भारतीय मानक ब्यूरो तर्फे ७६ वा वर्धापन दिन साजरा

    07-Jan-2025
Total Views |
Bharatiya Manak Bureau 

मुंबई : भारतातील गुणवत्ता नियंत्रण नियामक म्हणून काम करणाऱ्या भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस) ( Bhartiya Manak Bureau ) तर्फे ७६ वा वर्धापन दिन मुंबईतील अंधेरी सिप्झ येथे उत्साहात साजरा करण्यात आला. बीआयएस हॉलमार्किंग, मानक निर्मिती, गुणवत्ता तपासणी करणारी भारतातील एक प्रमुख नियामक संस्था आहे. दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस बीआयएस कडून वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षीच्या वर्धापन दिनी, भारतीय अर्थव्यवस्थेला मानक व्यवस्थेमार्फत पर्यावरणाचे रक्षण आणि ग्राहक संरक्षण करण्यास ही संस्था कटिबध्द आहे असे प्रतिपादन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून व्हीजेटीआयचे संचालक डॉ. सचिन डी. कोरे उपस्थित होते. याबरोबरच बीआयएसचे पश्चिम क्षेत्रीय उपमहासंचालक संजय गोस्वामी, बीआयएस मुंबई -१ शाखेचे प्रमुख वैज्ञानिक पिनाकी गुप्ता, बीआयएस मुंबई -२ शाखेचे प्रमुख वैज्ञानिक प्रेम साजनी पटनाला, पश्चिम क्षेत्र प्रयोगशाळेचे प्रमुख वैज्ञानिक अनिल कपूर, भारतीय रासायनिक परिषदेच्या महासचिव श्रद्धा राणे, एनओसीआयएलचे गुणवत्ता आश्वासन, टीक्यूएम आणि विश्लेषणात्मक संशोधन विभागाचे उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र दिगंबर गांगल आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बीआयएसचे पश्चिम क्षेत्रीय उपमहासंचालक संजय गोस्वामी यांनी बीआयएस कडून ग्राहकांची सुरक्षितता आणि सहभाग वाढविण्यासाठी आखण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यात मानकीकरण विक्री, मानक मंथन, मानक संवाद, एक्सपोजर व्हीजिट्स आणि कॅप्सूल कोर्स यांचा समावेश आहे. भारत यंदा होणाऱ्या इले्ट्रोटेक्निकल कमिशनच्या बैठकीबद्दल जाहीर केले. भारतात होणाऱ्या या परिषदेमुळे बीआयएसची जागतिक मानक क्षेत्रात महत्वाची भूमिका अधोरेखित होत आहे असे प्रतिपादन केले.

डॉ. सचिन कोरे यांनी बीआयएसच्या भविष्यातील भूमिकेवर भाष्य केले. येणाऱ्या काळात ॲडक्टिव मन्युफॅक्चरिंग तसेच थ्रीडी प्रिंटिंग या क्षेत्रात बीआयएसचे योगदान कसे असू शकते हे सांगितले. डॉ. नरेंद्र गांगल यांनी बीआयएस पर्यावरणीय बदलांच्या समस्येवर कसा तोडगा काढू शकतो यावर भाष्य केले. या कार्यक्रमात ज्यांनी बीआयएसच्या मानकांनुसार आणि त्यांचे पालन करत उत्कृष्ट शेरा मिळवला आहे अशा परवानाधारकांचा सत्कार करण्यात आला.

या वर्धापन दिनानिमित्त ८ जानेवारी रोजी हिरानंदानी पवई, मुंबई येथे स्टँडर्ड कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात या विषयावर विद्यार्थांना मिम्स तयार करणे, पोस्टर लेखन, घोषवाक्य तयार करणे अशा उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.