केले होते. थोडक्यात, स्वत:ला सामान्यांचे आणि शोषितांचे कैवारी म्हणविणारे नेते हे आलिशान आणि सुखासीन जीवन जगण्यासाठी जनतेच्या पैशाची कशी उधळपट्टी करतात, याची अनेक उदाहरणे इतिहासात दिसून येतात. रुमेनियाचा हुकूमशहा चॉसेस्क्यू असो की, इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेन त्यांच्या राजवटी लोकांनी उलथून टाकल्यावर त्यांचे विलासी आणि सप्ततारांकित जीवन जगासमोर आले होते. निदान ते हुकुमशहा तरी होते, त्यामुळे त्यांना अशी लूट करणे शक्य झाले. लोकशाहीत अशी लूट करता येत नाही, हा गोड गैरसमज ‘कॅग’च्या अहवालाने खोटा पाडला आहे.

राहुल बोरगांवकर