नवी दिल्ली : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) कर्नाटकात मानवी मेटापन्यूमोव्हायरसची (एचएमपीव्ही HMPV) ची दोन प्रकरणे शोधली आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले आहे.
आयसीएमआरला कर्नाटकमध्ये एचएमपीव्हीची दोन प्रकरणे आढळून आली आहेत. दोन्ही प्रकरणे अनेक प्रकारच्या श्वसन विषाणूजन्य रोगजनकांसाठी नियमित निरीक्षणाद्वारे ओळखली गेली. देशभरातील श्वसन रोगांवर लक्ष ठेवण्यासाठी आयसीएमआरच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. एचएमपीव्हीची प्रकरणे भारतासह जगभरात दिसून आली असून अनेक देशांमध्ये एचएमपीव्हीशी संबंधित श्वसन रोगांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. शिवाय आयसीएमआर आणि एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (आयडीएसपी) नेटवर्कमधील विद्यमान डेटाच्या आधारे, देशात इन्फ्लूएंझा-सदृश आजार (आयएलआय) किंवा गंभीर तीव्र श्वसन आजाराच्या प्रकरणांमध्ये कोणतीही असामान्य वाढ झालेली नाही, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
आढळलेल्या एचएमपीव्ही प्रकरणांपैकी एका ३ महिन्यांच्या बाळाला एचएमपीव्हीचे निदान झाले होते आणि त्यास ब्रॉन्कोप्न्यूमोनिया असलेल्या बॅप्टिस्ट हॉस्पिटल, बेंगळुरूमध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्याला घरी सोडण्य़ात आले आहे. त्याचप्रमाणे ३ जानेवारी २०२५ रोजी, ब्रॉन्कोप्न्यूमोनियाचा इतिहास असलेल्या ८ महिन्यांच्या अर्भकाला एचएमपीव्ही उपचारांसाठी बंगळुरूच्या बॅप्टिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बाळ आता बरे होत आहे. बाधित रुग्णांपैकी कोणाचाही परदेश प्रवासाचा इतिहास नाही.
काय आहे एचएमपीव्ही ?
- एचएमपीव्ही – ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस हा एक विषाणूजन्य आजार असून ज्यामुळे खोकला, सर्दी आणि घसा खवखवणे यासारख्या समस्या उद्भवतात.
- हिवाळ्यात त्याच्या संसर्गाचे प्रमाण अधिक असते.
- हा विषाणू फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्याने न्यूमोनिया होऊ शकतो.
- जेव्हा या विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा ते सामान्य सर्दीसारखे वाटते.
- हा विषाणू पहिल्यांदा २००१ मध्ये ओळखला गेला.