मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bangladesh Hindu Journalist Family) बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना अद्याप थांबल्याचे दिसत नाही. फरीदपूरमधील एका हिंदू पत्रकाराच्या कुटुंबाला अज्ञात हल्लेखोराने लक्ष्य केल्याचे निदर्शनास आले आहे. या हल्ल्यात धारधार शस्त्रांचा वापर केला असून काही महिलासुद्धा यात जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना फरीदपूरच्या मधुखली गावात घडली आहे. हिंदू पत्रकार सौगता बोस हे अजमेर पत्रिका दैनिकात पत्रकार आहेत. त्यांचे वडील श्यामलेंदू बोस हे स्वातंत्र्यसैनिक आहेत. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास श्यामलेंदू बोस यांचे संपूर्ण कुटुंब टीव्ही पाहत होते. तेवढ्यात त्यांना घरात कोणीतरी शिरल्याचे दिसले.
बोस कुटुंबीयांनी घुसखोराचा पाठलाग केला असता त्याने धारदार शस्त्र बाहेर काढले. हल्लेखोराने श्यामलेंदू आणि त्यांच्या पत्नीवरही हल्ला केला. त्यात दोघेही जबर जखमी झाले. हल्लेखोराने श्यामलेंदू आणि त्यांच्या पत्नीची काळजी घेणाऱ्या १५ वर्षीय प्रीतीलाही सोडले नाही. श्यामलेंदूच्या घरातून ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी जमा झाले. संधी साधून हल्लेखोर शस्त्र उगारत पळून गेला. सध्या सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यावेळी पत्रकार सौगता बोस घरी नव्हते. पोलिसांनी सुरुवातीला ही घटना दरोड्याचा प्रयत्न मानली आहे. त्यांच्या बाजूने हल्लेखोर अल्पवयीन असल्याचे बोलले जात आहे. मात्र, पुढील तपास व इतर आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू आहे.