मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (NSG in Mahakumbh) उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभात देश-विदेशातून कोट्यावधींच्या संख्येत भाविक, पर्यटक येणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी योगी सरकारद्वारा अनेक स्तरांवर चोख व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या एनएसजीच्या १०० कमांडोनी महाकुंभाच्या सुरक्षेची जबाबदारी घेतल्याचे समोर आले आहे. आधुनिक शस्त्रे आणि साधनसामग्रीने सुसज्ज असलेले एनएसजीचे जवान महाकुंभाची सुरक्षा मजबूत करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
एनएसजीच्या संघाकडे एक हेलिकॉप्टर देखील आहे, ज्यामुळे त्यांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत पुरवता येईल. महाकुंभातील दहशतवादी कारवायांबाबत विशेष दक्षता घेण्यात येत आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की एनएसजीच्या दोन टीम आल्या आहेत. दोन्ही संघात ५०-५० कमांडो आहेत. उर्वरित दोन संघही लवकरच दाखल होतील. एनएसजी कमांडोंनी संगम परिसर, बडे हनुमान मंदिर, अराइल, आखाडा, कल्पवासी आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांवर पाळत ठेवली आहे.
महाकुंभमेळा परिसराच्या सुरक्षेसाठी स्पॉटर्स (अन्वेषक किंवा गुप्तहेर) देखील तैनात केले जात आहेत, जे संशयित दहशतवाद्याला पाहताच त्याला पकडतील. संपूर्ण परिसरामध्ये स्पॉटर्सची ३० पथकं तैनात करण्यात आली आहेत. सुमारे १८ संघ सक्रिय झाले असून आतापर्यंत, जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील स्पॉटर्स येथे पोहोचले आहेत आणि त्यांनी दहशतवाद्यांशी संबंधित संशयित व्यक्तींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे स्पॉटर्स दहशतवादी हालचाली ओळखण्यात तज्ञ आहेत. त्यांच्याकडे दहशतवादी आणि त्यांच्या संघटनांशी संबंधित लोकांचीही संपूर्ण माहिती आहे.