मुंबई : प्राथमिक सदस्यता नोंदणीसाठी येत्या १० तारखेला भाजप 'घर चलो अभियान' राबवणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. मंगळवार, ७ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबतची माहिती दिली.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "महाराष्ट्रातील १ लक्ष बुथवर दीड कोटी प्राथमिक सदस्यता नोंदणीकरीता आम्ही प्रत्येक घरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढच्या १५ दिवसांत दीड कोटी सदस्य संख्या असलेला भाजप पक्ष करण्याची आमची योजना आहे. १ जानेवारीपासून आम्ही संघटन पर्वाला सुरुवात केली आहे. ५ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांनी बुथवर जाऊन प्राथमिक ड्राईव्ह केला. संघटन पर्वाचा दुसरा ड्राईव्ह हा १० तारखेला घर चलो अभियान असेल. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरी जाऊन प्राथमिक सदस्यता नोंदणी करण्यात येईल. महाराष्ट्रातील सर्व आमदार, खासदार, मंत्री आणि पंचायत ते पार्लमेंटपर्यंतचे सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व संघटना प्रत्येक बुथवरील ४०-५० घरी जाऊन हे अभियान राबवणार आहोत. त्यानंतर आणखी एक-दोन ड्राईव्ह होणार आहे. यामध्ये दीड कोटी सदस्य संख्या असलेला भाजप हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष करण्याचे आम्ही ठरवले आहे. महाराष्ट्रातील जनता मोदीजींच्या नेतृत्वामुळे मोठ्या प्रमाणात या संघटन पर्वात सहभागी होतील. विकसित देशाचा संकल्प मोदीजींनी केला असून विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्रजींनी केला आहे. त्यामुळे सर्वांनी मोठ्या प्रमाणात या अभियानात सहभागी व्हावे," असे आवाहन त्यांनी केले.
सुरेश धस मुख्यमंत्र्यांची भेट घेणार!
"बीड हत्या प्रकरणाबाबत सुरेश धस यांच्याकडे काही वेगळी माहिती असल्यास सरकार म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांना द्यावी. पक्ष म्हणून काही सांगायचे असल्यास मला सांगावे. मी आज त्यांना वेळ दिलेली असून त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलणार आहे. देवेंद्रजींनादेखील ते आज भेटणार आहेत," असेही त्यांनी सांगितले.