बांगलादेशचे काळजीवाहू पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या सैन्याला लष्करी कारवाईसाठी सज्ज राहण्याचे फर्मान सोडले आहे. त्यांच्या या वक्तव्याने बांगलादेशच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. एकीकडे बांगलादेशची अर्थव्यवस्था गटांगळ्या खात असून, दुसरीकडे सामाजिक सलोखादेखील विस्कळीत झाला आहे. त्यात भरीसभर म्हणून बांगलादेशला आंतरराष्ट्रीय संबंधांच्या आघाडीवरही तणाव सहन करावा लागत आहे. अशी बिकट परिस्थिती असताना युनूस यांचे युद्धसज्जतेचे विधान सर्वांच्याच भुवया उंचवणारे आहे. युद्ध ही आजमितीला कोणत्याही देशाच्या आवक्यातील गोष्ट राहिलेली नाही. युद्ध सुरू करणे जरी हातात असले, तरी त्याची व्याप्ती मर्यादित ठेवणे हे कोणाच्याच हातचे नाही. म्हणूनच, जगातील अनेक सुज्ञ देश आज चर्चेने मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असताना, युनूस यांचे युद्धसज्जतेचे विधान म्हणजे अपरिपक्वतेचे उत्तम लक्षण आहे.
हसिना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर मोहम्मद युनूस यांनी पंतप्रधानपदाची गादी सांभाळली. बांगलादेशच्या इतिहासात काही क्रांतिकारी निर्णय घेतील, अशी अपेक्षा मोहम्मद युनूस यांच्याकडून जनतेची होती. मात्र, सत्तेत येताच युनूस यांनी बांगलादेशातील कट्टरतावादी विचारसरणीला खतपाणीच घातले. बांगलादेशातील हिंदू समाजावर सातत्याने होणारे अत्याचार, मंदिरांची तोडफोड आणि महिलांवरील हल्ले हे कट्टरतावादाच्या विषारी झाडाचे फळ म्हणावे लागेल. आज बांगलादेशातील हिंदूंना मुक्त जीवन जगण्यासाठी लागणारा विश्वास देण्यात मोहम्मद युनूस यांचे नेतृत्व कुचकामी ठरले आहे. अर्थात या धर्मांध शक्तीच्या मर्जीनेच गादीवर असल्याने, खाल्ल्या मिठाला जागण्याशिवाय युनूस यांच्याकडे पर्याय तरी काय? आज युनूस ज्या सैन्याला युद्धसज्जेतेचे हुकूम सोडत आहेत, त्या सैन्याचे प्रमुख पदच रद्द करण्याची मागणी काही दिवसांपूर्वीच बांगलादेशातील धर्मांधांनी लावून धरली आहे. या मागणीचा काहीसा परिणाम बांगलादेशच्या सैन्याच्या मानसिकतेवरदेखील झाला आहे.
कोणाच्या तरी आशीर्वादाने गादीवर आलेले मोहम्मद युनूस हे आज जरी बेटकुळ्या फुगवून अप्रत्यक्षपणे युद्धाच्या वल्गना करत असले, तरी यांनी यांचा स्वाभिमान पाकिस्तानच्या राजदरबारी गहाण ठेवल्याचे जगाने पाहिले आहे. ज्या पाकिस्तानी सैनिकांनी बांगलादेशच्या अस्मितेचे वाभाडे काढले, महिलांची अब्रु लुटली, त्या पाकिस्तानबरोबर ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ची भूमिका युनूस यांनी जाहीर केली आहे. हे सारे कशासाठी, तर देशातील काही धर्मांधांना पाकिस्तान जवळचा वाटतो, त्यांची मर्जी राखण्यासाठी. मात्र, एकीकडे धर्मांधांचा हा विषारी सर्प जवळ करताना, बांगलादेशच्या भविष्याला अंधकारात ढकलण्याची सुरुवात दुसरीकडे युनूस यांनी केली आहे.
आज बांगलादेशचे भारताबरोबरचे संबंध बिघडले आहेत. हसिना यांनी बांगलादेशातून पलायन केल्यानंतर, भारतामध्ये आश्रय घेतला. हसिना यांचा ताबा देण्याची मागणी बांगलादेश सतत भारताकडे करत आहे. आजवर युनूस यांच्या सरकारने भारताकडे यासंबंधी दोन वेळा मागणी करून झाली आहे. मात्र, भारताने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यातच अराकन सैन्याने बांगलादेश सीमेवर पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळेच आज युनूस युद्धाची भाषा करत आहेत.
पण, बांगलादेशची अर्थव्यवस्था युद्धाचा भार पेलू शकते का? हा एक प्रश्नच आहे. ज्या देशाचे अर्थचक्र बिघडलेले आहे, जनता वाढत्या महागाईत भरडली जात आहे, तो देश युद्धासाठी कसा तयार होईल? कमी रोजगाराच्या संधी, परकीय कर्जाचा वाढता बोजा आणि अस्थिरतेमुळे परकीय गुंतवणूकदारांनी फिरवलेली पाठ अशा परिस्थितीत युद्ध ही एक फक्त कल्पनाच असू शकते. प्रत्यक्षात युद्धसज्जतेची वाल्गना करून युनूस यांनी जनतेचे लक्ष मुख्य समस्यांवरून विचलित करण्याचा प्रयत्न केला आहे.
युद्ध केवळ बंदुका आणि तोफांच्या शक्तीवर लढले जात नाही, तर ते आर्थिक स्थैर्य, सामाजिक एकजूट, यांच्याही आधारे लढले जाते. दुर्दैवाने, बांगलादेशकडे यापैकी काहीच शिल्लक राहिलेले नाही. अशा परिस्थितीत युनूस यांचे युद्धासाठी तयार होण्याचे सैन्यासाठीचे फर्मान म्हणजे एका अपयशी नेत्याची दिशाहीन धडपड आहे.
कौस्तुभ वीरकर