किरीट सोमय्यांची टोरेस शोरूमला भेट! ७० कोटी रुपयांच्या ७० तक्रारी प्राप्त
07-Jan-2025
Total Views |
मुंबई : मुंबईतील टोरेस कंपनीचा मालक करोडो रुपये घेऊन फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवार, ७ जानेवारी रोजी दादर येथील टोरेस शोरूमला भेट दिली. दरम्यान, ७० कोटी रुपयांच्या ७० तक्रारी प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टोरेस कंपनीचा मालक गुंतवणूकदारांचे सगळे पैसे घेऊन पसार झाला. कंपनीने गुंतवणूकदारांना ५०० कोटींचा गंडा घालत पोबारा केला आहे. त्यामुळे या कंपनीच्या कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांनी गर्दी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
किरीट सोमय्या यांनी टोरेस दादर शोरूमला भेट देत छोट्या गुंतवणूकदारांची भेट घेतली. तसेच त्यांनी शिवाजी पार्क पोलिस स्टेशनलाही भेट दिली. यावेळी ७० कोटी रुपयांच्या ७० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हा घोटाळा १००० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. तसेच त्यांनी यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेशी चर्चा केली असून पोलीस आयुक्तांचीही भेट घेणार आहेत.