मुंबई : दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचा कर्जत येथील एन.डी. स्टुडिओ महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने परिचालनासाठी ताब्यात घेतला असून नुकतेच 'फिल्मसिटी'तर्फे अनोख्या फॅम टूरचे आयोजन करण्यात आले होते. फॅम टूरमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. यात कला दिग्दर्शक, सिने-निर्माते, निर्मिती संस्थांचे प्रतिनिधी आणि टूर ऑपरेटर अशा मंडळींचा सहभाग होता. यावेळी छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमाचंदेखील आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान एन.डी. स्टुडिओसाठीच्या संकेतस्थळाचे विमोचन करण्यात आले.
यावेळी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील म्हणाल्या," एनडी स्टुडिओ आर्ट वर्ल्ड माझ्यासाठी केवळ कामकाजाचा भाग नाही या वास्तूशी जूने ऋणानुबंध जोडले गेले आहेत. नितीन देसाई आणि माझा परिचय जुना आहे. कलाविश्वातील त्यांचं योगदान अमूल्य आहेच. त्यांचं जाणं हे सर्वांनाच चटका लावून गेलं. पण आता आपण पुन्हा एकदा रिस्टार्टसाठी सज्ज आहोत. भविष्यात विविध टप्प्यांवर कामे करायची असून यामध्ये पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, पर्यटन आदि बाबींचा समावेश आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन कॅमेरा टू क्लाऊड आपल्याला इथे उपलब्ध करुन द्यायचं आहे. अधिकाधिक पर्यटक यावेत, पर्यटनाला चालना मिळावी यासाठी प्रयत्न करायचे आहेत”.
सह व्यवस्थापकीय संचालक डॉ.धनंजय सावळकर म्हणाले,"एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. जवळपास ४५ एकरचा हा परिसर आहे. जिओग्राफीकलीदेखील याचं हे बदलतं स्वरूप आहे. एनडी स्टुडिओमध्ये जास्तीत जास्त चित्रीकरण व्हावेत या हेतूने आजची ही छोटी फॅम टूर आयोजित केली होती".
एन.डी. स्टुडिओचा साधारण ४५ एकरचा विस्तीर्ण परिसर आहे. चित्रीकरणे, समारंभ, पर्यटन, फोटोशूट, मेळावे, प्रशिक्षण अशा विविध कार्यक्रमांसाठी आता हा स्टुडिओ वापरता येणार आहे. या बरोबरच मंदिर , टाईम्स स्केव्हर , पोलीस स्टेशन, कोर्ट, स्ट्रीट, कॅफे, खाऊ गल्ली, चोर बाजार, फॅशन स्ट्रीट, चर्च, आग्राचा लाल किल्ला , दिवाणे आम, दिवाणे खास. शेष महल, शनिवार वाडा, सप्त मंदिर, फिल्म फॅक्टरी, रॉयल पॅलेस, सम्राट अशोका काळातील सेट, अजेठा वेरुळ लेणी, रायगड, राजगड, शिवनेरी किल्ल्यांचे यांचे इंटेरियर, गाव, तलाव, हेलिपॅड, वस्ती अशी विविध लोकेशन चित्रीकरणासाठी येथे उपलब्ध आहेत. आणि ओपन सेट लावण्यासाठी येथे मुबलक जागा उपलब्ध आहे.