उद्धव ठाकरेंना पुण्यात मोठा धक्का! नगरसेवक आणि विभागप्रमुखांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

    07-Jan-2025
Total Views |
 
BJP
 
मुंबई : उबाठा गटाच्या पुण्यातील पाच नगरसेवकांसह विभागप्रमुखांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षात मोठे खिंडार पडले आहे. मंगळवार, ७ जानेवारी रोजी महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात हा जाहीर पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
 
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपच्या प्रदेश संघटनपर्व समितीचे प्रदेश प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. याप्रसंगी नगरसेवक विशाल धनावडे, नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, नगरसेविका पल्लवी जावळे, नगरसेविका प्राची आल्हाट, नगरसेविका संगिता ठोसर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच उबाठा शिवसेनेचे विभागप्रमुख संतोष सोनावणे आणि उपविभागप्रमुख निलेश कुलकर्णी यांनीसुद्धा भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
 
हे वाचलंत का? -  प्रदेश संविधान अभियान समितीच्या संयोजकपदी अमित गोरखे यांची नियुक्ती!
 
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत मागच्या अडीच वर्षात विचारांची तडजोड करण्यात आली. जेव्हा जेव्हा हिंदुत्वाचा विचार आला तेव्हा तेव्हा उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवारांसोबत गेले. महाराष्ट्रात कधी नव्हे ती अशी हिंदुत्ववादी विचारांशी तडजोड झाली. सत्तेसाठी हिंदुत्वाचा विचार सोडण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या पक्षातील लोकसभेचे खासदार निवडून आल्यानंतर त्यांच्या विजयी रॅलीमध्ये पाकीस्तानचे ध्वज फडकवण्यात आले. वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला. मागच्या अडीच वर्षात आपल्याला अशा अनेक घटना पाहायला मिळाल्या. त्यामुळे लहानपणापासूनच हिंदुत्ववादी विचारांनी तयार झालेले कार्यकर्ते विचलित झाले. त्याचा परिणाम म्हणून आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सोडून मूळ हिंदुत्ववादी विचाराच्या भाजपमध्ये हे पक्षप्रवेश झाले आहेत."
 
"मोदीजींनी विकसित भारताचा आणि देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. आजचा पक्षप्रवेश हा विकसित भारताच्या संकल्पनेला साथ देण्यासाठी आहे. देवेंद्रजींच्या विकासाच्या व्हिजनला साथ देण्यासाठी आहे. उद्याच्या पुणे शहराच्या विकासात महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकारचा महत्वाचा रोल असेल. या पक्षप्रवेशामध्ये पुणे शहराचा मोठा विकास दडलेला आहे. त्यामुळे हा पक्षप्रवेश अत्यंत महत्वाचा असून यातून संघटन पर्वाची दिशा ठरत आहे," असे ते म्हणाले.