अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' साठी प्रेक्षक उत्सुक; फ्लॉप चक्र तोडण्यास खिलाडी तयार!

    07-Jan-2025
Total Views |

akshy
 
 
 
मुंबई : एकेकाळी एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारा हिंदी चित्रपटसृष्टीचा खिलाडी अक्षय कुमार गेल्या काही वर्षांमध्ये जरा मागे पडला आहे. अक्षयचे अनेक चित्रपट गेल्या काही वर्षांत फ्लॉप झाल्यामुळे २०२५ या वर्षात त्याचा स्काय फॉर्स चित्रपट पुन्हा एकदा अक्षयच्या नावावर सुपरहिटचा शिक्का लावेल अशी चिन्ह दिसत आहेत. ३३ वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीत काम केल्याचा अनुभव व्यक्त करताना अक्षय म्हणाला की, 'स्काय फोर्स' त्याच्या फ्लॉप्सची रांग तोडणारा ठरेल. पुढे अक्षय म्हणाला की, “अशा परिस्थिती येणं काही नवीन नाही. मी नेहमीच म्हणातो की मेहनत आणि सातत्य हा खरा मार्ग आहे. जरी अनेक लोकांनी मला सांगितले की तुम्ही कंटेंट-बेस्ड चित्रपटांमध्ये काम करू नका, तरीही मी त्या दिशेने चालत राहिलो. काम करण्याचं मन असणाऱ्याला काहीही थांबवू शकत नाही”.
 
अक्षयच्या 'सरफिरा,' 'बडे मियाँ छोटे मियाँ,' 'खेल खेल में,' अशा बऱ्याच चित्रपटांनी अलीकडच्या काळात बॉक्स ऑफिसवर अपयश अनुभवले. विशेष म्हणजे 'सरफिरा’ जो तमिळ चित्रपटसृष्टीतील हिट 'सुरराई पोत्रू' चा हिंदी रिमेक होता, त्यालाही मिळालेला कमी प्रतिसाद हताश करणारा होता. याबद्दल बोलताना अक्षय म्हणाला की, “या चित्रपटाला त्याच्या करिअरमधील एक मोठा प्रयत्न मानतो. 'यात काहीच वाईट नाही,' तो म्हणाला, 'हा एक नवीन अनुभव होता आणि मी त्यामधुनही शिकत राहिलो”.
 
दरम्यान, 'स्काय फोर्स' मध्ये अक्षय कुमारसोबत नवोदित अभिनेता वीर पहाडिया दिसणार आहे. 'स्काय फोर्स' हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट असून यात अक्षय कुमार एका आंतरराष्ट्रीय सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘स्काय फॉर्स’ हा चित्रपट २४ जानेवारी २०२५ रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह वीर पहाडिया, सारा अली खान, निमरत कौर, शरद केळकर झळकणार आहेत.