निर्घृण फक्त हत्या नसते तर आपला व्यवहारसुद्धा निर्घृण असतो!

मंत्री पंकजा मुंडे : बीड सरपंच हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया

    07-Jan-2025
Total Views |
 
Pankaja Munde
 
मुंबई : निर्घृण फक्त हत्या नसते तर आपला व्यवहारसुद्धा निर्घृण असतो. एखादी वाईट घटना घडल्यानंतर त्यातून काहीतरी खाद्य मिळवणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे दिली. मंगळवार, ७ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी बीड हत्या प्रकरणावर भाष्य केले.
 
पंकजा मुंडे म्हणाल्या की, "एक भूमिका एकदा मांडली असताना रोज रोज माध्यमांपुढे तेच ते उगाळण्यात काय अर्थ आहे? त्यांच्याबाबतीत घडलेल्या घटनेचा आम्ही बाऊ करत त्याचा मंच तयार करून तिथे व्यक्त होण्याचे साधन बनवत आहोत, असे वाटते. निर्घृण फक्त हत्या नसते तर निर्घृण आपला व्यवहारसुद्धा असता. एखाद्या परिवाराच्या बाबतीत वाईट घटना घडल्यानंतर त्यातून पुन्हा काहीतरी खाद्य मिळवणे चुकीचे आहे. तो माझा स्वभाव नसल्याने या विषयावर सतत बोलणे मला योग्य वाटत नाही."
 
हे वाचलंत का? -  शिवाजी पार्कमधील धुळीबाबत १५ दिवसांत आराखडा तयार करा!
 
"महाराष्ट्रात याप्रकरणात एसआयटी लावण्यासाठी पहिल्यांदा मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे व्यक्त झाले. मी व्यक्त न होण्याचे काहीही कारण नाही. माझ्या जिल्ह्यात एका तरुणाची निर्घृण हत्या झाली. त्यावेळी मी व्यक्त झाले. राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा विश्वास आहे. त्यांनी विधानसभेत याप्रकरणाचा पूर्ण तपास करुन दोषींना शिक्षा देण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही, असे उत्तर दिले होते या घटनेची चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करू असे जेव्हा माझे मुख्यमंत्री सांगतात त्यावेळी परत त्या विषयाला सतत चालू ठेवणे योग्य नाही. आम्ही त्या तपासाबद्दल सकारात्मकत बाळगली पाहिजे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांनी विधानसभेत सांगितल्यानंतरही आम्ही मोर्चे काढणे म्हणजे अप्रत्यक्षपणे सरकारवरच प्रश्न उपस्थित करणे आहे. गृहमंत्री यात कुठल्याही प्रकारे कुचराई करणार नाही. माझ्या मनात पूर्ण विश्वास असल्यामुळे रोज रोज या विषयावर बोलावे, अशी माझी मानसिकता नाही. हा विषय धरून मला इश्यू करणे हा माझा स्वभाव नाही. माझ्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी शब्द दिला असताना आम्ही सारखे प्रश्न उपस्थित करत असू तर ते आमच्या नेतृत्वावर संशय घेण्यासारखे आहे," असे त्या म्हणाल्या.
 
देशमुखांच्या मुलांना घेऊन भाषण करण्यापेक्षा त्यांना न्याय मिळणे महत्वाचे!
 
"हत्या झाली तेव्हा मी तिथे उपस्थितीत होती का? तर मी एखाद्या व्यक्तीचे नाव घेऊन त्याच्यावर आरोप कसा करु? पण जो कुणी आरोपी असली त्याला शिक्षा झालीच पाहिजे. संतोष देशमुख माझा कार्यकर्त्या होता. त्याच्या लेकराचा चेहरा पाहून मला काय वाटते आहे, याचे मोठे प्रदर्शन मांडण्याची आवश्यकता नाही. फक्त यातून काहीतरी वेगळे मिळवण्याचा कुणीही प्रयत्न करु नये. गेली ५ वर्षांपासून मी राज्याच्या राजकारणापासून दूर आहे. मी मध्य प्रदेशची प्रभारी आहे. मी साधी आमदार, जिल्हा परिषद सदस्यही नाही. मग मी यामध्ये काय उत्तर देऊ? कोण कुणाचे अधिकारी आहेत, ते कुठून आलेत, हे मी कसे सांगू? तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, पालकमंत्र्यांनी आणि तेव्हाच्या यंत्रणेनी ते आणलेत. ते देखील म्हणतात की, याचा तपास लागला पाहिजे, आरोपीचा शिक्षा झाली पाहिजे. त्यामुळे रोज याचा उल्लेख करणे माझ्या राजकीय उंचीला अपेक्षित नाही. माझ्या राजकीय जीवनात अशा कुठल्याही गोष्टीला स्थान नाही. ज्या दिवशी संतोष देशमुखला न्याय मिळेल तो दिवस माझ्यासाठी उज्ज्वल असेल. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या भेटीपासून फक्त मलाच वंचित राहावे लागले. पण माझ्यासाठी त्यांची भेट घेणे आणि त्यांच्या मुलांना घेऊन भाषण करणे याहीपेक्षा त्यांना न्याय मिळणे महत्वाचे आहे," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
 
फेब्रुवारीपर्यंत मुंबईतील हवेची गुणवत्ता उत्तम करण्याचा प्रयत्न!
 
"मुंबईतील हवेची गुणवत्ता चांगली असणे अपेक्षित आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीची हवेची गुणवत्ता पातळी चांगली असली तरी फेब्रुवारीमध्ये ही गुणवत्तापातळी उत्तम दर्जापर्यंत सुधारण्यासाठी प्रयत्न करावे. हवेतील धुली कणांचे प्रमाण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांचे अथवा इमारतींचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्प्रिंकलरचा वापर बंधनकारक आहे. बांधकामाच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. प्रदूषण नियंत्रणात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी एक ॲप तयार करावे. या ॲपच्या माध्यमातून लोकांना प्रदूषणविषयी तक्रारी करता येतील. तसेच संबंधित विभागांना कारवाई करता येईल," अशा सूचना मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईतील हवा प्रदूषण प्रश्नाच्या बैठकीत दिल्या.