तामिळनाडू विधानसभेत राष्ट्रगीताचा अपमान, राजभवनाचा ठपका

06 Jan 2025 19:47:29

tamil nadu
 
नवी दिल्ली : (Tamil Nadu) विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रगीताचा अपमान झाल्याने तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी विधानसभेच्या अधिवेशनाला संबोधित न करताच सभागृह सोडले.
 
राजभवन कार्यालयाच्या निवेदनानुसार, तामिळनाडू विधानसभेत आज पुन्हा एकदा भारताच्या संविधानाचा आणि राष्ट्रगीताचा अपमान करण्यात आला. राष्ट्रगीताचा आदर करणे हे आपल्या राज्यघटनेत नमूद केलेले पहिले मूलभूत कर्तव्य आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या सुरुवातीला आणि शेवटी राष्ट्रगीत सर्व राज्य विधानमंडळांमध्ये गायले जाते. मात्र, तामिळनाडूच्या विधानसभेत आज राज्यपालांचे आगमन होताच त्यावेळी फक्त राज्यगीत गायले गेले. राज्यपालांनी सभागृहाला आपल्या घटनात्मक कर्तव्याची आदरपूर्वक आठवण करून दिलीय.सभागृहाचे नेते, सभापती आणि मुख्यमंत्र्यांना राष्ट्रगीत गाण्यासाठी कळकळीने आवाहन केले. मात्र, त्यांनी स्पष्ट नकार दिला. ही गंभीर चिंतेची बाब आहे. राज्यघटना आणि राष्ट्रगीताचा अशा निर्लज्जपणे अनादर करणाऱ्यांची साथ न देता राज्यपालांनी अत्यंत संतापाने सभागृह सोडले, असे राजभवनातील निवेदनात म्हटले आहे.
 
गेल्या दोन वर्षांपासून विधानसभेच्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरून वादंग होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वेळी राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात सरकारच्या निवेदनातील काही ओळी वाचण्यास नकार दिला होतायंदाही विधानसभेच्या अधिवेशनात गदारोळ अपेक्षित आहे. तामिळनाडूतील अण्णा विद्यापीठात विद्यार्थिनीवरील बलात्काराचे प्रकरण तापले असून विरोधी पक्ष राज्य सरकारवर हल्लाबोल करत आहेत. आता राज्यपालांच्या नाराजीमुळे आणखी गदारोळ होण्याची शक्यता आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0